ग्रामीण भागात कंदिलाच्या जागी सौरदिवा..! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ग्रामीण भागात कंदिलाच्या जागी सौरदिवा..!
ग्रामीण भागात कंदिलाच्या जागी सौरदिवा..!

ग्रामीण भागात कंदिलाच्या जागी सौरदिवा..!

sakal_logo
By

संदीप साळवे, जव्हार
तालुक्यातील आदिवासीबहुल भागात विद्युतपुरवठा खंडित होण्याचे प्रमाण अधिक आहे. त्यातच रॉकेलपुरवठा अल्प असून दरवाढ झाल्याने अंधारात राहण्याची वेळ येते; परंतु आता सौरऊर्जेचा दिवा वापरण्यात येत आहे. त्यामुळे ग्रामीण भागात आता कंदिलाच्या जागी सौर दिवा दिसत आहे. त्यामुळे खंडित वीजपुरवठा किंवा केरोसिनच्या अल्प पुरवठ्यावर एक शाश्वत उपाय म्हणून सौर दिव्याला अधिक पसंती देण्यात येत आहे.

बदलत्या काळानुसार प्रकाशाची साधनेही बदलत गेली आहेत. अंधाराला दूर सारणाऱ्या कंदील, चिमण्यांच्या जागी आता गावखेड्यात विद्युत दिव्यासोबतच सौरदिवे आले आहेत. पूर्वी याच कंदिलाचा आधार सर्वांना असायचा. त्यानंतर विद्युत दिवे आले; मात्र, विद्युत पुरवठा खंडित होत असल्याने ग्रामीण भागात आता सौर दिवे वापरले जात आहेत. एकेकाळी अंधारात वाट दाखवणारा कंदील आज घरातील अडगळीत पडून आहे. आधुनिक युगात पारंपरिक दिवे लुप्त होऊन आता, विद्युत दिव्यांचा वापर होऊ लागला; तरीही ग्रामीण भागात कंदील, गॅसबत्तीचा वापर झालेला पाहायला मिळायचा. कंदिलासाठी रॉकेलचा वापर व्हायचा, पण आता रॉकेलही मिळत नाही. याला उत्तम पर्याय म्हणून सौरऊर्जेवर चालणारे कंदिलासारखे दिसणारे दिवे आज बाजारात मिळत आहेत. इंधनाची निसर्गातून फुकट मिळणाऱ्या सौरऊर्जेवरील या आधुनिक साधनांचा पर्याय स्वस्त असल्याने पारंपरिक कंदिलाची जागा आता या सौरदिव्यांनी घेतली आहे.

पारंपरिक वस्तूंची आकर्षक मांडणी
आज लख्ख प्रकाशात वावरत असलो, तरीही या शांतपणे जळणाऱ्या पणती किंवा कंदिलाची शोभा काही न्यारीच होती. धगधगत्या जगापासून शांत एकांतात या मंद प्रकाशात जगण्याचा आनंद शोधणारी मंडळीही आहेत. आज अनेक घरात, हॉटेल्समध्ये आपल्याला या पारंपरिक वस्तूंची आकर्षक अशी मांडणी करून शोपीस म्हणून ठेवलेल्या पाहायला मिळत आहेत.

सौर कंदील पाच तास
सौरऊर्जेचा वापर करून प्रकाश उत्पन्न करण्याचा सोपा मार्ग म्हणजे सौर कंदील. गत काही दिवसांपासून ग्रामीण भागातील वाडी-वस्ती, पाड्यांवर विद्युतपुरवठा सुरळीत होत नसल्याच्या तक्रारी वाढत आहेत. अवकाळी पाऊस व वादळी वाऱ्यामुळे ठिकठिकाणी वीजपुरवठा खंडित होतो व ती गावे अंधारात जातात. वीजपुरवठा बेभरवशाचा असल्याने या ठिकाणी सौर कंदील पर्याय ठरत आहेत. एकदा बॅटरी चार्ज केल्यावर ती सुमारे पाच तास चालते.