वाढत्या उष्णतेचे नागरिकांना चटके | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वाढत्या उष्णतेचे नागरिकांना चटके
वाढत्या उष्णतेचे नागरिकांना चटके

वाढत्या उष्णतेचे नागरिकांना चटके

sakal_logo
By

वसई, ता. ११ (बातमीदार) : पालघर जिल्ह्यात उन्हाचा पारा वाढत चालला आहे. गेल्या दोन दिवसांत उष्णतेचे चटके नागरिकांना बसू लागले आहेत. गुरुवारी (ता. ११) शहरात ४१ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली. जिल्हा प्रशासनाकडून नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

अवकाळी पाऊस आणि त्यानंतर उन्हाचा पारा असे हवामानात बदल निर्माण होत आहेत. दुर्गम व अतिदुर्गम भागातील नागरिकांसह विद्यार्थ्यांना उष्णतेचा मारा सहन करावा लागत आहे. डोळे, चेहरा यासह त्वचेला त्रास होत आहे. पालघर जिल्हा आरोग्य प्रशासन, वसई-विरार महापालिका यंत्रणेकडून नागरिकांना सतर्क राहण्याचे, तसेच दुपारी शक्यतो बाहेरचा प्रवास टाळण्याचे आवाहन केले जात आहे. जर उष्माघाताचा त्रास जाणवत असेल तर त्वरित नजीकच्या आरोग्य केंद्रात निदान करावे, असे आवाहन पालघर जिल्हा ग्रामीण आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.

महिलावर्गाला अधिक त्रास
उन्हाळा प्रचंड वाढला आहे. ग्रामीण भागातील विहिरी आटल्या आहेत. त्यामुळे प्रचंड उन्हात पायपीट करून पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. त्यामुळे महिलावर्गाला अधिक त्रास सहन करावा लागत आहे.

शेतकरी, मजुरांना उष्णतेचा सर्वाधिक फटका
जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात बागायत आहे. उष्णतेचा सर्वाधिक त्रास शेतकरी व मजुरांना होत आहे. त्यामुळे शेतीत काम करताना ऊन जास्त असेल तर सावलीचा आधार, भरपूर पाणी पिणे व उन्हापासून बचाव करणे गरजेचे आहे. अनवाणी पायाने उन्हात चालू नये, दुपारी १२ ते ४ च्या वेळेत प्रवास करू नये, थंड किंवा बर्फाचे पाणी पिऊ नये, भरपूर पाणी व पौष्टिक आहार सेवन करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

उन्हाचे शरीरावर परिणाम
तहान जास्त लागत असल्याने पाण्याचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे भूक मंदावत आहे. शरीराला आवश्यक असणारी प्रथिने कमी व पाणी अधिक असल्याने याचा शरीरावर परिणाम होऊ लागला आहे. चक्कर येणे, हात-पाय थरथरणे असे प्रकार वाढू लागले आहेत.

महामार्गाच्या बाजूला थंडपेय विक्रेत्यांची दुकाने
मुंबई-अहमदाबाद महामार्गावरून प्रवास करताना चालकांसह प्रवाशांना अधिक त्रास होत आहे. अनेक ठिकाणी थंड पेय, जांभूळ, उसाचा रस, लिंबू सरबत, नारळपाणी, कोकम सरबत, ताडगोळे विक्रीचे प्रमाण वाढले आहे. शरीरात पाण्याचे प्रमाण कमी होऊ नये, म्हणून अशा विक्रेत्यांकडे नागरिकांची पावले वळत आहेत.

महामार्गावरून प्रवास करताना उष्णतेच्या झळा प्रचंड लागत आहेत. त्यामुळे शक्यतो दुपारी प्रवास करत नाही. त्वचेवर परिणाम होत आहे. शरीरातील दाह कमी करण्यासाठी उपयोगी ठरणारे खाद्यपदार्थ व पाण्यावर भर देत आहे.
- रॉबी रेमेडियस, प्रवासी

नागरिकांनी दुपारच्या वेळेस बाहेर पडू नये, जेणेकरून उन्हाची झळ लागणार नाही. तसेच भरपूर पाणी प्यावे. पौष्टिक आहार घ्यावा. त्रास जाणवल्यास आरोग्य केंद्रात जाऊन निदान करावे.
- डॉ. दयानंद सूर्यवंशी, जिल्हा ग्रामीण आरोग्य विभाग