
वडाळ्यातील अनधिकृत मजारीबाबत मनसे आक्रमक
वडाळा, ता. ११ (बातमीदार) ः मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी माहीम येथील समुद्रात अनधिकृत दर्ग्याची निर्मिती होत असल्याचे आरोप दीड महिन्यांपूर्वी एका सभेत केला होता. अशाच प्रकारे लॉकडाऊनचा फायदा घेत वडाळा पूर्व कोरबा मिठागर येथील आदर्श रमाईनगर येथे काही अज्ञात नागरिकांनी मजार उभारली असल्याचा आरोप स्थानिक मनसे नेत्यांनी केला आहे. या मजारीबाबत महापालिका एफ उत्तर विभाग व स्थानिक पोलिस ठाणे येथे मनसेच्या वतीने तक्रार देण्यात आलेली आहे. येत्या पंधरा दिवसांत मजारीवर कारवाई न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही वडाळा मनसे शाखा अध्यक्ष संजय रणदिवे यांनी दिला आहे.
वडाळा पूर्व कोरबा मिठागर येथील आदर्श रमाईनगर येथे अज्ञात नागरिकांनी लॉकडाऊनचा फायदा घेत मजार उभारली असल्याचा आरोप करण्यात येत आहे. येथे लाखाहून अधिक लोक वास्तव्य करीत असून मजार जवळच अंदाजे पाचशे घरे आहेत. या भागात गर्दुल्यांचा वावर वाढला आहे. त्यामुळे महिलावर्गामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून रात्रीच्या वेळी येथून ये-जा करणे येथील नागरिकांना गैरसोयीचे झाले आहे. त्यामुळे या मजारीवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
लॉकडाऊनचा फायदा घेत अज्ञात व्यक्तींनी कलेक्टर लॅण्डवर मजार बांधली आहे. पालिका व पोलिस प्रशासनाने वेळीच लक्ष देऊन कारवाई न केल्यास या अनधिकृत मजारीचे रूपांतर दर्ग्यात होईल. त्यामुळे यावर तात्काळ कारवाई करण्यात यावी.
- संजय रणदिवे, मनसे शाखा अध्यक्ष, वडाळा
मजार बांधण्यात अलेल्या ठिकाणी दिवसेंदिवस गर्दुल्ले वाढीस लागले आहेत. महिला व मुली येथून प्रवास करण्यास घाबरतात. या गंभीर समस्येकडे प्रशासनाने तात्काळ लक्ष द्यावे.
- प्रशांत पंडागळे, रहिवासी, वडाळा
मजार बांधण्यात आलेली जागा ‘सॉल्टपॅन’ची आहे. त्यानुसार त्यांना पालिकेच्या वतीने याबाबत पत्र देण्यात येणार आहे. तसेच आमचे कर्मचारी या जागेची प्रत्यक्ष पाहणी करतील.
- चक्रपाणी अल्ले, सहायक आयुक्त, फ उत्तर विभाग