महापालिका उभारणार कचरा हस्तांतरण प्रकल्प | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

महापालिका उभारणार कचरा हस्तांतरण प्रकल्प
महापालिका उभारणार कचरा हस्तांतरण प्रकल्प

महापालिका उभारणार कचरा हस्तांतरण प्रकल्प

sakal_logo
By

भाईंदर, ता. १४ (बातमीदार) : शहरात दैनंदिन गोळा होत असलेल्या कचऱ्याची वाहतूक करण्यावर असलेला ताण कमी करण्यासाठी मिरा-भाईंदर महापालिका दोन ठिकाणी कचरा हस्तांतरण प्रकल्प उभारणार आहे. प्रकल्पांमध्ये दररोजचा कचरा एकत्र करून मोठ्या वाहनात भरला जाणार आहे. या प्रकल्पांमुळे कचरा प्रकल्पाकडे जाणाऱ्या वाहनांची संख्या कमी होणार असून महापालिकेचे इंधनासाठीचे पैसे वाचणार आहेत.

शहरात दररोज गोळा होणारा कचरा सुमारे दीडशे वाहनांमधून कचरा प्रकल्पात पोहोचवला जातो. त्यासाठी वाहनांना कचरा प्रकल्पांपर्यंत अनेक फेऱ्या माराव्या लागतात आणि वाहतूक कोंडी होती. वाहनांची फेऱ्यांची संख्या कमी करण्यासाठी महापालिका कचरा हस्तांतरण प्रकल्प उभारणार आहे. शहरात दोन ठिकाणी हे प्रकल्प उभारले जाणार आहेत. त्यासाठी जागांचा शोध सुरू आहे. शहरातील गोळा केलेला कचरा वाहनांमधून या प्रकल्पांमध्ये येणार आहे. वाहनांमधील कचरा प्रकल्पात बसवण्यात आलेल्या यंत्रात रिकामा केला जाणार आहे. त्यानंतर हा कचरा उच्च दाबाखाली कॉम्पॅक्ट करून तो सुमारे २५ टनी वाहनामध्ये (कॅप्सूलमध्ये) भरण्यात येणार आहे. त्यानंतर ही कॅप्सूल कचरा प्रकल्पाकडे रवाना होणार आहे.

शहरात दोन ठिकाणी प्रकल्प
स्वच्छ भारत अभियानातून महापालिकेला या प्रकल्पासाठी २० कोटी रुपये अनुदान मिळाले आहे. त्यातून प्रत्येक प्रकल्पासाठी सहा कॅप्सूल, तसेच कचरा कॉम्पॅक्ट करणारी यंत्रे खरेदी केली जाणार आहेत. शहरात दोन ठिकाणी असे प्रकल्प उभारण्यात येणार आहेत. एका प्रकल्पासाठी किमान एक एकर जागेची आवश्यकता असून प्रशासनाकडून जागेचा शोध सुरू आहे. राज्यात पुणे व पिंपरी चिंचवड या महापालिकांनी असे प्रकल्प उभारले आहेत.

चार ते सहा गाड्यांमधील कचरा या एकाच कॅप्सूलमध्ये जाणार आहे. त्यामुळे वाहनांच्या तेवढ्या फेऱ्या आपसूकच कमी होणार आहेत. परिणामी महापालिकेची सुमारे तीन ते चार कोटी रुपयांची बचत होणार आहे.
- रवी पवार,
उपायुक्त, मिरा-भाईंदर महापालिका