
दुपारची अघोषित संचारबंदी
वाशी, ता. ११ (बातमीदार)ः कडक उन्हाळा जाणवू लागल्याने सद्यस्थितीत नवी मुंबई शहरात सरासरी तापमान ४० अंश सेल्सिअस इतके असते. त्यामुळे नवी मुंबईकरांच्या अंगाची काहिली वाढली असून दुपारच्या वेळी रस्त्यांवर पसरणाऱ्या शुकशुकाटामुळे अघोषित संचारबंदीच लागत असल्याचे चित्र आहे.
नवी मुंबई शहरातील अनियंत्रित बांधकामे, नवीन प्रकल्प, सिमेंट क्रॉंक्रिटीकरण, विमानतळ विकास, औद्योगिकीकरण आणि पदोपदी तयार होत असलेल्या सिमेंटच्या जंगलांमुळे मुंबईपेक्षा नवी मुंबईतील तापमानात कमीत कमी दोन ते चार सेल्सिअस अंशाने तापमान वाढल्याचे निर्दशनास येत आहे. शहराची निर्मिती करताना सिडकोने पर्यावरणाच्या अनुषंगाने उपाययोजना केल्या नसल्याने ही काहिली अधिक वाढू लागली आहे. सिडकोनंतर शहराचे पालकत्व स्वीकारलेल्या पालिकेनेही हा प्रश्न गंभीरपणे घेतला नाही. त्यामुळे ठाणे खाडी किनाऱ्यावरील मिठागरांच्या जमिनींवर मातीचा भराव टाकून तयार करण्यात आलेल्या नवी मुंबईच्या जमिनीवर आता उन्हाच्या झळा जाणवू लागल्या आहेत. सात बेटांवर वसलेल्या मुंबईपेक्षा नवी मुंबईतील दुपारच्या वेळचे तापमान हे चार अंश सेल्सिअसने जास्त असल्याचे दिसत आहे. त्यातच महामुंबई क्षेत्रात मोठ्या प्रमाणात बांधकामे सुरू आहेत. नवी मुंबई विमानतळासाठी होणारे उत्खनन, उलवा टेकडीचे सुरू असलेले सपाटीकरण, मातीचा भराव आणि जेएनपीटी विस्तारासाठीही खारफुटीच्या सपाटीकरणामुळे नवी मुंबईसह पनवेल, उरण परिसराचे तापमान पूर्वीपेक्षा वाढले आहे.
-------------------------------------
आरोग्याच्या तक्रारी बळावणार
मे महिन्यात तापमानाचा पारा ४० अंशांपर्यंत गेला आहे. त्यामुळे नवी मुंबईकरांची लाही-लाही होत आहे. दुपारच्या उन्हात फिरताना नवी मुंबईकर घामाघूम होत आहेत. त्यामुळे डिहायड्रेशन, डोकेदुखी, चक्कर येणे असे त्रास नागरिकांना होत आहेत. सायंकाळी आणि रात्रीही हवा गरम असते. त्यामुळे यंदाचा उकाडा नवी मुंबईकरांना त्रासदायक ठरत आहे. ताप, घसादुखी, पोटदुखीचा त्रास होणारे रुग्ण वाढल्याचे खासगी तसेच पालिकेचे डॉक्टर सांगत आहेत.
-----------------------------------
काय काळजी घ्यावी
दुपारी उन्हात फिरताना डोके झाकून घेणे आवश्यक आहे. शरीरातील पाण्याची पातळी कमी होऊ नये म्हणून थोड्याथोड्या वेळाने पाणी पिणे आवश्यक आहे. लिंबू, साखरपाणी प्यायल्याने शरीरातील पाण्याची पातळी वाढते. उन्हाळ्यात थंडपेय, आईस्क्रीम, बर्फाचा गोळा अशा पदार्थांच्या सेवनाचे प्रमाण वाढते. या पदार्थांमुळे तात्पुरते बरे वाटते; पण याचा दुष्परिणाम आरोग्यावर होतो.
------------------------------
मिनरल वॉटर विक्रेत्यांची चलती
उन्हामुळे घामाघूम होत असल्याने तहान लागत असल्यामुळे अनेक जण आरोग्याची काळजी घेताना मिनरल वॉटर विकत घेत आहेत. सार्वजनिक ठिकाणी असणाऱ्या पाणपोईच्या ठिकाणी पाण्यासाठी असणारी फिल्टर मशीन किंवा थंड पाणी मिळत नसल्यामुळे अनेक जण मिनरल वॉटर घेऊन आपली तहान भागवत आहेत. त्यामुळे मिनरल वॉटर विकणाऱ्यांची चलती सुरू आहे.
-------------------------------------------
महामुंबईत असलेली वृक्षसंपदा नष्ट होऊन त्या ठिकाणी सिमेंटचे जंगल तयार झाले आहे. वातावरणात कार्बनडाय ऑक्साईडचे प्रमाण वाढले आहे. त्याचा परिमाण उष्णतेबरोबरच मानवी शरीरावर होऊ लागला आहे.
- बाळासाहेब शिंदे, अध्यक्ष, पर्यावरण सेवाभावी संस्था
------------------------------------------
अतिथंड पदार्थ खाल्ल्यामुळे घसा बसणे, खोकला होणे असेही त्रास होत आहेत. दूषित पाणी प्यायल्यामुळे पोटदुखी, पोट बिघडण्याच्या तक्रारी वाढत आहेत. तहान जास्त लागली असली तरीही पाणी पिताना काळजी घ्यायला हवी.
- डॉ. प्रतीक तांबे, आरोग्य तज्ज्ञ