
मिरा-भाईंदर महापालिकेच्या रोस्टरला मान्यता
भाईंदर, ता. ११ (बातमीदार) : मिरा-भाईंदर महापालिकेच्या तृतीय आणि चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांच्या बिंदूनामावलीला (रोस्टर) कोकण विभागीय आयुक्तालयाकडून मान्यता मिळाली आहे. त्यामुळे महापालिकेतील कर्मचारी भरतीचा मार्ग मोकळा झाला आहे.
राज्य सरकारने मंजूर केलेल्या मिरा-भाईंदर महापालिकेच्या आकृतिबंधानुसार आस्थापनेवर एकंदर २,५६४ पदे आहेत. यापैकी १,०७८ पदे रिक्त आहेत. महापालिकेच्या आस्थापनेवरील खर्च ३५ टक्क्यांहून अधिक असल्यामुळे आतापर्यंत पदे भरण्यास राज्य सरकारकडून मान्यता दिली जात नव्हती. मात्र आयुक्त दिलीप ढोले यांनी आस्थापना खर्च कमी करण्यावर भर देऊन तो ३६ टक्क्यांपर्यंत खाली आणला. त्यातच राज्य सरकारकडूनही राज्यातील सर्वच महापालिकांना रिक्त पदे भरण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यानुसार रिक्त असलेल्या पदांपैकी अत्यावश्यक असलेल्या ३३९ पदांची भरती करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला होता; परंतु ही भरती करण्याआधी या जागांपैकी खुल्या, अनुसूचित जाती आणि जमाती, भटक्या विमुक्त, तसेच इतर मागासवर्गीय या वर्गांसाठी किती जागा आरक्षित ठेवायच्या, याचे रोस्टर (बिंदूनामावली) राज्य सरकारकडून मान्य करून घेणे आवश्यक होते.
तृतीय व चतुर्थ श्रेणीच्या रोस्टरसाठीचा प्रस्ताव कोकण विभागीय आयुक्तांकडे, तसेच वर्ग एक व दोन श्रेणीच्या रोस्टरसाठीचा प्रस्ताव मान्यतेसाठी मंत्रालयात पाठवण्यात आला होता. त्याला कोकण विभागीय कार्यालयाकडून मान्यता देण्यात आली आहे. कर्मचारी भरतीच्या ३३९ पदांपैकी २२९ पदे ही तृतीय श्रेणीतील कर्मचाऱ्यांची आहेत. त्यामुळे ही पदे भरण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे.
कर्मचारी भरतीसाठी राज्य सरकारने टीसीएस आणि आयबीपीएस या दोन संस्थांची नेमणूक केली आहे. या दोनपैकी कोणत्याही एका संस्थेची कर्मचारी भरतीसाठी महापालिकेला निवड करायची आहे. संस्थेची निवड करण्याचा निर्णय लवकर आयुक्त दिलीप ढोले घेणार असून त्यानंतर संस्थेच्या माध्यमातून तृतीय श्रेणी कर्मचारी भरतीची प्रक्रिया सुरू केली जाणार आहे. वर्ग एक व दोनच्या रोस्टरला मंत्रालयातून मान्यता मिळाल्यानंतर त्याची भरती प्रक्रिया केली जाईल.
- मारुती गायकवाड,
उपायुक्त, मिरा-भाईंदर महापालिका