
विनापरवानगी केली झाडांची कत्तल
तुर्भे, ता. ११ (बातमीदार) : भूखंडावर असलेल्या काही झाडांची विकसकाने पालिकेच्या उद्यान विभागाची कोणतीही परवानगी न घेता कत्तल केली असल्याचा आरोप घणसोलीतील माजी नगरसेवक प्रशांत पाटील यांनी केला आहे. घणसोली विभाग कार्यालयातील उद्यान अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी पालिका आयुक्तांकडे मागणी करण्यात आली आहे.
घणसोली सेक्टर नऊ येथील प्लॉट क्र. २२ या भूखंडावर सिटी इम्फ्रा या विकसकाचे गेल्या काही महिन्यांपासून काम सुरू आहे. या भूखंडावर असलेल्या दोन झाडांची विकसकाने पालिकेची परवानगी न घेता बेकायदा कत्तल केली असल्याचे माजी नगरसेवक प्रशांत पाटील यांच्या निदर्शनास आले असता त्यांनी ही बाब घणसोली विभाग कार्यालयातील उद्यान अधिकारी गणेश देशमुख यांच्या निदर्शनास आणून दिली. यानंतर गणेश देशमुख यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली; मात्र विकसकावर कोणतीही कारवाई केली नसल्याने माजी नगरसेवक प्रशांत पाटील यांनी पालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांना एक लेखी पत्र देऊन उद्यान अधिकारी गणेश देशमुख यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली.
------------------
घणसोली सेक्टर नऊमध्ये विकसकाने झाडांची बेकायदा कत्तल केल्याची तक्रार आम्हाला प्राप्त झाली होती. त्यामुळे आम्ही त्या ठिकाणी जाऊन पाहणी केली; मात्र आम्हाला त्या ठिकाणी वृक्ष तोड झाल्याचे आढळून आले नाही. या प्रकरणी आम्ही विकसकाला नोटीस बजावली आहे.
- गणेश देशमुख, उद्यान अधिकारी, घणसोली