फ्युचरिस्टीक पोलिस दलासाठी नवी मुंबई पोलिस पुढाकार घेतील

फ्युचरिस्टीक पोलिस दलासाठी नवी मुंबई पोलिस पुढाकार घेतील

नवी मुंबई, ता. ११ (वार्ताहर) : देशातील बहुतांश शासकीय आणि खाजगी संस्थांची जवळपास ९० टक्के डाटा सेंटर्स नवी मुंबई पोलिस आयुक्तालय क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत. याशिवाय नवी मुंबईमध्ये आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्प, मेट्रो, बंदर, नैना असे महत्त्वाकांक्षी प्रकल्प साकारले जात असून याठिकाणी मोठ्या प्रमाणात गुंतवणूक होत आहे. त्यामुळे नवी मुंबई शहराला मुंबईएवढेच महत्त्व प्राप्त होणार आहे. त्या अनुषंगाने नवी मुंबई पोलिस आयुक्तालयाचे महत्त्व वाढताना कायदा-सुव्यवस्थेच्या दृष्टीने या शहराची आव्हानेदेखील वाढणार आहेत. त्यामुळे फ्युचरिस्टीक पोलिस दल निर्माण करण्यासाठी नवी मुंबई पोलिस पुढाकार घेतील, असा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या वेळी व्यक्त केला.
नवी मुंबई पोलिस आयुक्तालयातील प्रत्येक पोलिस ठाणे स्तरावर पीडित महिलांच्या मदतीसाठी महिला साह्य कक्ष सुरू करण्यात आले आहेत. या महिला साह्य कक्षाचे उद्‍घाटन, तसेच नेरूळ येथील सेक्टर सातमधील सावली सेंटरमधील महिला सुरक्षा प्रकल्प आणि त्याच ठिकाणी सुरू करण्यात आलेल्या स्वतंत्र सायबर पोलिस ठाण्याचे उद्‍घाटन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गुरुवारी (ता. ११) पार पडले. तसेच वाशीमधील सिडको ऑडिटोरियम येथे नवी मुंबई पोलिसांच्या निर्भया पथकातील वाहनांना देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवण्यात आला. या वेळी आमदार गणेश नाईक, आमदार मंदा म्हात्रे, आमदार रमेश पाटील, आमदार महेश बालदी, सिने दिग्दर्शक रोहित शेट्टी, राज्याचे पोलिस महासंचालक रजनीश शेठ, पोलिस आयुक्त मिलिंद भारंबे, सहपोलिस आयुक्त संजय मोहिते, विशेष पोलिस महानिरीक्षक प्रवीण पवार, जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, नवी मुंबई महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर, कोकण विभागाचे अतिरिक्त आयुक्त किशन जावळे, सिडकोचे सहव्यवस्थापकीय संचालक डॉ. कैलास शिंदे, पनवेल महापालिका आयुक्त गणेश देशमुख आदी उपस्थित होते.

---------------------
४० स्कूटरद्वारे २४ तास गस्त
नवी मुंबई पोलिसांनी सुरू केलेल्या ११२ हेल्पलाईन, प्रत्येक पोलिस ठाण्यामध्ये स्वतंत्र महिला साह्य कक्ष, निर्भया पथक सुरू करण्यासंदर्भातील उद्देश पोलिस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी आपल्या प्रास्ताविकात स्पष्ट केला. सद्यस्थितीत नवी मुंबई पोलिसांच्या निर्भया पथकामध्ये १० एर्टिगा, ४० होन्डा ॲक्टीव्हा स्कूटर सशस्त्र महिलांसह महिलांच्या सुरक्षेसाठी २४ तास गस्त घालणार असल्याचे त्यांनी सांगितले. येत्या दोन महिन्यांत आणखी १० एर्टिगा आणि २ होन्डा ॲक्टीव्हा नवी मुंबई पोलिस दलात दाखल होणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com