शाळा सुरू होण्याआधीच पुस्तके

शाळा सुरू होण्याआधीच पुस्तके

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ११ : ठाणे महापालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना शाळा सुरू होण्यापूर्वी म्हणजेच १५ जूनच्या आधी क्रमिक पुस्तके मिळायला हवीत, असे निर्देश महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी शालेय विभागाला दिले आहेत. या निर्देशामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचे हसू फुलले आहे.
ठाणे महापालिका शाळांमधील गुणवत्ता वाढ, तंत्रज्ञानाचा वापर, गणवेशाचा नवीन रंग, त्याची उपलब्धता आणि शालेय क्रमिक पुस्तकांची उपलब्धता आदी विषयांचा आढावा आयुक्त बांगर यांनी मंगळवारी (ता. ९) घेतला. पुस्तकाची उपलब्धता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा आणि अनुदानित शाळांतील पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना राज्य सरकारकडून क्रमिक पुस्तके विनामूल्य दिली जातात. तर, नववी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांना महापालिका क्रमिक पुस्तके विनामूल्य देते. या संदर्भात, बालभारतीकडील पुस्तकांची उपलब्धता आणि खरेदी या दोन्ही गोष्टी ५ जूनपर्यंत पूर्ण व्हायला पाहिजे. शाळा सुरू झाल्यावर पुस्तके देणे हे महापालिकेचे अपयश असून, त्याचा थेट फटका विद्यार्थ्यांना बसतो. याची जाणीव ठेवून शिक्षण विभागाने जलद पावले उचलावीत, असे आदेश आयुक्त बांगर यांनी दिले. त्याचबरोबर, स्टेशनरीच्या खरेदीसाठी असलेले दर निश्चित करून ते २० मेपर्यंत शाळांमार्फत पालकांना कळवावेत. म्हणजे पालकांना १५ जूनच्या आधी त्यांची खरेदी करणे शक्य होईल. शाळा सुरू झाल्यावर त्यांची बिलेही शाळांकडे तत्काळ सादर केली जातील. विद्यार्थ्यांकडून बिले आल्यावर ते पैसे लवकरात लवकर त्यांच्या खात्यावर जमा होतील, याची दक्षता विभागाने घ्यावी, असे निर्देशही आयुक्तांनी दिले. या वेळी अतिरिक्त आयुक्त (२) संजय हेरवाडे, उपायुक्त अनघा कदम, मुख्य लेखा आणि वित्त अधिकारी दिलीप सूर्यवंशी उपस्थित होते.

गणवेशाचा नवीन रंग
महापालिका शाळांमधील गणवेशाचा रंग बदलण्याचे निर्देश आयुक्त बांगर यांनी यापूर्वीच दिले होते. त्यानुसार, सध्या गणवेश निवडीचे काम सुरू आहे. ही प्रक्रिया जलद पूर्ण करावी. त्याचा रंग आकर्षक आणि खासगी शाळांच्या गणवेशांप्रमाणे उठून दिसणारा असावा, असेही आयुक्त बांगर यांनी स्पष्ट केले.

इंग्रजी माध्यम, सीबीएसईच्या नवीन शाळा
महापालिकेच्या अर्थसंकल्पात जाहीर केल्याप्रमाणे सीबीएसई शाळा सुरू करण्याचे नियोजन केले जात आहे. पहिल्या टप्प्यात दोन शाळा सुरू केल्या जातील. त्यातील एक शाळा स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून, तर दुसरी महापालिकेच्या माध्यमातून सुरू होणार आहे. या शाळांसाठी असलेल्या अटींची पूर्तता करणे सुरू आहे. त्याचा आढावा आयुक्तांनी घेतला. पहिल्या टप्प्यात इंग्रजी माध्यमांच्या आणखी किमान १० शाळा सुरू करण्याचे लक्ष्य निर्धारित केले आहे. त्यासाठी शिक्षक उपलब्ध करण्याबाबत बैठकीत चर्चा झाली. या दोन्ही प्रकारच्या शाळांबाबत या वर्षी तयारी पूर्ण करून पुढील शैक्षणिक वर्षाची (२०२४-२०२५) प्रवेश प्रक्रिया सुरू करण्याचे उद्दिष्ट निर्धारित करण्यात आले आहे. त्याचा कालबद्ध कार्यक्रम तयार करण्याच्या सूचना आयुक्तांनी दिल्या.

क्षमता वृद्धीसाठी तंत्रज्ञान
सहावी ते दहावीमधील विद्यार्थ्यांची क्षमता वाढवून त्यांना अधिक स्पर्धात्मक वातावरण मिळवून देण्यासाठी महापालिकेने तंत्रज्ञानांचा प्रभावी वापर करण्याबद्दल एक सादरीकरण या बैठकीत करण्यात आले. केंद्रीय विद्यालय, एकलव्य शाळांमध्ये सुरू केलेल्या पद्धतीची माहिती या वेळी देण्यात आली. शाळेत उपलब्ध असलेल्या संगणक कक्षांचा वापर करून विद्यार्थ्यांना अधिक सक्षम, अभ्यासू बनण्यासाठी प्रेरणा देणाऱ्या शिक्षण आणि मूल्यमापन पद्धतीचे विवेचन या सादरीकरणात होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com