मुंबईत शिंदे गटाचे सेलिब्रेशन

मुंबईत शिंदे गटाचे सेलिब्रेशन

सकाळ वृत्तसेवा

मुंबई, ता. ११ : सर्वोच्च न्यायालयाचा निकाल जाहीर होताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाचे नगरसेवक, आमदार, खासदारांसह पदाधिकाऱ्यांनी सुटकेचा निःश्वास सोडला. शिंदे यांच्या पक्षाच्या मुंबईतील कार्यालयांमध्ये निकालानंतर फटाके फोडून सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचे स्वागत केले. ‘वर्षा’ बंगल्यावर पेढे वाटण्यात आले; तर मुंबईतील भाजप कार्यालयांमध्येही आज निकालानंतर आनंदाचे वातावरण होते.

सत्ता संघर्षाबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले होते. आज सकाळी सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचे वाचन सुरू झाले आणि शिंदे सरकारचे प्रतोद आणि राज्यपालांची भूमिका यावर न्यायालयाने ताशेरे मारले. त्यानंतर शिंदे गटात अस्वस्थता निर्माण झाली होती; मात्र उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला नसता तर आम्ही ठाकरे यांची मुख्यमंत्रिपदी नियुक्ती केली असती, असा निष्कर्ष नोंदवून न्यायालयाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिलासा दिला. त्यानंतर मुंबईतील शिंदे गटाच्या कार्यालयांच्या आवारात फटाके फोडून कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. निकालाच्या पार्श्वभूमीवर आज सकाळपासून मुंबईत कडक पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. शिंदे गटाची कार्यालये, तसेच शिवसेना शाखांच्या ठिकाणी बंदोबस्त वाढविला होता.

शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावले यांच्या नियुक्तीबाबत सर्वोच्च न्यायालयाने ताशेरे ओढले. तसेच शिवसेनेचे आमदार सुनील प्रभू यांचे प्रतोद पद कायम ठेवले. सर्वोच्च न्यायालयाच्या या निकालाचे आम्ही सर्व शिवसैनिकांनी आणि युवा सेनेने स्वागत केले असल्याचे युवा सेना विस्तारक रणजीत कदम यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com