''मुंबई आय'' प्रकल्प उभारणीच्या कामाला गती

''मुंबई आय'' प्रकल्प उभारणीच्या कामाला गती

‘मुंबई आय’ प्रकल्पाला गती
विविध कामांसाठी एमएमआरडीएने मागविले प्रस्ताव

मुंबई, ता. १३ ः शहराच्या सौंदर्यात भर घालण्यासाठी आणि पर्यटनवाढीच्या दृष्टिकोनातून ‘मुंबई आय’ प्रकल्पाची घोषणा करण्यात आली होती. आता प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी प्रयत्न सुरू झाले आहेत. एमएमआरडीएने प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी व्यवस्थापकाची नेमणूक करण्याचे ठरविले आहे. त्यानुसार निविदाही मागविण्यात आल्या आहेत.
निविदेतील उल्लेखानुसार, एमएमआरडीए प्रकल्पासाठी तांत्रिक आणि व्यवहारपूर्वक अभ्यास करणे, प्रकल्प विकसकाची निवड करण्यासाठी निविदा प्रक्रिया व्यवस्थापन करणे आणि प्रकल्प व्यवस्थापन सेवा पुरविण्यासाठी विनंती प्रस्ताव मागविण्यात आला आहे.
एमएमआरडीएच्या १५४ व्या बैठकीत ‘मुंबई आय’ प्रकल्पासाठी एमएमआरडीएने वांद्रे रेक्लेमेशनची जागा सुचविली आहे. खासगी-सार्वजनिक भागीदारीमध्ये प्रकल्प राबविण्याचेही प्रस्तावित आहे. एमएमआरडीएने ठरावात मांडलेल्या माहितीनुसार, जगभरातील विविध आकाश पाळणे, त्यांचा व्यास, उंची आणि बांधकाम खर्च इत्यादी बाबींची प्राथमिक माहितीच्या अनुषंगाने प्रकल्प उभारण्यात येणार आहे. १२० ते १५० मी. व्यास असलेला आकाश पाळणा, त्या अनुषंगिक पायाभूत सुविधा आणि परिसराच्या विकासाकरिता अंदाजे दोन हजार कोटींचा इतका खर्च ‘मुंबई आय’ प्रकल्पाच्या उभारणीसाठी येईल. त्याचप्रमाणे पर्यटकांना होणारी तिकीट विक्री आणि सभोवतालच्या परिसराचा वाणिज्यिक वापर प्रकल्पाचा अपेक्षित उत्पन्नाचे स्रोत असेल.

डॉ. बाबासाहेब आंबडेकर स्मारक आणि विशेष फेरी आकर्षण
पर्याय म्हणून निवडण्यात आलेल्या जमिनींपैकी वांद्रे रेक्लेमेशनहून वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्सची निकटता, सागरी किनारपट्टीचे दर्शनीय दृश्य, शहराच्या आकाशरेषेचा विलक्षण अनुभव आणि दादरमधील निर्माणाधीन असलेल्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक प्रकल्पाचे आकर्षण ठरेल. प्रस्तावित ‘मुंबई आय’ ते स्मारकापर्यंत फेरी सेवा उपलब्ध करून दोन्ही पर्यटनस्थळे जोडल्या जाण्याच्या शक्यतेचा विचार करता वांद्रे रेक्लेमेशन प्रकल्प उभारणीकरिता पर्यटनवाढीच्या दृष्टीने अधिक व्यवहार्य आहे, असेही एमएमआरडीएने सुचविले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com