औषध निविदेत १०० कोटींचा घोटाळा?

औषध निविदेत १०० कोटींचा घोटाळा?

सकाळ वृत्तसेवा

मुंबई, ता. ११ : मुंबई महापालिकेच्या रुग्णालयात रोज २५ हजार रुग्ण बाह्य ओपीडीत उपचारासाठी येतात; मात्र पालिकेकडे इंजेक्शन, औषधे उपलब्ध नसल्याने रुग्णांची गैरसोय होत आहे. निविदा प्रक्रिया राबवली जात नसल्याने स्थानिक विक्रेत्यांकडून औषध खरेदी केली जातात. तीन वर्षांपूर्वी निविदा प्रक्रिया पारदर्शक होती; परंतु आता स्थानिक औषध पुरवठादारांना हाताशी धरून ही खरेदी होत असून, यात १०० कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप ‘ऑल इंडिया फूड अँड ड्रग्ज लायसन्स होल्डर फाऊंडेशन’ने केला आहे. या प्रकरणात मध्यवर्ती खरेदी विभागातील (सीपीडी) अधिकाऱ्यांची चौकशी करण्याची मागणी फाऊंडेशनचे अध्यक्ष अभय पांडे यांनी केली आहे.

मुंबई महापालिकेने २६७ वैद्यकीय उत्पादने निर्धारित केली असून, त्यात ६० उत्पादने अंतिम केली आहेत; मात्र यातही इंजेक्शन, आयबी, ग्लोव्हज, टॅबलेट, लहान मुलांना देण्यात येणारे सिरप, ओआरएसचा साठा उपलब्ध नाही. औषधे उपलब्ध नसतानाही पालिकेच्या मध्यवर्ती खरेदी विभागाने नवीन निविदा मागवलेल्या नाहीत. त्यामुळे पालिकेची पाच वैद्यकीय महाविद्यालये, २० पेरिफेअल रुग्णालये, ३० मॅर्टनिटी होम व १५० ‘आपला दवाखान्या’त रुग्णांचे हाल होत असल्याचा आरोप फाऊंडेशनने केला आहे.

फाऊंडेशनच्या सदस्यांनी पालिकेच्या माजी अतिरिक्त आयुक्त (आरोग्य) डॉ. संजीव कुमार यांची भेट घेतली होती. या वेळी मध्यवर्ती खरेदी विभागातील अधिकारी परदेशी कंपन्यांना प्राधान्य देण्यासाठी देशी औषध पुरवठादारांना त्रास देत असल्याकडे अधिकाऱ्यांकडे लक्ष वेधले होते. तसेच निविदा प्रक्रिया उशिरा राबवली जात असल्याने पालिकेला १५० कोटींचा तोटा सहन करावा लागला आहे. मध्यवर्ती खरेदी विभागात बसलेले काही अधिकारी स्थानिक औषध पुरवठादारांना हाताशी धरून औषधे खरेदी करत असल्याचा आरोप अभय पांडे यांनी केला. दरम्यान, अतिरिक्त आयुक्तांनी सीपीडीमध्ये बसलेल्या अधिकाऱ्यांची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. सीपीडी घोटाळ्याची तक्रार पालिका आयुक्त इक्बाल सिंग चहल यांच्याकडे करण्यात आली होती. त्यानंतर चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.

घोटाळ्यांचा कागदोपत्री पुरावा देणार
पालिकेच्या मध्यवर्ती खरेदी विभागात होत असलेल्या गैरव्यवहारांची सविस्तर माहिती कागदोपत्री पुराव्यासह पालिका आयुक्त व प्रशासक डॉ. इक्बाल सिंग चहल यांना ई-मेल करणार असल्याचे फाऊंडेशनचे अध्यक्ष अभय पांडे यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com