घडाळ्याचे काटे मागे फिरणार नाही

घडाळ्याचे काटे मागे फिरणार नाही

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ११ : राज्यातील सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयाने आज (ता.११) अंतिम फैसला सुनावला. हा निर्णय उद्धव ठाकरे यांच्या बाजूने लागलेला नाही. मात्र, पुढच्या राजकीय संघर्षात टिकून राहण्याची शिदोरी या निर्णयाने ठाकरे यांना दिली असल्याचे राजकीय विश्लेषकांचे म्हणणे आहे. सहानुभूती आणि नैतिकतेचे कार्ड उद्धव ठाकरे कसे खेळतात यावर पुढच्या गोष्टी अवलंबून असल्याचे विश्लेषकांचे म्हणणे आहे.
--
आजच्या न्यायालयाच्या निर्णयाने शिवसेना संघटना कुणाकडे याचाही फैसला झाला नाही. त्यामुळे घड्याळाचे काटे उलटे फिरणार नाहीत, हे सत्य समजून घेऊन ठाकरे यांना नव्या संघटनेसह
काम सुरू करावे लागणार आहे. आतापर्यंत झालेल्या सर्व स्थानिक निवडणुका, पोटनिवडणुकांच्या निकालाकडे पाहिल्यास महाविकास आघाडी एकत्रित लढल्यास भाजपचा पराभव शक्य आहे हे सिद्ध झाले आहे. महत्त्वाचे म्हणजे यात शिंदेचा पक्ष फार प्रभाव पाडू शकलेला नाही. त्यामुळे उद्धव ठाकरे यांना नव्या मित्रांसोबत वाटचाल करावी लागेल, हे स्पष्ट आहे.
- प्रा. हरिश वानखेडे, जवाहरलाल नेहरू विद्यापीठ
......
हा निकाल १०० टक्के उद्धव ठाकरे यांच्या बाजूने लागला नाही हे खरे असले तरी या निकालाने ठाकरे यांना पुढच्या राजकीय संघर्षासाठी नैतिक ऊर्जा दिली आहे. मी मुख्यमंत्री पदाची खुर्ची सोडली, त्याची किंमत मोजली. ही नैतिक लाईन ठाकरे यांना घेता येईल. उद्धव ठाकरे यांना लोकांची सहानुभूती आहे. मात्र ती इंदिरा गांधी किंवा राजीव गांधी यांना मिळालेल्या सहानुभूतीएवढी निश्चितच नाही. त्यामुळे मुंबईबाहेर ते याचा कसा वापर करणार यावर पुढच्या गोष्टी अवलंबून असणार आहेत. मात्र, या दरम्यान मिळालेल्या वेळेचा वापर करून ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन मुख्य विरोधी पक्षांत अस्थिरता आणण्यात भाजप यशस्वी झाला आहे. त्यामुळे महाविकास आघाडीसमोरची लढाई एवढीही सोपी नाही.
- प्रा. सुमित म्हसकर, ओ. पी. जिंदाल ग्लोबल युनिव्हर्सिटी
......
या निकालानंतर सोशल मीडियावरील प्रतिक्रिया बघितल्यास उद्धव ठाकरे यांना मोठ्या प्रमाणावर सहानुभूती मिळताना दिसत आहे. केवळ सहानुभूतीच्या आधारे निवडणुका जिंकणे शक्य नाही. आज ४० आमदार, ११ खासदार आणि काही पदाधिकारी पक्षाबाहेर निघून गेले आहेत. यामुळे निर्माण झालेली पोकळी भरून काढण्यासाठी नवे नेतृत्व तयार करावे लागेल. संघटनेची नव्याने उभारणी, संसाधने उभारावी लागतील. केवळ पत्रकार परिषदा, सभा घेऊन ही पोकळी भरून निघणार नाही. त्यासाठी प्रत्यक्ष मैदानात उतरावे लागेल. दुसरीकडे शिंदे यांच्या पक्षाचे नेते आणि भाजपकडून अजून खालच्या थरावरची टीका झाल्यास त्याचाही फायदा होईल.
- संजय पाटील, शिवसेना अभ्यासक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com