कार अपघातात दोघांचा मृत्यू

कार अपघातात दोघांचा मृत्यू

शहापूर, ता. १२ (बातमीदार) : नाशिक-मुंबई महामार्गावर चेरपोली हद्दीत टाकण्यात आलेल्या गतिरोधकांमुळे घोटीहून परतत असताना झालेल्या अपघातात दोघांचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी (ता. ११) रात्री घडली. महामार्गावर गतिरोधक असल्याने वेग कमी केलेल्या कारला पाठीमागून एका अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिल्याने कार पुढच्या वाहनावर जाऊन धडकली. या भीषण अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला; तर तिघे जण जखमी झाले. गजानन पडवळ (वय ४०) व स्वाती वरकुटे (वय ३५) अशी मृतांची नावे आहेत. तसेच जितेश वरकुटे, गोपाळ वरकुटे व सोनाबाई वरकुटे अशी जखमींची नावे असून जखमींवर शहापूरच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
खारेगाव, साकेत येथील पुलांचे व मुंब्रा बायपासच्या दुरुस्तीची कामे सुरू आहे. त्यामुळे नाशिककडून शहापूर-किन्हवली-सरळगावमार्गे पुढे जेएनपीटीला जाणाऱ्या अवजड वाहनांसाठी नाशिक-मुंबई महामार्गावरील चेरपोली येथून मार्ग देण्यात आला आहे. चेरपोली येथील उतारावर तीन ठिकाणी गतिरोधक टाकण्यात आले आहेत. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने गतिरोधक टाकल्यानंतर स्पीडलिमिट, गो-स्लो असे विविध दिशादर्शक फलक, रम्बलर रिफ्लेक्टर्स आदी आवश्यक ती खबरदारी न घेतल्याने चेरपोली येथे टाकण्यात आलेल्या या गतिरोधकांमुळे अपघात होत असल्याची ओरड वाहनचालकांकडून होत आहे. गेल्या महिन्याभरात या गतिरोधकांमुळे आठ ते दहा अपघात झाल्याचे वाहतूक पोलिसांकडून सांगण्यात येत आहे.
गुरुवारी रात्री अकराच्या सुमारास चेरपोली गावाच्या हद्दीतील उतारावर असलेल्या या गतिरोधकांमुळे दोघांना जीव गमवावा लागल्याची घटना घडली. उतारावर गतिरोधक असल्याने कारचालकाने कारचा वेग कमी केला; मात्र पाठीमागून येणाऱ्या अज्ञात वाहनचालकाने कारला पाठीमागून जोरदार धडक दिली. यामुळे कार पुढच्या वाहनावर जाऊन धडकली. यामुळे झालेल्या भीषण अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला; तर तिघे जखमी आहेत. अपघातग्रस्त शहापूर तालुक्यातील शेणवा येथील राहणारे आहेत. शहापूर पोलिस ठाण्यात याबाबत अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com