
फरारी आरोपी अखेर अटकेत
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १२ : मुंबईच्या विविध पोलिस ठाण्यांत १८ गुन्हे दाखल असलेल्या सराईत आरोपीला पकडण्यात मालाड पोलिसांना यश आले आहे. आरीफ शफीक अहमद अन्सारी ऊर्फ आसिफ असे अटक आरोपीचे नाव असून तो भिवंडीचा रहिवासी आहे. आरोपीकडून बनावट क्रमांक असलेल्या रिक्षासह हत्यारे जप्त करण्यात आली असून आरोपीने दिंडोशी पोलिसांच्या हद्दीत दोन घरफोड्या केल्याचे चौकशीत उघड झाले आहे.
मालाड पोलिस ठाण्याच्या हद्दीतील काचपाडा परिसरात गस्त घालत असताना तीन व्यक्ती रिक्षामध्ये संशयितरित्या बसलेल्या आढळल्या. त्यापैकी एक आरीफ शफीक अहमद अन्सारी ऊर्फ आसिफ केला असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. आसिफ हा सराईत आरोपी असून त्याच्याविरोधात १८ गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे संशय आल्यानंतर पोलिसांनी रिक्षात बसलेल्या व्यक्तींना ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी दोघे तेथून पळून गेले, पण आसिफला पोलिसांनी ताब्यात घेतले.
आसिफची झडती घेतली असता लोखंडी सुरा, लोखंडी स्क्रू पान्हा, लोखंडी स्क्रू-ड्रायव्हर, प्लास्टिकचा टॉर्च आदी सापडले. तसेच आरोपीच्या रिक्षाची तपासणी केली असता त्यावरील क्रमांक बदलण्यात आल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर पोलिसांनी अन्सारीला अटक केली. चौकशीत आसिफने भिवंडी येथे राहत असल्याचे सांगितले. पूर्वी तो मालाडमधील जुन्या कलेक्टर कंपाऊंड परिसरात राहात होता. त्याच्याविरोधात १८ गुन्ह्यांची नोंद असून त्यात घरफोडी, सरकारी कामात अडथळा निर्माण करणे, अशा प्रकारच्या गुन्ह्यांची नोंद आहे. दिंडोशी पोलिसांच्या हद्दीत झालेल्या दोन घरफोड्यांमध्ये आरोपीचा सहभाग असल्याचे चौकशीत उघड झाले.