स्वयंरोजगारासाठी २७ हजार महिलांना अर्थसाह्य

स्वयंरोजगारासाठी २७ हजार महिलांना अर्थसाह्य

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १२ ः पालिकेच्या नियोजन विभागामार्फत २७ हजार महिलांना स्‍वयंरोजगारासाठी शिलाई, घरघंटी आणि मसाला कांडप आदी संयंत्र सामुग्रीसाठी अर्थसाह्य प्रदान करण्याचा शुभारंभ मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्‍या हस्‍ते उद्या (ता. १३) सायंकाळी पाच वाजता सोमय्या मैदान, चुनाभट्टी येथे होणार आहे. या वेळी प्रातिनिधिक स्वरूपात २५ महिलांना अर्थसाह्य लाभार्थी प्रमाणपत्र प्रदान करण्यात येणार आहे.
महाराष्‍ट्राचे शालेय शिक्षणमंत्री आणि मुंबई शहर जिल्‍हा पालकमंत्री दीपक केसरकर, पर्यटन मंत्री आणि मुंबई उपनगर जिल्‍हा पालकमंत्री मंगल प्रभात लोढा, स्‍थानिक खासदार राहुल शेवाळे, आमदार मंगेश कुडाळकर, सुनील शिंदे, राजहंस सिंह या वेळी उपस्थित राहणार आहेत. पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल हे समारंभाच्या अध्‍यक्षस्थानी आहेत, अशी माहिती पालिकेचे अतिरिक्त आयुक्त आशीष शर्मा यांनी दिली.
पालिकेच्या नियोजन विभागामार्फत महिला सक्षमीकरणासाठी विविध योजना प्रभावीपणे राबविण्‍यात येत आहेत. महिला, दिव्यांग, ज्येष्ठ नागरिक, तृतीयपंथी यांच्या सामाजिक कल्याणासाठी पालिका वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून प्रयत्न करीत आहे. महिलांचा जीवनस्तर उंचावणे व त्यांचे आर्थिक सक्षमीकरण यासाठी महापालिका नेहमीच सकारात्मक दृष्टिकोन ठेवून वेगवेगळ्या मार्गाने मदत करत असते. महिला स्वावलंबी व स्वयंपूर्ण व्हाव्यात, त्यांचा विकास व्हावा, त्यांचे जीवनमान उंचावणे शक्य व्हावे, विकासकामांमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग लाभावा, यासाठी जेंडर बजेट अंतर्गत निरनिराळ्या योजनांची अंमलबजावणी करण्यात येत आहे. यामध्ये योजनेच्या निकषानुसार पात्र ठरणाऱ्या महिलांना स्वयंरोजगारासाठी यंत्रसामुग्री खरेदी करता यावी म्हणून अर्थसाह्य देण्यात येते, अशी माहिती पालिकेने दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com