एमआयडीसीच्या भूसंपादनाला विरोध

एमआयडीसीच्या भूसंपादनाला विरोध

उरण, ता. १३ ः विकासाच्या नावाखाली शासनाने देशोधडीला लावल्याची भावना उरण तालुक्यातील स्थानिकांमध्ये झाली आहे. अशातच २३ मे रोजी सारडेतील प्रकल्पासाठी बाधित जमिनींची मोजणी होणार असल्याची नोटीस देण्यात आली आहे. त्यामुळे आक्रमक झालेल्या ग्रामस्थांनी तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे.
उरण तालुक्यात आजपर्यंत शेकडो मोठमोठे प्रकल्प आले आहेत. आता उर्वरित शेती शिल्लक असलेल्या पूर्व विभागातील सारडे, वशेणी व पुनाडे गावांतील शेतकऱ्यांच्या जमिनी एमआयडीसीसाठी घेण्यात येणार आहेत. जानेवारी महिन्यात संबंधित प्रकल्पाच्या विरोधात पूर्व विभागातील शेतकऱ्यांनी हरकती घेतल्या आहेत; परंतु त्या हरकतींना शासनाने केराची टोपली दाखवली आहे. शिवाय प्रकल्प काय आहे. त्याचा शेतकऱ्यांना मोबदला काय मिळेल, याची काहीही माहिती शेतकऱ्यांना दिलेली नाही. त्यामुळे पुनाडे, सारडे, वशेणी गावांतील जमिनींच्या होणाऱ्या मोजणीने कायदा व सुव्यवस्था बिघडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे प्रशासनाने शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन पुढील निर्णय घ्यावा, अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.
----------------------
भूसंपादन कोणत्या कायद्याच्या आधारे केले जात आहे, याबाबत शासनाने सांगितलेले नाही. मोबदला किती, पुनर्वसन याबाबत कोणतेही धोरण ठरलेले नसताना जमीन संपादनाची प्रक्रिया केली जात आहे.
- मनोज पाटील, अध्यक्ष, सारडे ग्रामविकास कमिटी
---------------------------------------
प्रकल्पाबाबत शासनाने कोणतीही माहिती दिलेली नाही. तसेच या प्रकल्पाच्या विरोधात घेतलेल्या हरकतींवर निर्णय झालेला नाही. त्यामुळे आमच्या जमिनी कवडीमोल भावात देण्याला कायम विरोध राहील.
- रोशन पाटील, सरपंच, सारडे ग्रामपंचायत
---------------------------------------------
आमचा विरोध विकासाला नाही, पण या विकासाच्या नावावर भूसंपादन होणार आहे. त्यावर नक्की कोणता प्रकल्प येणार आहे, याबाबत स्थानिकांना विश्वासात घेणे गरजेचे आहे. जोपर्यंत शासनाची भूमिका स्पष्ट होत नाही, तोपर्यंत आम्ही जमिनींची मोजणी करू देणार नाही.
- संग्राम पाटील, सदस्य, वशेणी ग्रामपंचायत

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com