तहानलेल्या पाड्यांची तृष्णा भागविणारा ''मदतीचा हात'' | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

तहानलेल्या पाड्यांची तृष्णा भागविणारा ''मदतीचा हात''
तहानलेल्या पाड्यांची तृष्णा भागविणारा ''मदतीचा हात''

तहानलेल्या पाड्यांची तृष्णा भागविणारा ''मदतीचा हात''

sakal_logo
By

तहानलेल्या आदिवासी पाड्यांना ‘मदतीचा हात’
दुष्काळी भागात मुंबईतील संस्थेद्वारे पाणी, शिक्षणासाठी आर्थिक हातभार

गायत्री श्रीगोंदेकर, मुंबई
--
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या शहापूरमधील आदिवासी पाड्यांवर जानेवारीपासूनच उन्हाळ्याची चाहूल लागते. उन्हाळ्यात तर तिथे पाण्याची भीषण टंचाई निर्माण होते. अशा दुष्काळी भागातील आदिवासी पाड्यांची तहान भागविण्याचा प्रयत्न ‘हेल्पिंग हॅण्ड’ सामाजिक संस्था अनेक वर्षांपासून करत आहे. सोबतच तेथील तरुण व महिलांचे उच्च शिक्षण, आरोग्य आणि विकासावरही संस्थेमार्फत काम सुरू आहे.
--
शहापूरला धरणांचा तालुका म्हटले तर वावगे ठरणार नाही. तानसा, वैतरणा आणि भातसा अशी मोठी धरणे तिथे आहेत. खराडा आणि जांभा डोळखांबसारखी छोटी धरणे आणि चोंढा प्रकल्प ही शहापूर तालुक्याची वैशिष्ट्ये आहेत. मुंबईच्या पाण्याची गरज शहापुरातील तीन मोठी धरणे पूर्ण करीत आहेत; तरीही तेथील ९० टक्के आदिवासी पाड्यांवर उन्हाळ्यात विहिरी, पाण्याचे झरे व तलाव कोरडे पडतात. अशा वेळी कुठे तरी एखाद्या झऱ्यातून वा विहिरीतून कोसो अंतर पार करून चालत जात पाणी घेऊन यायचे म्हणजे महिलांसाठी मोठी कसरत. अगदी चार ते पाच वर्षांच्या लहान लेकरांपासून ऐंशीतल्या म्हाताऱ्या बाईपर्यंत प्रत्येक स्त्रीच्या नशिबात पाण्यासाठी वणवण असतेच. गावातील एका कुटुंबाला लागणारे किमान दोनशे लिटर पाणी भरण्यासाठी डोक्यावर हंडे घेऊन साधारण ४-५ किलोमीटर चालत जावे लागते. डोक्यावर आग ओकणारा सूर्य, घशाला कोरड; पण कुटुंबाची तहान भागविण्यासाठी महिला रोजच अशी वणवण करत असतात. त्याची दखल घेत ‘हेल्पिंग हॅण्ड’ परिवारामार्फत जमेल तसे एका पाड्यासाठी दोन टँकर पाणी देण्याचा प्रयत्न केला जातो. त्यानुसार दर आठवड्याला एका गावाला दोन टँकर पाणी देण्याचे ठरविले जाते. संस्थेचे स्वयंसेवक स्वतः टँकरसोबत पाणीवाटपासाठी उभे राहतात. कारण पाड्यांवर पाण्यावरून मोठे वाद होतात. विशेषतः महिलांची भांडणे टाळण्यासाठी संस्थेतील सदस्यांमार्फत पाणीवाटप केले जाते. प्रत्येकाला समप्रमाणात पाणी मिळेल, असा संस्थेचा प्रयत्न असतो.

‘हेल्पिंग हॅण्ड’ संस्था आदिवासी पाड्यांवरील महिलांच्या आरोग्यविषयक बाबींवर विशेष काम करते. संस्थेच्या माध्यमातून आदिवासी पाड्यांवरील महिला आणि आश्रमशाळेत शिकणाऱ्या तरुणींमध्ये ‘मासिक पाळी’बाबत जनजागृती केली जाते. संस्थेमार्फत आदिवासी पाड्यांवर आरोग्य शिबिरांचे आयोजन केले जाते. मात्र, पाण्याचे भीषण संकट, पुरेशी उत्पन्नाची साधने हातात नसणे आणि पर्यायाने येणाऱ्या आरोग्यविषयक समस्यांमुळे संस्थेने त्या त्या साखळीतील एकेका विषयावर काम करण्याचे ठरविले. जेव्हा संस्थेने शहापूरमधील खर्ली, मुसई, पोकळ्याची वाडी इत्यादी परिसरात मेडिकल कॅम्प सुरू केले तेव्हा त्यांना बालक आणि गर्भवतींमध्ये कुपोषणाचे प्रमाण अधिक असल्याचे आढळून आले. त्यानुसार आदिवासी पाड्यांवरील गर्भवतींसाठी पोषण आहार उपक्रम संस्थेने हाती घेतला. त्याअंतर्गत ड्रायफ्रूट, खजूर, कडधान्य, खारीक, फळ, शेंगदाणे, गूळ, राजगिरा इत्यादी पदार्थ पोषण आहारात गर्भवतींना आणि बालकांना मोफत दिले जातात. मासिक पाळी, स्वच्छता आणि सॅनिटरी पॅडच्या वापराबाबत महिलांमध्ये समज आली आहे. मात्र, पाड्यावर सॅनिटरी पॅड सहज उपलब्ध होत नाहीत. उपलब्ध झालेच तर आर्थिक परिस्थिती अत्यंत बेताची असल्यामुळे ते सहसा कोणी विकत घेत नाही. म्हणून संस्थेमार्फत गावागावात दर महिन्याला सॅनिटरी पॅडचे वाटप केले जाते.

मुले शिक्षणासाठी प्रवृत्त!
मी पाड्यावर आज मदतकार्य पोहोचवले. अजून काही दिवस मी ते काम करीन; परंतु आदिवासी बांधवांना स्वतः उत्पन्नाचे साधन उभे करणे गरजेचे आहे. त्यांच्यात आर्थिक स्थैर्य नसल्याने अडचणी उद्‍भवत आहेत. त्यांच्यात शिक्षणाचा दर वाढविणे गरजेचे आहे. म्हणून संस्थेने काही विद्यार्थ्यांना शैक्षणिक दत्तक घेतले आहे. त्यांना मुंबईत उच्च शिक्षण घेण्यासाठी संस्थेमार्फत मदत केली जात आहे. आज मुंबईतील वेगवेगळ्या महाविद्यालयांमध्ये काही विद्यार्थी इंजिनिअरिंग करत आहेत. त्यांच्या आदिवासी पाड्यावरील किंवा गावातील ते पाहिले विद्यार्थी आहेत जे दहावीनंतर उच्च शिक्षणासाठी गावाबाहेर पडले. त्यांनी शिकून पुढे गावासाठी काम करावे, असा आमचा प्रयत्न आहे. त्यांना पाहून अजून काही मुले शिक्षणासाठी प्रवृत्त होत आहेत, ही आमच्यासाठी आनंदाची गोष्ट आहे, असे संस्थेच्या अध्यक्षा डॉ. प्रियांका कांबळे यांनी सांगितले.

इलेक्ट्रॉनिक इंजिनिअरिंगमध्ये डिप्लोमा पूर्ण करून मी सध्या डोंबिवलीमध्ये एका कंपनीत नोकरी करते आहे. आश्रमशाळेत शिक्षण घेत असताना नववीमध्ये मला संस्थेने दहावीत चांगले गुण मिळवल्यास पुढील शिक्षणाचा सर्व खर्च आम्ही करू, असे सांगितले होते. दहावीत मला ७१ टक्के गुण मिळाले. व्हीजेटीआयला माझी ॲडमिशन झाली. मुंबईत शिक्षण घेण्यासाठी संस्थेने आणि माझ्या कुटुंबाने मला खूप सहकार्य केले. आज माझ्याकडे आर्थिक उत्पन्नाचे साधन आहे. मी गावातल्या इतर मुलांना शिक्षण, आरोग्य आणि मूलभूत सुविधांबाबत मार्गदर्शन करते.
- संगीता वेहळे, खर्ली, शहापूर