सामाजिक कल्याणाचा वसा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सामाजिक कल्याणाचा वसा
सामाजिक कल्याणाचा वसा

सामाजिक कल्याणाचा वसा

sakal_logo
By

नितीन पाटील; मुंबई
आशिया खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टी अर्थात धारावी. येथील नागरिक अनेक समस्‍यांचा सामना करत असतात. त्‍यांचे जीवन अधिक सुखकर व्हावे, यासाठी प्रशासकीय स्‍तरावर प्रयत्‍न सुरू आहेत. त्‍याचप्रमाणे सामाजिक संस्‍थाही येथे कार्यरत आहेत. त्‍यापैकी एक म्‍हणजे बुमन वेल्‍फेअर फोरम.

झोपडपट्टीभागात राहणाऱ्या पीडित, शोषित, वंचित, कष्टकरी, असंघटित कामगार, अशिक्षित लोकांपुढील समस्यांचा आवाका फार मोठा आहे. अशा या समाजातील नाकारलेल्या वर्गाला मदतीचा हात देऊन विविध उपक्रमांद्वारे त्यांच्या उन्नतीचा पाया घालण्याचे काम गेल्या दोन दशकांहून अधिक काळ धारावीतील सामाजिक कार्यकर्ते दिलीप गाडेकर पुरुष, महिला सहकाऱ्यांच्या माध्यमातून ‘वुमन वेल्फेअर फोरम’ (डब्‍ल्‍यू. डब्‍ल्यू. एफ.) या सामाजिक संस्थेमार्फत करीत आहेत. अनेक उपक्रमांद्वारे तेथील गरजू आणि उपेक्षितांना उभारी देण्याचे काम संस्‍था करीत आहे. धारावीत जन्माला आलेली संस्था मुंबईतील विविध वस्त्यांमध्ये काम करीत आहे.
धारावीसारख्या बहुभाषिक व समस्यांचे आगार असलेल्या झोपडपट्टीतील श्रमिक, कष्टकरी, पीडित, अशिक्षित मुले, महिला आदी घटकांचे प्रश्न लक्षात घेता प्रथम महिलांना संघटित करून विविध उपक्रमांच्या माध्यमातून महिलांचे सक्षमीकरण व सबलीकरण करावयास हवे आणि त्यासाठी महिलांचे एक भक्कम व्यासपीठ हवे, हे लक्षात घेऊन तेथील एक सामाजिक कार्यकर्ते दिलीप गाडेकर यांनी कल्पना शिंदे, वंदना गाडेकर आदीनां सोबत घेऊन १९८८ मध्ये ‘वुमन वेल्फेअर फोरम’ या संस्थेची स्थापना केली. वस्ती वस्तीतील महिलांनी एकत्रित येऊन महिलांच्या हक्कांसाठी सामाजिक जाणिवेतून महिलांचे हक्काचे व्यासपीठ म्हणून या संस्थेची स्थापना केली गेली. सामान्यांची गरज व महिलांचा प्रतिसाद पाहून केंद्र व राज्य सरकारच्या तसेच मुंबई महापालिकेच्या माध्यमातून विविध कल्याणकारी योजना राबवून महिलांना त्यांच्या हक्काची जाणीव करून देत विविध प्रशिक्षणे आणि बचत गटांच्या माध्यमातून संस्थेने महिलांच्या सक्षमीकरणाच्या पाया घातला आहे.

बालवाड्यांद्वारे शिक्षण
‘वुमन वेल्फेअर फोरम’ने मुलांच्या शिक्षणाबरोबरच स्वयंरोजगार, स्त्री-पुरुष समानता, अंधश्रद्धा निर्मूलन, विविध सरकारी योजना, आपले संविधान अशा विविध क्षेत्रात अनेक उपक्रमांच्या माध्यमातून काम केले आहे. विविध वस्त्यांमधील लहान मुलांच्या शिक्षणाची होणारी हेळसांड लक्षात घेऊन गेली दहा वर्षे मुंबई महापालिका शिक्षण विभागाच्या सहकार्याने पालिकेच्या जी-उत्तर व एफ-उत्तर विभागातील वस्त्यांमध्ये तब्बल ४० बालवाड्या चालून हजारो मुलांच्या शिक्षणाचा पाया घालतानाच त्यांना शिक्षणाच्या मूळ प्रवाहात आणण्याचे काम या संस्थेने केले आहे. यासाठी घरोघरी फिरून कष्टकरी, कामकरी समाजातील समाजाच्या मनातील शिक्षणाबद्दलची अनास्था पुसून शिक्षणाचा प्रचार आणि प्रसार करण्याचे काम संस्थेने केले आहे. विशेषतः या तळागाळातील लोकांमध्ये प्रचंड प्रमाणात असलेली अंधश्रद्धा, शिक्षणाविषयीची नकारात्मकपणा आदी गोष्टी काढून टाकण्यासाठी संस्थेने विविध मेळावे, प्रशिक्षणे, जाणीव जागृती सभा घेऊन लोकांमधील अंधश्रद्धा नष्ट करत त्यांच्या मनात शिक्षणाचे बीज रोवण्याचे काम संस्थेने केले आहे.

बचत गटांची स्‍थापना
संस्थेच्या विविध उपक्रमांपैकी महिला बचत गट हा एक अतिशय वैशिष्ट्यपूर्ण उपक्रम. वस्तीमधील महिलांना एकत्रित करून त्यांना आर्थिक दृष्ट्या सक्षम बनवणे, त्यांच्या हाताला काम मिळून देणे या उद्देशाने वस्ती पातळीवर विविध बचत गट स्थापन करून स्वयंरोजगाराच्या माध्यमातून महिलांचा आर्थिक उन्नतीचा पाया घातला गेला आहे. मुंबई महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या सहकार्याने कचऱ्याचे सुका व ओला अशा स्वरूपात वर्गीकरण करून सुक्या कचऱ्याद्वारे कचरा वेचक महिला व पुरुषांना रोजगाराचे साधन उपलब्ध करून देण्याचा संस्थेचा प्रयत्न आहे.

शि‍बिरांचे आयोजन
भारत सरकार कामगार शिक्षण केंद्र आणि पालिकेच्या समाज विकास प्रकल्प यांच्या संयुक्त विद्यमाने धारावी, चेंबूर परिसरातील श्रमिक, कष्टकरी, मागासवर्गीय, महिलांसाठी, पालक, कामगार, शिक्षण व कायदा, स्त्री आरोग्य, बालसंगोपन, साक्षरता, स्वयंरोजगार, ग्राहक जागृती, बालकांच्या समस्या व पालकांची जबाबदारी आदी विषयांवर विविध गटात महिलांची जागृती शिबिरे घेतली गेली. यामध्ये वस्तीतील शेकडो महिलांनी आपला सहभाग नोंदवला होता.

विविध विषयांवर लढा
वस्तीतील नागरी प्रश्नांना घेऊन संस्‍थेने लढे उभारले आहेत. यामध्ये रेशनिंगसाठी दिलेला लढा महत्त्‍वाचा ठरला. त्‍याचप्रमाणे विविध माध्यमातून संघटनेने सामाजिक दायित्वाचे भान ठेवून समाज उभारणीत भरीव योगदान दिले आहे.

पुरस्‍काराने गौरव
वुमन वेल्फेअर फोरम या संस्‍थेच्या कामगिरीची दखल घेऊन महाराष्ट्र शासनाने २००३-०४ चा ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी पुरस्कार’ देऊन त्‍यांचा गौरव केला आहे.

सामाजिक जाणीव आणि दायित्व स्वीकारून मुंबईतील विविध वस्तींतील महिलांच्या प्रश्‍नांसाठी संस्‍था कार्य करत आहे. त्‍या प्रमाणे अज्ञान, अंधश्रद्धा नष्ट करून महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करून त्यायोगे शोषित, पीडित, मुलांच्या उन्नतीसाठी काम करीत आहे. समाजाने पुढे येऊन संस्थेच्या कार्यास हातभार लावल्यास अधिक वेगाने काम करता येईल.
- दिलीप गाडेकर, संस्थापक, वुमन वेल्फेअर फोरम