जिल्ह्यात मातृत्व वंदन योजना सुसाट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जिल्ह्यात मातृत्व वंदन योजना सुसाट
जिल्ह्यात मातृत्व वंदन योजना सुसाट

जिल्ह्यात मातृत्व वंदन योजना सुसाट

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १३ : गर्भवती आणि स्तनदा मातेला सकस आहार घेण्यास प्रोत्साहित करून जन्माला येणाऱ्या नवजात बालकांचेही आरोग्य सुधारावे. तसेच मातामृत्यू व बालमृत्यू दरात घट होऊन तो नियंत्रित राहावा, प्रधानमंत्री मातृवंदना योजना ही गर्भवती व स्तनदा मातांना याचा लाभ देण्यात येत आहे. त्यानुसार या योजनेअंतर्गत मागील पाच वर्षांत ठाणे जिल्ह्यातील एक लाख ६८ हजार गर्भवती आणि स्तनदा मातांनी याचा लाभ मिळाला आहे. यामध्ये १ लाख २६ हजार १०९ सर्वाधिक महिला या शहरी भागातील असून ग्रामीण भागातील ४२ हजार ६०४ महिलांनी या योजनेचा लाभ घेतला आहे.
ग्रामीण भागात रोजंदारीवर काम करणाऱ्या महिला बाळातपणानंतर आपल्या कामावर गेल्याने त्यांच्या बाळाला आईचे दूध मिळत नाही. यातून कुपोषणाची समस्या जन्म घेते. ही बाब लक्षात घेऊन केंद्र सरकारने ‘प्रधानमंत्री मातृवंदना योजना’ केली. ही योजना ‘राष्ट्रीय आरोग्य अभियान’मार्फत राबविली जाते. योजनेच्या लाभाची पाच हजार रुपयांची रक्कम तीन टप्प्यांत संबंधित लाभार्थी महिलेच्या खात्यात थेट जमा करण्यात येते. योजनेच्या लाभासाठी जातीची व उत्पन्नाची अट नसून, शासकीय सेवेत नसणाऱ्या सर्व महिलांना या योजनेचा लाभ मिळतो. आर्थिक सहाय्याचा पहिला हप्ता गर्भवती मातांनी शासकीय रुग्णालयात नोंद केल्यानंतर मिळतो. दुसरा हप्ता बाळंतपूर्व तपासणी करताना गर्भधारणेच्या ११० दिवसानंतर; तर योजनेतील तिसरा आणि शेवटचा हप्ता हा ती स्त्री प्रसूत झाल्यानंतर बाळाला सर्व लस दिल्याची खात्री केल्यानंतर मिळतो. नोंदणी करतानाच गर्भवती महिलांना आपल्यासह पतीचे आधार कार्ड, स्वत:चे बँक खाते व तपासणी नोंदणी दाखला हे सादर करणे आवश्यक असते. पहिल्या व दुसऱ्या लाभासाठी आधार कार्ड अत्यावश्यक नाही; परंतु तिसऱ्या लाभाकरिता आधार कार्ड महत्त्वाचे आहे. बँकेशी आधार अपडेट नसल्यामुळे अनेक लाभार्थ्यांचे लाभ त्यांच्या बँक खात्यात जमा होत नसल्याच्या तक्रारी लाभार्थ्यांकडून करण्यात येत असतात.
प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजना १ जानेवारी २०१७ पासून कार्यान्वित झाली आहे. त्यानुसार १ जानेवारी २०१७ ते ३० मार्च २०२३ या कालावधीत जिल्ह्याच्या शहरी आणि ग्रामीण भागातील १ लाख ६८ हजार ७१३ महिलांनी प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजेनचा लाभ घेतला आहे. या महिलांना ६२ कोटी ९३ लाख १ हजार रुपये एवढी रक्कम त्यांच्या बँक खात्यावर डीबीटीद्वारे वितरित करण्यात आली आहे. यामध्ये १ लाख २६ हजार १०९ सर्वाधिक महिला या शहरी भागातील महिलांचा समावेश असून ग्रामीण भागातील ४२ हजार ६०४ महिलांनी या योजनेचा लाभ घेतला आहे.
...................................
ठाणे जिल्ह्यातील सर्वच गरोदर मातांना या योजनेचा लाभ देण्यात येत असतो. या योजनेच्या माध्यमातून देण्यात येणाऱ्या अनुदानातून गरोदर मातांना योग्य व सकस आहार घेण्यासाठी सहाय्य होत आहे. त्यातून माता मृत्यू आणि बाल मृत्यू दरात घट होऊन तो कमी करण्यास मदत होत आहे.
- डॉ. गंगाधर परगे, जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद ठाणे.

...............................

तक्ता

२०१७ ते २०२३ पर्यंतचे लाभार्थी
ग्रामीण क्षेत्र
अंबरनाथ ६६९४
भिवंडी ८४००
कल्याण ६९५०
मुरबाड ५३५७
शहापूर ७०८०
.............................................
नगरपालिका क्षेत्र
अंबरनाथ ३२३१
बदलापूर ४८९२
..............................................
महापालिका क्षेत्र
ठाणे २८२१३
नवी मुंबई २८३९३
मिरा-भाईंदर १८५७१
कल्याण-डोंबिवली २७६८३
भिवंडी १४४०२
उल्हासनगर ८८४७