लग्नाची धामधूम जोरात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

लग्नाची धामधूम जोरात
लग्नाची धामधूम जोरात

लग्नाची धामधूम जोरात

sakal_logo
By

स्नेहा महाडिक, ठाणे
लग्न असो वा रिसेप्शन समारंभ सध्या मोठ्या जल्लोषात सुरू आहेत. विवाह नोंदणी कार्यालयांपासून छोट्या-मोठ्या सभागृहाच्या नोंदणीतही चांगलीच भर पडली आहे. सद्यस्थितीत ठाण्यासह इतरत्र ठिकाणचे ९० टक्के हॉल हाऊसफुल्ल झाले आहेत.
नव्या वर्षातील एप्रिल महिन्यापासून लग्नसराईला सुरुवात होते; मात्र विवाह करण्याच्या तारखा या तिथीनुसार मार्चपासून सुरू होतात. हल्ली थाटामाटात लग्न करण्याऐवजी विवाह नोंदणी करत कमी खर्चात करण्याचा तरुणाचा कल अधिक आहे. यंदा नोंदणी विवाहसोबतच हॉलवर लग्न करणाऱ्यांची संख्या अधिक आहे. त्यामुळे विवाह नोंदणी कार्यालय आणि हॉलच्या तारखा बुक झाल्याचे चित्र आहे. ठाणे शहरातील सहदुय्यम निबंधकाच्या विवाह कार्यालयात मार्चपासून विक्रमी विवाहाची नोंद आहे. लग्न करणाऱ्यांना मार्च महिन्यापासून ते १० मेपर्यंत एकूण १०९४ जणांना विवाहाची तारीख दिली. आतापर्यंत ८६९ जोडपे विवाह बंधनात अडकल्याची माहिती सहदुय्यम निबंधक वर्ग-२ चे संजय भोपे यांनी दिली.
ठाण्यात मागच्या पाच वर्षांत छोटे आणि मोठे असे अनेक हॉल होते. लग्नासाठी हॉल उपलब्ध व्हावा यासाठी वराडी कुटुंब पूर्वीच हॉलची बुकिंग करून अन्य तयारीला लागायचे. आता काळ बदलला असल्याने काही तरुण हे हॉलवर शेकडो आप्तेष्टांच्या उपस्थितीत लग्न सोहळा करण्यात इच्छुक असतात. तर काही तरुण-तरुणी विशेषतः कुटुंबीयांच्या विरोधात किंवा प्रेमप्रकरणातून विवाह करणारे तरुण-तरुणी यांची पसंती ही विवाह नोंदणी कार्यालयाकडे अधिक आहे. सध्या ठाण्यात हॉलची संख्या वाढलेली असतानाही ते हाऊसफुल्ल झालेले आहेत. याबाबत एका हॉल मालकाने सांगितले, कोरोनानंतर विवाह मोठ्या प्रमाणात होऊ लागले आहेत. हॉल, लो हॉटेल्स, यांसारखे पर्याय असतानाही सर्वसाधारण हॉलच्या बुकिंग ५० टक्क्यांच्या जास्त आगाऊ बुकिंग सुरू आहेत.

नवे ट्रेण्ड तरीही बुकिंग हाऊसफुल्ल
कोरोनाच्या महामारीनंतर मागच्या वर्षापेक्षा यंदा विवाहाची लगीन सराई जोरात सुरू आहे. यंदा ठाण्यात ५० टक्के बुकिंग असून, तारीख तिथीनुसार इच्छित हॉल मिळणे मुश्कील झाले आहे. विवाह नोंदणी, हॉटेल्समध्ये, शाळेची मैदाने, असे विविध पर्याय असतानाही हॉलच्या बुकिंग हाऊसफुल्ल आहेत. सध्या विवाहाचा तरुणांचा ट्रेण्ड वेगळा आहे, काही विवाह नोंदणी करतात, काही शाही थाटात, हॉटेल्स, लॉन्स, सजावट असलेला हॉल आदींची निवड बजेटनुसार करतात. तरीही सर्वसाधारण आणि मध्यम हॉल बुकिंग हाऊसफुल्ल आहेत.

कायदेशीर विवाह नोंदणी
वाढती महागाई, बेरोजगारी आणि प्रेमप्रकरणे आदींमुळे स्वस्तात मस्त आणि कायद्याच्या चौकटीत विवाह करण्याकडे तरुणांची पसंती आहे. त्यामुळे काही हजारांत पार पडणारे लग्न विवाहनोंदणी कार्यालयाद्वारे होत आहे. यामुळे कायदेशीर आणि विवाह नोंदणीला चांगली पसंती दर्शविण्यात येत आहे.

राजेशाही थाट
दुसरीकडे आजही मोठ्या प्रमाणात विवाह हे हॉल, हॉटेल्स आणि लॉन्स आदींवर राजेशाही थाटात करण्याचा धडाका सुरूच आहे. थोडक्यात, महामारीनंतर स्थिर झालेल्या परिस्थितीमुळे विवाह करणाऱ्यांची संख्या वाढलेली असून हॉल, लॉन्स, हॉटेल्स यांची आगाऊ बुकिंगही झाल्याचे हॉल मालक सांगत आहेत.

महिना नोंदणी तारीख बुक विवाह संपन्न
मार्च, २०२३ ४९० ३४५
एप्रिल,२०२३ ४४२ ३३०
मे, (१० मे पर्यंत) १६२ १९४
===============================
१,०९४ ८६९

यंदा लग्न करणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. ४०० ते ५०० क्षमता असलेल्या हॉलला जास्त प्रमाणात पसंती मिळत आहे. ठाण्यात हॉलची संख्याही वाढली; मात्र ठाणेकर आपल्या आर्थिक बजेटनुसार हॉल बुकिंग करतात. सध्या हॉलची बुकिंग मे, जून, जुलैमध्ये असून
आतापासूनच नोव्हेंबर आणि डिसेंबरसाठी बुकिंग फुल्ल झाले आहेत. आता लोकांना खूप पर्याय आहेत. ठाणे शहरातील ९० टक्के हॉल बुक झाले आहेत.
- विनोद शिंदे, मालक मंगल कार्यालय, श्रीनगर ठाणे