म्हाडाच्या घरांसाठी ताबाप्रक्रिया सुरू

म्हाडाच्या घरांसाठी ताबाप्रक्रिया सुरू

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १३ : म्हाडाच्या कोकण मंडळाच्या ४,६४० घरे आणि १४ भूखंडांसाठी १० मे रोजी ठाण्यात सोडत पार पडली. यातील विजेत्यांनी आता घराचा ताबा मिळवण्यासाठीच्या पुढील प्रक्रिया जाणून घेण्यास सुरुवात केली आहे. त्याचप्रमाणे एसएमएसद्वारे नागरिकांना सर्व माहिती वेळोवेळी कळवण्यात येत आल्याचेही म्हाडाच्या वतीने सांगण्यात आले आहे.
विजेत्यांना सोडत जाहीर झाल्याच्या कार्यालयीन कामकाजाच्या सात दिवसांत स्वीकृतीपत्र म्हाडाला सादर करणे गरजेचे आहे. अर्जदाराची पात्रता निश्चिती झाल्यावर विजेत्यांना तात्पुरते देकारपत्र पाठविण्यात येते. पत्र निघाल्याचा दिनांकापासून १५ दिवस सोडून त्यानंतरच्या ३० दिवसांत सदनिकेच्या एकूण रकमेच्या २५ टक्के रक्कम भरायची आहे. उर्वरित ७५ टक्के रक्कम टप्पा एकच्या मुदतीनंतर ६० दिवसांत भरणे बंधनकारक आहे. या १०५ दिवसांत रकमेचा भरणा न झाल्यास ११ टक्के व्याजदराने ९० दिवस मुदतवाढ दिली जाते; मात्र देकारपत्राच्या १९५ दिवसांत रक्कम भरण्यात कोणतीही कसूर झाल्यास तात्पुरते देकारपत्र रद्द केले जाते. सदनिकेच्या किमतीपैकी एक टक्के रक्कम जप्त केली जाते. शंभर टक्के रक्कम भरणाऱ्या विजेत्यांना पुढील प्रक्रिया पूर्ण करून लगेच ताबा दिला जातो.
...
या अटी लक्षात घ्या!
२० टक्के सर्वसमावेशक योजनेतील लाभार्थ्यांना म्हाडाला एक टक्का प्रशासकीय शुल्क भरावे लागते. उर्वरित रक्कम सदनिकेचा ताबा आणि संबंधित बाबी विकसक आणि विजेता यांच्यात केल्या जातात. ही एक टक्का रक्कम देकार पत्राच्या तारखेपासून ३० दिवसांच्या आत भरावी लागते; तर उर्वरित रक्कम विकसकाने सांगितलेल्या वेळेत भरणे बंधनकारक आहे. यात केवळ गृहकर्ज उभारणीसाठी ना हरकत प्रमाणपत्र म्हाडा देते; तर प्रधानमंत्री दिवस योजनेतील विजेत्यांना स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये नोंदणी झाल्यानंतर ताबा दिला जातो. ही नोंदणी म्हाडाने नियुक्त केलेली म्हाडा नियुक्त एजन्सीमार्फत केली जाते.
...
कागदपत्रे बनावट आढळल्यास...
अर्जदार सोडतीमध्ये यशस्वी ठरल्यानंतर आवश्यक कागदपत्रांमध्ये त्रुटी आढळल्यास अनामत रक्कम प्रशासकीय खर्च म्हणून वजावट केली जाईल. तसेच विक्री किंमत भरणा केली असल्यास एक टक्का रक्कम वजावट केली जाईल. सादर केलेले कागदपत्रे बनावट आढळल्यास कायदेशीर कार्यवाही करून सदनिका ताब्यात घेण्यात येईल व भरणा केलेली विक्री किंमतसुद्धा जप्त केली जाईल, असेही म्हाडाने माहितीपत्रकात म्हटले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com