
बेकायदा लाकूड वाहतूक करणारे आठ ट्रक ताब्यात
शहापूर, ता. १३ (बातमीदार) : परवानगीची आवश्यकता नसलेल्या बाभूळ प्रजातीच्या जळाऊ लाकडांमध्ये अन्य लाकडांची चोरटी वाहतूक करणारे तब्बल आठ ट्रक शहापूरच्या वनाधिकाऱ्यांनी ताब्यात घेतले आहेत. शनिवारी (ता. १३) पहाटे खर्डी व आसनगाव येथे पाळत ठेऊन असलेल्या वनाधिकाऱ्यांनी ट्रकचालकांना ताब्यात घेतले आहे. आठ ट्रकमधील तब्बल दीडशे घनमीटरहून अधिक असलेल्या लाकडांची मोजदाद सुरू करण्यात आली आहे.
शहापूर वनविभागाच्या कार्यक्षेत्रातील शहापूर व खर्डीचे वनपरिक्षेत्र अधिकारी शैलेश गोसावी व लक्ष्मण चिखले यांना लाकडांची बेकायदा वाहतूक होणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार नाशिक-मुंबई महामार्गावर वन पथकासह पाळत ठेवली असताना शनिवारी पहाटेच्या सुमारास आसनगाव येथील परिवार हॉटेल येथे एक ट्रक; तर खर्डी येथील सिटीझन हॉटेल येथे उभ्या असलेल्या सात ट्रकचा संशय आल्याने त्याबाबत चौकशी केली असता त्यामध्ये परवानगीची आवश्यकता नसलेल्या बाभूळ प्रजातीचे जळाऊ लाकूड असल्याचे सांगण्यात आले.
----------------
मोह, आंबा, निलगिरीची चोरी
वनाधिकाऱ्यांनी आठही ट्रक चौकशीसाठी ताब्यात घेतल्यानंतर त्यामध्ये बाभूळ प्रजातीच्या लाकडांव्यतिरिक्त उंबर, मोह, आंबा, निलगिरी आदी विविध प्रकारची लाकडे आढळून आल्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी शैलेश गोसावी व लक्ष्मण चिखले यांनी सांगितले. संगमनेर येथून भिवंडी येथे जाणाऱ्या या आठही ट्रकचालकांना वनाधिकाऱ्यांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले असून या ट्रकमध्ये बाभूळ व्यतिरिक्त कोणकोणत्या प्रजातीच्या लाकडांची बेकायदा वाहतूक केली जात होती हे पाहण्यासाठी ट्रकमधील लाकडांची आसनगाव येथील वनक्षेत्रात मोजदाद सुरू करण्यात आली आहे. चौकशीनंतर योग्य ती कारवाई करण्यात येणार असल्याचे गोसावी यांनी सांगितले.