मोखाड्यातील पूल स्ट्रक्चरल ऑडिटविना | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मोखाड्यातील पूल स्ट्रक्चरल ऑडिटविना
मोखाड्यातील पूल स्ट्रक्चरल ऑडिटविना

मोखाड्यातील पूल स्ट्रक्चरल ऑडिटविना

sakal_logo
By

भगवान खैरनार : सकाळ वृत्तसेवा

मोखाडा, ता. १८ : तालुक्यातील विविध मार्गांवरील अनेक पुलांची दुरवस्था झाली आहे. पावसाळ्यात काही पूल पाण्याखाली जात असल्याने वाहतूक बंद होते. या ठिकाणी नवीन पूल उभारण्याची अथवा जुन्या पुलांच्या दुरुस्तीची आवश्यकता आहे. बांधकाम विभागाने नवीन पुलांचे, तसेच दुरुस्तीचे अंदाजपत्रक सरकारकडे सादर केले आहे. मात्र, त्यास मंजुरी मिळालेली नाही. तसेच तालुक्यातील किती पूल धोकादायक अथवा कमकुवत आहेत, याची माहिती असणे आवश्यक आहे. मात्र, त्याचे स्ट्रक्चरल ऑडिट झालेले नाही. मात्र, नागरिकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे.

कोकणातील सावित्री नदीवरील पूल खचून झालेल्या दुर्घटनेत अनेक प्रवाशांना जीव गमवावा लागला होता. त्या घटनेनंतर राज्यातील कमकुवत पुलांचा प्रश्न ऐरणीवर आला होता. अनेक ठिकाणी पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट झाले. त्या दरम्यान खोडाळा-वाडा मार्गावरील तीळमाळ येथील धोकादायक पुलाचे वास्तव ‘सकाळ’ने बातमी प्रसिद्ध करून समोर आणले होते. त्याची दखल घेत सरकारने दोन वर्षांत नवीन पूल बांधला. या व्यतिरिक्त तालुक्यात अन्य मार्गांवरच्या पुलांची दुरुस्ती व नवीन पूल बांधणे गरजेचे असल्याचे समोर आले आहे.

डहाणू-जव्हार-मोखाडा-त्र्यंबकेश्वर राज्यमार्गावर मोरचोंडी जवळ, तसेच केळघर फरशीजवळच्या पुलांची दुरवस्था झाल्याने त्यांची दुरुस्ती करणे आवश्यक आहे. हा राज्यमार्ग आता राष्ट्रीय महामार्गाकडे वर्ग करण्यात आला आहे. त्यामुळे त्या पुलांच्या बांधकामाचा प्रश्न रखडला आहे.

पालघर-वाडा-देवगाव राज्यमार्गावर परळी गावाजवळील पुलाच्या पिलरच्या लोखंडी सळ्या दिसत आहेत. त्यामुळे हा पूलही धोकादायक बनला आहे. तथापि हा मार्ग एनयुटी हायब्रीड योजनेंतर्गत देखभाल-दुरुस्तीसाठी खासगी कंत्राटदारास देण्यात आला आहे. त्यामुळे या पुलाची दुरुस्ती सरकारच्या मंजुरीविना रखडली आहे.

मोखाडा-खोडाळा-विहीगाव राज्यमार्गावर देवबांध घाटात आणि जोगलवाडी पुढे गारगई नदीवरील ब्रिटिशकालीन अरुंद पूल आहे. गारगई नदीवरील पुलाचे कठडे तुटले आहेत. पिलरचे सिमेंट गळून पडल्याने, दगडी मोकळ्या झाल्या आहेत. त्यामुळे पुलाचे नवीन बांधकाम होणे आवश्यक आहे.

पालघर-वाडा-देवगाव आणि मोखाडा-खोडाळा-विहीगांव हे दोन्ही राज्यमार्ग, मुंबई-आग्रा आणि मुंबई-अहमदाबाद या दोन्ही राष्ट्रीय महामार्गाला जोडणारे, तसेच त्यांचा रहदारीसाठी पर्यायी मार्ग म्हणून वापर होतो; तर मोखाडा- बेरिस्ते आणि पोशेरा-हिरवे-बेरिस्ते या मार्गावरील पूल पावसाळ्यात पाण्याखाली जातात. त्यामुळे अतिवृष्टीत येथील नागरिकांचा तालुक्याशी संपर्क तुटतो. या सर्व मार्गांवर प्रवाशांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे.

सावित्री नदीवरील दुर्घटनेनंतर पालघर जिल्ह्यातील प्रशासनाला अद्याप जाग आलेली नाही. त्वरित स्ट्रक्चरल ऑडिट करून धोकादायक पुलांची आकडेवारी जाहीर करावी.
- अमोल पाटील, वाहनचालक

पावसाळ्यापूर्वी व पावसाळ्यानंतर आमच्या विभागाकडून पुलांची पाहणी केली जाणार आहे.
- विशाल अहिरराव, उपअभियंता

तालुक्यातील बहुतांश ठिकाणी नवीन पुलांचे अंदाजपत्रक तयार करून वरिष्ठ कार्यालयाला मंजुरीसाठी पाठवण्यात आले आहेत. तसेच दुरुस्तीचे अंदाजपत्रक बनवण्यात आले आहेत. मात्र, त्यास अद्याप मंजुरी मिळाली नाही.
- सुरेश बोडके, शाखा अभियंता, सार्वजनिक बांधकाम उपविभाग,
मोखाडा