दृष्‍टीक्षेप

दृष्‍टीक्षेप

आदर्श महिला पुरस्कारांचे वितरण
घाटकोपर (बातमीदार) ः विद्या विकास एज्युकेशन सोसायटी आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने शिक्षण तपस्विनी विद्या राऊत यांच्या स्मरणार्थ आयोजित ‘आदर्श महिला पुरस्कार’ वितरण सोहळा विद्या विकास एज्युकेशन सोसायटीच्या सभागृहात आयोजित करण्यात आला. शिक्षण, उद्योग, कला, व्यवसाय व इतर क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या महिलांचा गौरव करण्यात आला. या वेळी आरपीआयच्या राष्ट्रीय नेत्‍या सीमा आठवले आणि विद्या विकास एज्युकेशन सोसायटीच्या व्यवस्थापन प्रतिनिधी डॉ. अनघा राऊत यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सुजाता घोडके यांना शिक्षण क्षेत्रातील कामगिरीबद्दल वुमन्स अचिव्हर्स हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. पद्मश्री पुरस्कारप्राप्त प्रसिद्ध उद्योजिका कल्पना सरोज, उपजिल्हाधिकारी वंदना गेवराईकर, पायलट रूपाली वाघमारे, वंदे भारत पायलट सुरेखा यादव, जे. जे. अधिष्ठाता डॉ. पल्लवी सप्रे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक शुभदा चव्हाण, अभिनेत्री नूतन जयंत, मेघा घाडगे, निशा परुळेकर, क्रांती रेडकर, सिया पाटील या सर्व ‘आदर्श महिला’ पुरस्काराच्या मानकरी ठरल्या. या कार्यक्रमात विद्या विकास एज्युकेशन सोसायटीचे सचिव डॉ. विनय राऊत, माजी सामाजिक न्याय राज्यमंत्री अविनाश महातेकर आणि माजी आमदार मंगेश सांगळे यांची उपस्थिती लाभली होती.

कांदिवलीत सामूहिक विवाह सोहळा
कांदिवली (बातमीदार) ः कांदिवली पश्चिम येथील भुराभाई सभागृहाच्या भव्य पटांगणात सामूहिक विवाह सोहळा नुकताच पार पडला. आमदार योगेश सागर यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पार्टी आणि बाप्पा सीताराम सेवा मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने या सोहळ्याचे आयेजन करण्यात आले होते. या वेळी वधू-वरांस आशीर्वाद देण्यासाठी खासदार गोपाळ शेट्टी यांच्यासह अनेक संस्थांचे पदाधिकारी, माजी नगरसेवक सहभागी झाले होते. एकूण १६ दाम्पंत्यांचा विवाह या वेळी पार पडला. आमदार योगेश सागर यांनी १२ वर्षांपूर्वी बाप्पा सीताराम सेवा मंडळाच्या सहकार्याने सामूहिक विवाह सोहळ्यास सुरुवात केली. त्‍यांनी आजतागायत २०० हून अधिक मुलींचे कन्यादान केले. चार महिन्यांपासून गरिब कुटुंबातील नागरिकांना नाव नोंदणीसाठी आवाहन करण्यात होते. माजी नगरसेविका लीना देहेरकर आणि वार्ड अध्यक्ष किशोर विटलानी यांनी संपूर्ण पूर्व तयारी केली. प्रत्येक जोडप्याला संसारास उपयुक्त असणाऱ्या सर्व वस्तू, जसे कपाट, भांडीसह रोख रकमेचा आहेर देण्यात आला.

किलाचंद यादव यांचा सन्मान सोहळा
मुलुंड (बातमीदार) ः अखिल भारतीय यादव महासभेचे मुंबई अध्यक्ष आणि ज्‍येष्‍ठ समाजसेवक किलाचंद यादव यांचा सन्मान सोहळा नुकताच आयोजित करण्यात आला होता. या प्रसंगी ज्‍येष्‍ठ समाजसेवक डॉ. बाबुलाल सिंह, युवा ब्रिगेड असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. सचिन सिंह, पालिकेचे शिक्षण समितीचे माजी सदस्य एस. के. सिंह, महाराष्ट्र यदुवंशी आदींच्या उपस्थितीमध्ये किलाचंद यादव यांना सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी ज्येष्ठ समाजसेवक डॉ. बाबुलाल सिंग म्हणाले की, किलाचंद यादव हे गेल्या ४० वर्षांपासून सामाजिक, राजकारण आणि सांस्कृतिक क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत. ते एक उत्कृष्ट वक्तेदेखील आहेत. विशेष म्हणजे किलाचंद यादव हे मागासलेले, गरीब, दलित, शोषित आणि वंचित वर्गाच्या प्रगतीसाठी आणि सक्षमीकरणासाठी सातत्याने झटत आहेत. त्यांच्या या कार्यासाठी त्यांना गौरवण्यात आले आहे.

आंबा महोत्सवाला उत्‍स्फूर्त प्रतिसाद
मुंबादेवी (बातमीदार) : मुंबईच्या दादर शिवाजी पार्क येथील बीएमसी क्रीडा भवन मैदानात भव्य आंबा महोत्सव आयोजित करण्यात आला होता. याचे उद्‌घाटन शुक्रवारी (ता. ११) आंबा दिंडी काढत करण्यात आले. १४ मेपर्यंत चाललेल्‍या या महोत्‍सवाला नागरिकांचा उत्‍स्‍फूर्त प्रतिसाद मिळाला. याचे आयोजन विक्रांत आचरेकर यांच्या नेतृत्वात करण्यात आले होते. महाराष्ट्र आणि इतर राज्यातल्या आंबा व्यावसायिकांना हक्काची बाजारपेठ मिळवून देणे आणि ग्राहकांना उत्तम दर्जाचे फळ रास्त दरात उपलब्ध करून देणे हे या महोत्सवाचे प्रमुख उद्दिष्ट होते. सोबतच आंब्यापासून बनलेल्या पदार्थांची चवही या महोत्सवादरम्यात ग्राहकांना चाखता यावी म्हणून अनेक खाद्य पदार्थांचे स्टॉल महोत्सवात उभारण्यात आले होते.

धारावीतील पादचारीपूल अंधारात
धारावी (बातमीदार) : धारावीतून माहीम स्थानकाकडे जाण्यासाठी एमएमआरडीएतर्फे पादचारी पूल उभारण्यात आला आहे. मात्र गेले काही दिवसांपासून या पुलावरील दिवे बंद असल्याने रात्रीच्या वेळी येथे अंधार पसरत आहे. यामुळे पादचारी संताप व्यक्त करत आहेत. पादचारी पुलावरील दिवे बंद असल्याने पादचाऱ्यांना मोबाईल टॉर्चच्या उजेडात ये-जा करावी लागत आहे. या ठिकाणी सुरक्षा व्यवस्था नसल्याने रात्रीच्या वेळी अंधारात महिला व मुलींना पदाचारी पुलावरून जाणे जोखमीचे झाले आहे. तसेच येथे गुंड प्रवृत्तीच्या तरुणवावर वाढल्‍याने प्रशासनाने याबाबत त्‍वरित कार्यवाही करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

काँग्रेसच्या विजयाचा मालाडमध्ये जल्लोष
मालाड (बातमीदार) ः कर्नाटकात काँग्रेसच्या ऐतिहासिक विजयाचा जल्लोष मालाडमध्ये मुंबई काँग्रेस सचिव संतोष चिकणे यांच्या कार्यालयात करण्यात आला. या वेळी आमदार आणि माजी मंत्री अस्लम शेख यांच्या प्रमुख उपस्थितीत लाडूवाटप करत कार्यकर्त्यांनी कर्नाटकमधील काँग्रेसच्या ऐतिहासिक विजयाचा आनंद साजरा केला. याप्रसंगी माजी नगरसेवक नानू सोढा, ब्लॉक अध्यक्ष पंकज कपूर, मुर्गन पिल्लई, आरोक्या मेरी, संगीता अँथोनी यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्‍थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com