महिलांनी महिलांसाठी टाका ‘पुढचं पाऊल’ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

महिलांनी महिलांसाठी टाका ‘पुढचं पाऊल’
महिलांनी महिलांसाठी टाका ‘पुढचं पाऊल’

महिलांनी महिलांसाठी टाका ‘पुढचं पाऊल’

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. १४ : आजच्या घडीला महिलांनी प्रत्येक क्षेत्रात उत्तुंग भरारी घेत आपला ठसा उमटविला आहे. महिला प्रगती करत असतानाच कुठेतरी त्या आजही काही जुन्या विचारांच्या जोखडात बांधल्या गेल्या आहेत. या जोखडातून मुक्त होण्यासाठी महिलांनीच महिलांना मदत केली पाहिजे. प्रत्येक महिला शारीरिकदृष्ट्या सुदृढ, आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी महिलांनीच महिलांना मदत केली पाहिजे. सावित्रीबाईंचे विचार आणि बाबासाहेबांची राज्यघटना वाचून स्वतःमध्ये वैचारिक प्रगल्भता महिलांनी आणली पाहिजे, असे मोलाचे मार्गदर्शन शनिवारी महिलांना लाभले. निमित्त होते ते ‘सकाळ’ माध्यम समूह आणि कॅनेस्टेन आयोजित ‘पुढचं पाऊल’ उपक्रमाचे. वैचारिक बोध घेत आपल्यापासून सुरुवात करायची, हा निर्धार या वेळी ठाणेकर महिलांनी करत ‘पुढचं पाऊल’ टाकले.
‘सकाळ’ वृत्तसमूह आणि कॅनेस्टेन यांच्या वतीने शनिवारी ठाण्यातील कांती विसारीया सभागृहात खास महिलांसाठी ‘पुढचं पाऊल’ या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. दैनंदिन आयुष्यातून थोडा वेळ स्वतःसाठी देताना मनोरंजनात्मक खेळांचा आस्वाद घेत महिलांनी या कार्यक्रमात उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या कार्यक्रमात महिलांना मार्गदर्शन करण्यासाठी राज्य महिला आयोग अध्यक्ष रूपाली चाकणकर, मराठी मनोरंजन चित्रपट सृष्टीतील आघाडीची अभिनेत्री ऊर्मिला कानेटकर, प्रसिद्ध अभिनेत्री जुई गडकरी, तन्वी मुंडले, प्रसिद्ध स्त्रीरोग आणि प्रसूतीतज्ज्ञ डॉ. अलका गोडबोले, आहारतज्ज्ञ किनीत हजारे, केसरी टूर्सच्या संचालक झेलम चौबळ उपस्थित होते.
राजकीय, आरोग्य, सामाजिक, पर्यटन, कलाविश्व आदी क्षेत्रात उपस्थित मान्यवरांनी आपला वेगळा ठसा उमटविला आहे. चूल-मूल यातून महिला बाहेर पडून आज विविध क्षेत्रात आपली ओळख बनवित आहे. समाजात त्यांची जागा आहे, पण ती त्यांना सिद्ध करावी लागते. ही जागा जेव्हा त्यांना सिद्ध करावी लागणार नाही तेव्हा विकास झाला असे म्हणावे लागेल, असे विचार उपस्थित मान्यवरांनी मांडले. घर, संसार, नोकरी सांभाळताना महिलांनी स्वतःकडे लक्ष दिले पाहिजे. शारीरिक, आर्थिकदृष्ट्या प्रत्येक महिला सक्षम असली पाहिजे, असा सल्ला या कार्यक्रमाच्या माध्यमातून मान्यवरांनी दिला.
विचारांचा खजिना लुटण्यासोबतच महिलांनी विविध खेळांच्या माध्यमातून बक्षिसांची लयलूट यावेळी केली. बक्षीस मिळविण्यापेक्षा आजूबाजूला कोणी टोकणार नाही, मनासारखं बाडगा, उड्या मारा, खेळ खेळा यामुळे त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद दिसून आला.
कार्यक्रमादरम्यान काढलेल्या लकी ड्रॉच्या माध्यमातून खास नाशिक येथून आणलेल्या पैठणीच्या मानकरी ठरल्या त्या अलका बोऱ्हाडे. यासोबतच स्मिता आणि सुगंधा पंडित यांनाही लकी ड्रॉच्या माध्यमातून बक्षीस देण्यात आले.


क्षणचित्रे
राज्य महिला आयोग अध्यक्ष रूपाली चाकणकर यांचा महिलांसाठीचा लढा, त्यांना झालेला विरोध याविषयी किस्से ऐकताना, त्यांनी यशस्वीपणे दिलेल्या लढ्याला महिलांना टाळ्या वाजवून दाद दिली.
मराठी मनोरंजनसृष्टीतील अभिनेत्री ऊर्मिला कानेटकर हिची उपस्थिती.
अभिनेत्री जुई गडकरी हिचा आत्मविश्वास, महिलांना समाजात महिला म्हणून ओळख नेमकी काय, हे कौशल्याने सांगताना महिलांनी केले जुईचे समर्थन.
डॉ. अलका गोडबोले यांचे त्वचेचे विकार आणि ते दूर ठेवण्यासाठी मिळाले मार्गदर्शन.
विविध खेळ आणि बक्षिसांची महिलांनी सयलूट केली, बक्षीस मिळताच संगीतावर ठेका धरत अनेकींनी आपला आनंद साजरा केला.