
वृक्षतोडीच्या शासन नियमांची पायमल्ली
जुईनगर, ता. १४ (बातमीदार)ः झाडे लावा झाडे जगवा, हा संदेश सर्वजण देतात. मात्र, त्याचे पालन होत नसल्याने नवी मुंबईमध्ये विकासाच्या नावाखाली झाडांचे स्थलांतर अथवा तोड केली जात आहे. त्यामुळे विकासाच्या नावाखाली झाडांचा नाहक बळी दिला जात असून शासन नियमांची होत असलेली पायमल्ली चिंतेचा विषय बनली आहे.
नवी मुंबई शहरातील विकासकामांच्या आड येणाऱ्या वृक्षतोडीप्रकरणी पर्यावरणप्रेमी, राजकीय, सामाजिक संघटनांनी नेहमीच विरोध केला आहे. मात्र, तरीदेखील नवी मुंबई महापालिका स्थापन झाल्यापासून गेल्या तीन दशकात नागरी विकास कामाच्या आड आलेल्या बहुतांश वृक्षांची थेट तोड करण्यात आली आहे. त्यामुळे वृक्षांचे संवर्धन करण्यासाठी नवी मुंबई महापालिकेच्या उद्यान विभागाने केलेल्या प्रयत्नांवर नेहमीच प्रश्न उपस्थित केले जात आहेत. अशातच वृक्ष संवर्धनासाठी शासनाकडून कठोर धोरणे ठरवण्यात आली आहेत. मात्र, असे असतानाही नवी मुंबई शहरात या नियमांची राजरोसपणे पायमल्ली होत असल्याची नाराजी पर्यावरण प्रेमींकडून व्यक्त केली जात आहे.
-------------------------------
नियम काय सांगतो?
- नागरी विकासकामांच्या आड येणाऱ्या वृक्षांचे स्थलांतरित करणे किंवा तोड करून त्या बदल्यात संबंधित ठेकेदार व विकसकांनी मोकळ्या भूखंडावर वृक्षलागवड करून त्याचे तीन वर्षे संगोपन करावे.
- वृक्ष स्थलांतरित केले, तर विकसक किंवा ठेकेदारांनी सहा वर्षे त्याचे संगोपन केले पाहिजे. एखादा वृक्ष मुळासकट तोडल्यास त्याची उंची जेवढी फूट असेल तेवढी झाडे एका वृक्षाच्या मागे लावावीत.
- एखादा घटक जमिनीअभावी वृक्ष लागवड करण्यास हतबल ठरल्यास त्याने प्रत्येकी झाडा मागे २,१०० रुपयांची रक्कम महापालिकेकडे जमा करावी.
-------------------------------------------------
३४ अशोकाच्या झाडांची तोड
वाशी रेल्वे स्थानकाच्या जवळ असलेल्या रिअल टेक पार्कच्या समोर तसेच आसाम भवनासमोरील वाशी येथील रोड दुभाजकांवरील तब्बल ३४ अशोकाची झाडे तोडण्यात आलेली आहेत. ही झाडे खासगी जाहिरातदारांनी स्वतःच्या स्वार्थासाठी तोडल्याचे निदर्शनास आले आहे. तसेच घणसोली नोडमधील नागरी कामे, दिघा येथील एमआयडीसीतील रस्त्याचे काम करताना झाडांचे सवर्धन झाले नसल्याचा आरोप पर्यावरण प्रेमींकडून केला जात आहे.
------------------------------------------
‘या’झाडांचा लवकरच बळी
नवी मुंबईतील एमआयडीसी क्षेत्रात एकूण २,८२९ वृक्ष आहेत. त्यातील सानपाडा सर्व्हिस रोड ते उरण फाटा, वाशी येथे उड्डाणपुलाच्या आड येणारी ४०० झाडे, शिरवणे सर्व्हिस रोड टाटा प्रेस क्षेत्रात पुन्हा ३०३, तर नव्याने नागरी विकास कामाच्या आड येणाऱ्या शहरातील जुईनगर १३, नेरूळ २, तुर्भे रेल्वे कॉलनी ११ तर ऐरोली ५ अशी एकूण ३१ झाडे तोडणे किंवा स्थलांतरित करण्याचा प्रस्ताव नवी मुंबई मनपा उद्यान विभागाच्या पटलावर आहे
---------------------------------------------
विकासाच्या नावाखाली तोडलेल्या अथवा स्थलांतरित केलेल्या झाडांची आकडेवारी नवी मुंबई महापालिकेच्या उद्यान विभागाकडून मिळत नाही. तसेच महापालिकेकडे झाडे स्थलांतरित करण्याची आधुनिक यंत्रणाही नाही.
- आबा रणावरे, वृक्षप्रेमी, जुईनगर
---------------------------------------------------
पालिकेकडून मियावाकी प्रकल्प राबवून वृक्षसंवर्धनासह रोप लागवडही केली जात आहे. तसेच खासगी विकसक, ठेकेदारांकडून वृक्षसंवर्धनात दुर्लक्ष होत असेल, तर त्याची चौकशी केली जाणार आहे.
- दिलीप नेरकर, उपायुक्त, उद्यान विभाग, नवी मुंबई महापालिका