गप्पांमधून कर्तबगार महिलांनी साधला सवांद

गप्पांमधून कर्तबगार महिलांनी साधला सवांद

कळवा, ता. १४ (बातमीदार) : ‘पुढचं पाऊल’ कार्यक्रमात समाजातील राजकीय, वैद्यकीय, आहारतज्ज्ञ व चित्रपटसृष्टीत नावाजलेल्या अभिनेत्री अशा कर्तबगार महिलांनी प्रश्नोत्तरे, मुलाखत, चर्चेत समर्पक उत्तरे देऊन ठाण्यातील महिलांशी संवाद साधला. या कार्यक्रमाच्या प्रसिद्ध निवेदिका धनश्री प्रधान दामले यांनी घेतलेल्या मुलाखतीत आपल्या जीवनात व वाटचालीच्या प्रवासात आलेले अनेक संघर्षमय अनुभव, नाजूक प्रश्न यांच्यावर दिलखुलास गप्पा मारल्या व जमलेल्या महिलांशी आपलेपणाने संवाद साधला.
१) रूपाली चाकणकर, अध्यक्षा, महाराष्ट्र महिला आयोग
महिलांसाठी काम करताना त्यांच्या प्रश्नांवर लढताना तुम्हाला कशी प्रेरणा मिळते?
रूपाली चाकणकर : ‘लढा व भिडा’ या ‘दै. सकाळ’च्या शिकवणीनुसार मी प्रत्येक पीडित महिलेला लढण्याची हिंमत देते. हा लढा तुमचा आहे. तो तुम्ही स्वतः लढला पाहिजे, असा त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण करते. सध्या समाजात विधवा प्रथा, बालविवाह, हुंडा पद्धती या गोष्टी वाढविण्यात महिलाही सहभागी असतात, यावर खंत व्यक्त करून महिलांनी या विरोधात आवाज उठवला पाहिजे.
विधवांना या पुढे ‘पूर्णांगी’ या नावाने ओळखले जावे हे नाव तुम्हाला कसे सुचले?
रूपाली चाकणकर : कोरोना काळात ८५ हजार पुरुषांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे ८५ हजार महिला विधवा झाल्या आहेत. त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र तोडण्याची प्रथा, कपाळावरील कुंकू पुसणे, बांगड्या फोडण्याची प्रथा, विधवा म्हणून लग्न समारंभ, धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम अशा ठिकाणी त्यांची अवहेलना होते. यावर नाराजी व्यक्त करून त्यांच्या नावावर असलेला नकारात्मक विधवा हा ठसा पुसून हे नाव काढून त्यांच्यात सकारात्मक ऊर्जा निर्माण होण्यासाठी तिला सन्मान मिळण्यासाठी ‘पुर्णांगी’ हे तिला नाव देण्यासाठी पाठपुरावा केला आहे.
२) झेलम चौबळ, संचालक केसरी टूर्स
कोणत्याही व्यवसायात महिलांनी स्वतःला सिद्ध करताना व नवनवीन आव्हाने पेलण्यासाठी कोणते आवाहन कराल?
झेलम चौबळ : समाजात स्त्री म्हणून वावरताना स्वतःला कमी समजू नये. स्वतःवर आत्मविश्वास वाढवला पाहिजे. संकट आल्यावर आपण कणखर असावे. आजूबाजूची परिस्थिती बदलण्याचे धाडस महिलेकडे असते. स्त्री म्हणजे एक स्वतंत्र अस्तित्व आहे, त्यामुळे तिला स्वतःला सिद्ध करण्याची गरज नाही.
..
तुमच्या ‘सोलोट्रीप’ म्हणजे एकट्या महिलेचा प्रवास याविषयी तुम्ही काय सांगाल?
झेलम चौबळ : आजची महिला सध्या दोन्ही आघाड्यांचे कर्तव्य बजावत असते; परंतु जगाचा आनंद तिला स्वतः स्वतंत्रपणे घेता येत नाही. माय फेअर लेडी म्हणून हा पर्याय तिच्यासाठी खुला असून आमच्या टूरमधून आतापर्यंत ३२० महिलांनी जगभरचा प्रवास एकटीने केला आहे.

३ ऊर्मिला कानेटकर, अभिनेत्री
चेहऱ्यावरील मेकअप किती महत्त्वाचा असतो?
चेहऱ्यावरील मेकअप करताना त्वचेची काळजी घेणे आवश्यक आहे. दैनंदिन आयुष्यात मला मेकअप लावायला आवडत नाही; परंतु मालिका व चित्रपटांच्या शूटसाठी मेकअप करावा लागतो; पण मेकअप करताना व काढताना चेहऱ्याची काळजी घ्यावी.
....
ऑटोग्राफ या तुझ्या नव्या चित्रपटाविषयी काय सांगशील?
हा नातेसंबंधांविषयी चित्रपट असून आयुष्यात येणारी प्रत्येक व्यक्ती आपल्याला ऑटोग्राफ देऊन जाते. मन व भावनेला गुंतून ठेवणारा हा चित्रपट आहे.

४) तन्वी मुंडले, अभिनेत्री
चित्रपट अथवा मालिकेत आपल्या पात्राला न्याय देताना तू स्वतःसाठी कसा वेळ देतेस?
रोजच्या कामाच्या धावपळीतून स्वतःला वेळ दिला पाहिजे. शांत बसून मनन करणे आणि किमान स्वतःसाठी रोज अर्धा तास वेळ दिला पाहिजे, असे मला वाटते.
....
सोशल मीडियावर प्रेम व फोलोअर्स यामधून तुझ्या अभिनयावर काय फरक पडतो का?
मी कोकणातील असल्याने तेथूनच कामाला सुरुवात केली आहे. आई-वडिलांच्या पाठिंब्याने व ऊर्मिलाताईंच्या मदतीने प्रथम कामाला सुरुवात केली. सोशल मीडियावर मिळणारे प्रेम व फॉलोअर्समुळे आनंद वाटतो. चित्रपट, मालिकांत केलेल्या भूमिकेला न्याय दिल्यावर लोक अभिनेत्री म्हणून प्रेम करतात; मग आपोआपच आपल्या कामाचे कौतुक होते.
....
जुही गडकरी, मराठी अभिनेत्री
महिलांना प्रोत्साहन देण्यासाठी तू काय सांगशील?
‘स्त्री’ला आधार देण्यासाठी तिला सन्मान देण्याची गरज आहे. समाजात वावरताना आपण अनेक महिला पाहतो. त्यातील काही महिलांना मुले नसतात, अशा आई नसलेल्या स्त्रियांकडे समाज वेगळ्या नजरेने पाहतो. अशा महिलांना इतर महिलांप्रमाणे सन्मान मिळाला पाहिजे. त्यांना मानसिक आधार देणे गरजेचे आहे.

जगातील १३ देशांत एकटीने प्रवास करताना काही वाईट अनुभव आला का?
मला लहानपणापासूनच ट्रेकिंगची आवड आहे. स्वतःला वेळ देण्यासाठी मीही आवड निर्माण केली. स्वतःला मित्र बनवले आहे; पण १३ देशांत प्रवास करताना कोणताही वाईट अनुभव आला नाही; मात्र थायलंडला गेली असताना रात्री अडीच वाजता मी रस्ता चुकले होते. मोबाईला रेंज नव्हती; परंतु न घाबरता पहाटेपर्यंत हॉटेलवर पोहचले.

६) किनीत हजारे, आहारतज्ज्ञ
‘सुपरवुमन’ बनण्यासाठी काय करावे?
सुपरवुमन बनण्यासाठी शरीरात हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढवणे आवश्यक आहे. त्यासाठी आहारात बाजरी व नाचणी ही धान्ये, आवळा, संत्री, डाळिंब, मोसंबी ही फळे आणि सालांच्या डाळींचा आहारात समावेश करावा. त्यामुळे कॅल्शियम व आयर्नचे प्रमाण शरीरात वाढते.
....
शिळे अन्न खावे का? त्याचे काय करावे?
शिळ्या अन्नामधून पोषक पदार्थ निघून जातात, त्यामुळे ते खाऊ नये. त्यातून दुसरा पर्यायी पदार्थ तयार करावा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com