केईएमचा मेडिसिन वॉर्ड शिवडी रुग्णालयात

केईएमचा मेडिसिन वॉर्ड शिवडी रुग्णालयात

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १४ : महापालिकेच्या प्रमुख रुग्णालयांपैकी एक असलेल्या केईएममधील सहा जीर्ण वॉर्डांमधून रुग्णांना इतरत्र हलवण्याची वेळ अखेर आली आहे. या सहा वॉर्डांपैकी चार मेडिसिन वॉर्ड शिवडी येथील क्षयरोग रुग्णालयात हलवण्याची प्रक्रिया पालिकेकडून सुरू करण्यात आली आहे. यामुळे येत्या आठवडाभरात केईएमचा मेडिसिन वॉर्ड आता शिवडी टीबी रुग्णालयातून चालवण्यात येणार आहे.
२०१९ मध्ये केलेल्या स्ट्रक्चरल ऑडिटमध्ये केईएम रुग्णालयातील सहा वॉर्ड जीर्ण अवस्थेत आढळले. यापैकी चार मेडिसिन आणि दोन सर्जिकल वॉर्ड आहेत.
लेखापरीक्षण अहवालात या सहा वॉर्डांमध्ये संरचनात्मक दुरुस्ती सुचवण्यात आली होती. ही सूचना देऊनही गेल्या दोन वर्षांपासून या जीर्ण वॉर्डांमध्ये रुग्णांवर उपचार सुरूच होते.
या वॉर्डाचे नूतनीकरण सुरू करण्यापूर्वी येथील रुग्णांना हलवणे हे रुग्णालय प्रशासनासमोर मोठे आव्हान होते. यापूर्वी हा वॉर्ड परळ येथील रुग्णालयात हलवण्याचा विचार होता; परंतु रुग्णालयाने जागा देण्यास नकार दिला. यानंतर प्रशासनाने या क्षयरोग रुग्णालयाच्या प्रशासकीय इमारतीत स्थलांतर करण्याचा निर्णय घेतला. त्याअंतर्गत तेथेही काम सुरू करण्यात आले, जे जवळपास पूर्ण झाले आहे.

शिवडी टीबी रुग्णालयात फक्त मेडिसिन वॉर्ड हलवला जात आहे. सर्जिकल वॉर्डला केईएम रुग्णालयात आवारातील इतर वॉर्डांत हलवण्यात आले आहे.
- डॉ. संगीता रावत, अधिष्‍ठाता, केईएम रुग्णालय

२०० खाटांची व्यवस्था
शिवडी क्षयरोग रुग्णालयातील मेडिसिनच्या चार वॉर्डमध्ये केवळ २०० खाटांची व्यवस्था करण्यात आली आहे. या चार वॉर्डांमध्ये सुमारे तीनशे खाटा असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाकडून देण्यात आली. जागेअभावी १०० खाटांच्या तुटवड्याचा फटका रुग्णांना सहन करावा लागणार आहे.

केवळ स्थिर रुग्णांचे स्थलांतरण
प्रकृती स्थिर असेलेल्‍या रुग्‍णांनाच शिवडी येथे हलवण्यात येणार आहे. आपत्कालीन रुग्णांवर केईएममध्येच उपचार केले जातील, अशी माहिती डॉ. संगीता रावत यांनी दिली. दरम्‍यान क्षयरोगाच्या भीतीमुळे अनेक जण शिवडी क्षयरोग रुग्णालयात जाण्यास तयार होत नसल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, अशा रुग्णांना नायर किंवा जेजेत पाठवण्याची परवानगी डॉ. संगीता रावत यांनी अतिरिक्त आयुक्त यांच्याकडे मागितली आहे.

दुरुस्तीच्या कामासाठी दोन वर्षे
सहा जीर्ण वॉर्डांच्या दुरुस्तीचे काम महापालिकेच्या रुग्णालय इन्फ्रास्ट्रक्चर सेलमार्फत केले जाणार आहे. हे काम पूर्ण होण्यासाठी सुमारे दोन वर्षे लागू शकतात. या कालावधीपर्यंत मेडिसिन वॉर्ड शिवडी रुग्णालयातच राहणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com