रेल्वे आणि पालिकेत नालेसफाईवरून जुंपली? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रेल्वे आणि पालिकेत नालेसफाईवरून जुंपली?
रेल्वे आणि पालिकेत नालेसफाईवरून जुंपली?

रेल्वे आणि पालिकेत नालेसफाईवरून जुंपली?

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १४ : मुसळधार पाऊस पडल्यानंतर मुंबईतील सखल भागांमध्ये साचणाऱ्या पाण्याचा झटपट निचरा व्हावा यासाठी दरवर्षी पालिका आणि रेल्वेकडून नालेसफाई केली जाते. मुसळधार पावसामुळे रेल्वे सेवा विस्कळित होऊ नये म्हणून यंदा पश्चिम रेल्वेने कंबर कसली आहे. पालिका आणि पश्चिम रेल्वेच्या अधिकाऱ्यांमध्ये नुकत्याच झालेल्या बैठकीत रेल्वेने पालिकेकडून नालेसफाई योग्य पद्धतीने झाली नसल्याचा ठपका ठेवला आहे. नालेसफाईचा पुन्हा एकदा आढावा घेण्याची सूचना केली आहे. त्यामुळे यंदा पावसाळ्यात पुन्हा एकदा नालेसफाईवरून पश्चिम रेल्वे आणि पालिकेत जुंपणार असल्याचे चित्र दिसून येत आहे.

मुंबई उपनगरांत दरवर्षी विक्रमी पाऊस कोसळतो. पावसात समुद्राला आलेल्या भरतीमुळे अल्पावधीतच मुंबईच्या सखल भागांत पाणी साचते. परिणामी रेल्वे वाहतूक कोलमडते. त्यामुळे मुसळधार पावसामुळे रेल्वे सेवा विस्कळित होऊ नये म्हणून दरवर्षी महापालिका आणि रेल्वे प्रशासनाद्वारे युद्धपातळीवर मान्सूनपूर्व कामे केली जातात. रेल्वेमार्गाच्या परिसरात नालेसफाई आणि मोऱ्यांची (कल्व्हर्ट) सफाई करण्यात येते. सद्यस्थितीत मध्य-पश्चिम रेल्वेमार्गावर विविध मान्सूनपूर्व कामे सुरू आहेत. त्याचा आढावा घेण्यासाठी सतत पालिका आणि रेल्वे अधिकाऱ्यांच्या बैठकीचे सत्र सुरू झाले आहेत. नुकतीच नालेसफाईसंदर्भात पश्चिम रेल्वेची आणि पालिकेच्या अधिकाऱ्यांची बैठक पार पडली. त्यात पालिकेकडून रेल्वेस्थानक आणि रुळाच्या जवळ असलेल्या नाल्यांची योग्य पद्धतीने सफाई झाली नसल्याचा ठप्पका पश्चिम रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी पालिकेवर ठेवला आहे. त्यावर पालिका आणि रेल्वे अधिकाऱ्यांमध्ये दीर्घ चर्चाही झाली असल्याची माहिती रेल्वेचा वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ‘सकाळ’ला दिली.

रेल्वेने व्यक्त केली नाराजी!
बैठकीत रेल्वेने नालेसफाईच्या मुद्द्यावरून नाराजी व्यक्त केल्याचे समजते. पालिका प्रशासनाला नालेसफाई योग्य पद्धतीने झाली आहे का, याचा पुन्हा एकदा आढावा घेण्याची आणि उर्वरित कामे कंत्राटदारांकडून तत्काळ पूर्ण करून घेण्याची विनंतीही रेल्वेने केली आहे. सध्या रेल्वे हद्दीतील व त्या लगतच्या वेगवेगळ्या नाल्यांमधील गाळ उपसण्यासह मोऱ्यांची स्वच्छता आणि विविध ठिकाणी पंप बसवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.