मुंबईसह राज्‍याला डेंग्‍यूचा विळखा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मुंबईसह राज्‍याला डेंग्‍यूचा विळखा
मुंबईसह राज्‍याला डेंग्‍यूचा विळखा

मुंबईसह राज्‍याला डेंग्‍यूचा विळखा

sakal_logo
By

मुंबईसह राज्‍याला डेंग्‍यूचा विळखा
पाच महिन्यांत दुप्‍पट वाढ
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १५ : मुंबईसह राज्यात गेल्या वर्षीच्या डेंग्यूच्या रुग्णांत वाढ झाली असल्याची माहिती सार्वजनिक आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे. या वर्षीच्या पहिल्या पाच महिन्यांतच डेंग्यूचे रुग्ण सुमारे दुपटीने वाढले आहेत. कोरोना संपत असताना पावसाळा सुरू होण्याआधी डेंग्‍यू या साथीच्या आजाराने चिंतनीय स्थिती दाखविण्यास सुरुवात केली आहे.
आरोग्य विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार गेल्या वर्षी याच काळात मुंबईत ८४ डेंग्यू रूग्ण नोंदले गेले. त्या तुलनेत यंदा ७ मे पर्यंत डेंग्यूच्या १६३ रुग्णांची नोंद झाली. ही वाढ ९४ टक्क्यांनी अधिक आहे. मुंबईत डेंग्यू रुग्णांची ही स्थिती असताना राज्यात ९२५ रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. यात पालघर ८३, नाशिक ८२, सांगली ६२, कोल्हापूर ४९, सातारा ३०, यवतमाळ २९ आणि सोलापूर येथे २७ डेंग्यू रुग्ण आढळले आहेत.

डेंग्यूची लक्षणे
१०४ फेरेनाईट ताप
तीव्र डोकेदुखी
डोळ्यांमागील वेदना
स्नायू आणि सांधेदुखी
मळमळ, उलट्या
सुजलेल्या ग्रंथी किंवा पुरळ
ही लक्षणे तापाच्या अवस्थेत (दोन ते सात दिवस) येतात.

डासांद्वारे इतरही आजारांचा फैलाव
जागतिक आरोग्य संघटनेच्या मते, डेंग्यू हा डासांमुळे पसरणारा विषाणूजन्य आजार आहे. हे एडिस एजिप्ती प्रजातीच्या मादी डासांद्वारे प्रसारित होतो. जे चिकनगुनिया, पिवळा ताप आणि झिका विषाणूचा वाहक देखील आहे. पावसाळा सुरू झाला की डेंग्यूच्या संशयित आणि पुष्टी झालेल्या रुग्णांमध्ये वाढ होते.

प्रशासन सज्‍ज
पालिकेच्या सर्वेक्षण आणि जागरूकता वरिष्ठ आरोग्य अधिकार्‍यांनी सांगितले की ते प्रसार रोखण्यासाठी सर्व आवश्यक उपाययोजना करत आहेत. सर्व आरोग्य सेवा कर्मचार्‍यांना सर्वेक्षण करून जनजागृती करण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच नवीन डेंग्यू व्यवस्थापन उपचार प्रणालीअंतर्गत कामगारांना प्रशिक्षण दिले जात आहे. केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार जुलै महिना डेंग्यू प्रतिबंधक महिना म्हणून ओळखला जातो.
राज्याच्या आरोग्य विभागातील एका डॉक्टरने सांगितले की, डेंग्यू आणि चिकनगुनियाच्या निदानासाठी ४३ केंद्रेही स्थापन केली आहेत. मात्र, नागरिकांनी पाणी साचवू देऊ नये. तसेच कचरा व्यवस्थापन योग्यरित्या करणे आवश्यक आहे.

तीन वर्षांतील डेंग्यू बाधित रुग्ण संख्या व मृत संख्या
वर्ष रुग्‍ण मृत्‍यू
२०२३ ९२५ ००
२०२२ ८५७८ २७
२०२१ १२,७२० ४२
२०२० ३,३५६ १०


मुंबईत गोवर रुग्णांमध्ये घट 
मुंबई : शहरात आतापर्यंत गेल्या वर्षी आढळून आलेल्या एकूण गोवर प्रकरणांपैकी ३६ टक्के रुग्ण आढळले आहेत. महापालिकेच्या आकडेवारीनुसार मुंबईत २०२२ मध्ये ५७७ रुग्णांच्या तुलनेत आतापर्यंत १२ मे पर्यंत केवळ २०९ गोवर रुग्ण आढळले आहेत.
गोवर रुग्णसंख्या घटण्यासोबत या आजाराची तीव्रता कमी होताना दिसत आहे. सध्या शहरात केवळ चार रुग्ण रुग्णालयात दाखल आहेत. आणि गोवर लसीकरणामुळे, तीव्रता आणि मृत्यू दोन्ही कमी झाले असल्याची माहिती एका वरिष्ठ महापालिका अधिकाऱ्याने दिली.
जे. जे. रुग्णालयातील बालरोग विभागाच्या प्रमुख डॉ. बेला वर्मा म्हणाल्या, “गेल्या आठवडाभरात आम्हाला जेजेमध्ये गोवरचा एकही रुग्ण आलेला नाही. व्हायरसमध्ये देखील कोणतेही उत्परिवर्तन नाही. तर, वोक्हार्ट रुग्णालयाचे सल्लागार बालरोगतज्ञ डॉ. फजल नबी यांनी सांगितले की, बहुतेक रूग्ण बरे होत असून त्यांना मोठ्या हॉस्पिटलायझेशनची गरज लागत नाही.