मेगाब्लॉकने प्रवाशांची दमछाक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मेगाब्लॉकने प्रवाशांची दमछाक
मेगाब्लॉकने प्रवाशांची दमछाक

मेगाब्लॉकने प्रवाशांची दमछाक

sakal_logo
By

वाशी-पनवेल, ता. १४ (बातमीदार)ः हार्बर मार्गावर वाशी-पनवेलदरम्यान रविवारी (ता. १४) घेण्यात आलेल्या मेगाब्लॉकमुळे चाकरमान्यांसह बाहेरगावी जाणाऱ्यांचे चांगलेच हाल झाले. यावेळी ट्रान्स हार्बर मार्गावरील ठाणे ते वाशी ही सेवा सुरू होती; परंतु सध्या सुट्ट्यांचा हंगाम असल्याने लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी पनवेल, सीएसएमटी तसेच कल्याण स्थानक गाठताना प्रवाशांची चांगलीच दमछाक झाली होती.
ट्रान्स हार्बर मार्गावर मेगाब्लॉक असल्यामुळे रेल्वे स्थानक परिसरात शुकशुकाट पसरला होता; तर एनएमएमटीच्या बस स्थानकांवर मात्र प्रवाशांची गर्दी जमली होती; तर मेगाब्लॉकमुळे रेल्वेच्या फेऱ्या देखील उशिराने असल्यामुळे रिक्षाने तसेच बस, एनएनएमटीने प्रवास करवा लागला; तर भरउन्हामुळे प्रवाशांना रेल्वे स्थानकांत अडकून पडावे लागले होते. यावेळी रिक्षाचालकांकडूनदेखील प्रवाशांच्या अडचणीचा फायदा घेत वाढीव भाडे आकारण्यात आले होते. अशातच आज सुट्टीचा दिवस असल्याने अनेक जण घराबाहेर पडले होते. त्यात उन्हाचा पारादेखील ४० अंशापर्यंत असल्यामुळे बस स्टॉपवर बसची वाट पाहणाऱ्या प्रवाशांच्या अंगाची लाहीलाही होत होती.
-----------------------------------
एनएनएमटीकडून ज्यादा फेऱ्या
ट्रान्स हार्बर मार्गावर मेगाब्लॉकमुळे एनएनएमटीने ४५ जादा फेऱ्या वाढवल्या होत्या; तरीदेखील बसच्या तुलनेत प्रवाशांची संख्या अधिक असल्याने थांब्यांवर गर्दी झाल्याचे चित्र होते. अनेक प्रवाशांना तासंनतास बस थांब्यावर ताटकळत उभे राहावे लागले; तर मेगाब्लॉकमुळे असल्याने अनेकांनी स्वतःच्या वाहनांनीच प्रवास करणे पसंत केले. दुपारी चार वाजेपर्यंत हीच परिस्थिती रेल्वे स्थानक परिसरात दिसून आली.
------------------------------
सायन-पनवेल मार्गावर ताण
उपनगरी रेल्वे मार्गावरील रुळांची दुरुस्ती तसेच सिग्नल यंत्रणेत काही तांत्रिक कामे करण्यासाठी मेगाब्लॉक घेण्यात आल्याने हार्बर मार्गावरील रेल्वेस्थानकात शुकशुकाट पसरला होता. मात्र, प्रवाशांनी प्रवासासाठी सायन-पनवेलची वाट धरल्याने महामार्गावरील बस थांबे मात्र गर्दीने फुलून गेले होते. अशातच लग्नसराई तसेच शाळांना सुट्टी असल्याने नागरिक मोठ्या प्रमाणात बाहेर पडल्याने बेस्ट, एसटी, एनएमएमटीसह खासगी प्रवासी वाहनांवर अवलंबून राहावे लागले.
-----------------------------------------
वाढीव भाडे देण्याची वेळ
सायन-पनवेल महामार्गावरून दादर येथे खरेदीसाठी जाणाऱ्या नागरिकांची संख्या लक्षणीय होती. तसेच कळंबोली मॅक्डोनाल्ड येथे अलिबाग, लोणावळा, खोपोली, कर्जत, महड व पाली या ठिकाणी जाणाऱ्या नागरिकांनी सायन-पनवेल महामार्गावर गर्दी केली होती. यावेळी कळंबोली मॅक्डोनाल्ड येथून काही
खासगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या चारचाकी वाहनांनी नेहमीचा मार्ग बदलून प्रवाशांच्या मागणीप्रमाणे ठाणे-मुंबई असा वाढीव भाडे आकारून प्रवास केला.
---------------------------------------------
ओला, रिक्षावाल्यांची चलती
मेगाब्लॉकमुळे रस्ते वाहतुकीला पर्याय नसल्याने प्रवाशांना ओला तसेच रिक्षावाल्यांची विनवण्या कराव्या लागत होत्या. विशेष म्हणजे, बहुतेक प्रवासी हे सहकुटुंब प्रवास करत होते. त्यामुळे लहान मुलांसह गृहिणींची गैरसोय होऊ नये, म्हणून नाईलाजास्तव जादा खर्च करावा लागत होता. यावेळी अनेक ओला-चालकांनी अॅप बंद ठेऊन ट्रीप मारल्या होत्या.
---------------------------------------------
मुलीच्या लग्नाचा बस्ता बांधण्यासाठी दादरला जायचे होते. सुट्टीचा दिवस असल्याने रविवार निवडला. गावावरून पाहुणे मंडळी आली होती. त्यात मेगाब्लॉकची माहिती नसल्याने रेल्वेस्थानकात गेल्यावर खोळंबा झाला. खासगी चारचाकी करून दादरला जावे लागले.
- भानुदास भोसले, प्रवासी, कळंबोली
--------------------------------
मुलांना सुट्टी असल्याने सहकुटुंब मुंबईला खरेदीसह देवदर्शनाचा बेत आखला होता. रेल्वे बंद असल्याने बस स्थानकावरील गर्दीमुळे कामोठा बस स्टॉपवरून घरी परतावे लागले.
- जितेंद्र सोनी, प्रवासी, कामोठा
----------------------------------------
लग्नाला जायचे असल्याने रेल्वेने जाण्याचे ठरवले होते; पण रेल्वे स्थानकात आल्यानंतर रेल्वेचा मेगाब्लॉक असल्यामुळे बसेना जाण्याचा निर्णय घेतला; पण बसेसला असणारी गर्दी पाहता रिक्षाने प्रवास केला; पण रिक्षाचालकांकडून जादा भाड्याची आकारणी करण्यात येत होती.
- सुनंदा कांबळे, प्रवासी
-------------------------
गावी जायचे असल्यामुळे लोकलने पनवेलपर्यंत जायचे होते; पण मेगाब्लॉकमुळे लोकल बंद असल्याने बसची वाट बघत ताटकळत उभे राहावे लागले. प्रवाशांच्या तुलनेत बस संख्या कमी असल्याने प्रवास त्रासदायक झाला.
- सचिन पाटील, प्रवासी