
मध्य रेल्वेला ६ कोटींचा फटका
नितीन बिनेकर ः सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १४ : लग्नसराई आणि उन्हाळ्याचा सुट्यांमुळे अनेकांनी आपले गाव गाठले आहे. त्यामुळे मध्य रेल्वेची प्रवासी संख्या चक्क चार लाखांनी घटली आहे. जानेवारी महिन्याच्या तुलनेत एप्रिल महिन्याअखेर जवळपास दीड कोटी प्रवासी संख्या घटल्याची माहिती मध्य रेल्वेकडून देण्यात आलेल्या आकडेवारीतून स्पष्ट झाले आहे. त्यामुळे साधरणतः ६ कोटी २ लाख ३६ हजार ६५० रुपयांचा महसूल कमी झाला आहे.
शाळांना उन्हाळी सुट्ट्या लागल्याने आणि लग्नसराई असल्यामुळे शहरातील चाकरमानी मुलांसह सुट्टी घेऊन गावाकडे, पर्यटन स्थळांकडे गेले आहेत. त्यामुळे उपनगरीय रेल्वे मार्गावर प्रवासी संख्या रोडावली आहे. परिणामी बहुतेक रेल्वेगाड्या सकाळी आणि सायंकाळी गर्दीच्या वेळेत नेहमीच्या तुलनेत कमी प्रवाशांसह धावत आहेत. मध्य रेल्वेवर दररोज १ हजार १० फेऱ्या होतात. त्यातून दररोज ३८ लाख ते ४० लाख प्रवासी प्रवास करातात. मात्र, प्रवासी गावाकडे गेल्याने प्रवासी संख्येत घट झाली आहे. जानेवारी महिन्यात प्रतिदिवस साधारणता ९ लाख ६८ हजार तिकीट विक्री होत होती आणि ३८ लाख ४९ हजार प्रवासी प्रवास करत होते. एप्रिल महिन्यात प्रतिदिवस साधारणतः ९ लाख ५५ हजार तिकीट विक्री होत होती आणि ३४ लाख ७४ हजार प्रवासी प्रवास करत होते. प्रतिदिवस ४ लाखांपेक्षा जास्त प्रवासी संख्या कमी झाली. मध्य रेल्वेचा महसूलदेखील दैनंदिन ११ ते १२ लाख रुपयांनी घटल्याची माहिती रेल्वेने दिलेल्या आकडेवारीतून स्पष्ट होत आहे.
...
६० कोटी रुपयांचा रेल्वेला फटका
जानेवारी महिन्यात प्रवासी संख्या ११ कोटी ९३ लाख ३९ हजार ४८ हजार एवढी होती. या कालावधीत महसुलाचा आकडा ७६ कोटी २९ लाख ३२ हजार २२० रुपये इतका होता. एप्रिल महिन्यात प्रवासी संख्या घटून १० कोटी ४२ लाख ३३ हजार ४३० इतकी होती; तर या कालावधीत महसुलाचा आकडा ७० कोटी २६ लाख ९५ हजार ६५१ रुपये इतका होता. जानेवारीच्या तुलनेत एप्रिल महिन्यात ६ कोटी २ लाख ३६ हजार ६५० रुपयांनी महसुलात घट झाली आहेत.
--
एक हजार उन्हाळी स्पेशल गाड्या
मुंबई आणि उपनगरात मोठ्या प्रमाणात इतर राज्यातील नागरिक राहतात. विशेष म्हणजे उन्हाळा आणि दिवाळीच्या सुट्ट्यात नागरिक गावी जातात. त्यामुळे मुंबईतून बाहेरगावी जाणाऱ्या प्रवाशांची संख्या जास्त असल्याने प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी मध्य रेल्वेने यंदा ९५८ उन्हाळी विशेष रेल्वे गाड्या सोडल्या आहेत. त्यामुळे मुंबईहून बाहेगावी जाणाऱ्या प्रवाशांची गर्दी वाढत असताना मुंबईच्या उपनगरीय रेल्वेमधील प्रवासी संख्या घटली आहे.
----
प्रवासीसंख्या
जानेवारी - ११ कोटी ९३ लाख ३९ हजार ४८
एप्रिल - १० कोटी ४२ लाख ३३ हजार ४३० प्रवासी
प्रवासी संख्येत घट - १ कोटी ५१ लाख ५ हजार ६१८
महसुलात आलेली घट - ६ कोटी २ लाख ३६ हजार ६५० रुपये
-------
दैनंदिन आकडेवारी
जानेवारी - एप्रिल
प्रवासी - ३८,४९,६४७ -३४,७४,४४८
तिकीट विक्री - ९,६८,३९० -९,५५,६१२
महसूल - २,४६,१०,७१७ - २,३४,२३,१८८
..........
मासिक आकडेवारी
जानेवारी - एप्रिल
तिकीट विक्री - ३,००,२०,०८९ - २,८६,६८,३५९
प्रवासी - ११,९३,३९,०४८ - १०,४२,३३,४३०
महसूल - ७६,२९,३२,२२०- ७०,२६,९५,६५१