
मराठीच्या मुद्द्यावरून शिवसेना आक्रमक , व्यापाऱ्याशी वाद
मराठीच्या मुद्द्यावरून
शिवसेना आक्रमक
‘बॉम्बे एक्स्प्रेस’ दुकानाचे नाव बदलण्याची मागणी
घाटकोपर, ता. १४ (बातमीदार) ः घाटकोपर पूर्वेतील टिळक रोडवरील मुंबई पालिका शाळेच्या बाजूला असलेल्या ‘बॉम्बे एक्स्प्रेस’ नावाच्या दुकानाबाबतचा वाद पुन्हा वाढला आहे. नाव बदलून ते ‘मुंबई’ करावे, अशी मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पदाधिकाऱ्यांनी केली आहे. मात्र, नावात बदल करणार नाही, अशी भूमिका दुकानमालकाने घेतल्याने शिवसैनिक व व्यापाऱ्यांमधील वाद वाढून तो पालिकेच्या एन विभाग कार्यालयात गेला आहे.
दरम्यान, सोमवारी (ता. १५) दुकानदाराला कार्यालयात बोलावण्यात आले असून, त्याबाबत माहिती घेऊन कार्यवाही करण्यात येईल, अशी माहिती सहायक पालिका आयुक्त संजय सोनवणे यांनी दिली. ‘बॉम्बे एक्स्प्रेस’ नावाचे पावभाजी आणि चायनीजचे दुकान टिळक रोडवर आहे. १९९६ च्या दरम्यान बॉम्बेचे नामकरण मुंबई झाले. असे असतानाही संबंधित व्यापारी अद्याप ‘बॉम्बे’ का वापरतात, असा सवाल करत त्याला आपला विरोध असल्याचे शिवसेना माजी उपविभागप्रमुख प्रकाश वाणी यांचे म्हणणे आहे. पालिकेकडे त्याबाबत तक्रार केली असल्याचेही वाणी यांनी सांगितले. मात्र, दुकानदाराने नाव न बदलण्याची भूमिका घेतल्याचे वाणी यांनी सांगितले.