आवक वाढल्यावरही केसरचा भाव कायम

आवक वाढल्यावरही केसरचा भाव कायम

विक्रमगड, ता. १७ (बातमीदार) : तालुक्यातील प्रसिद्ध गोड केसर, गावठी हापूस आंबा बाजारात दाखल झाला आहे; मात्र या वर्षी अवकाळी पावसाने नुकसान झाल्यामुळे चढ्या भावाने विक्री होत आहे. गेल्या वर्षी याच आंब्याचा किलोला भाव ६० ते ८० रुपये दराने विक्री होत होती; मात्र यंदा दुपटीपेक्षा जास्त भावाने म्हणजेच १६० ते २०० रुपये किलो दराने विक्री होत असल्याने आंबाप्रेमींचा हिरमोड झाला आहे.

सध्या आंब्याचा हंगाम असल्याने गावठी गोड आंब्यांना बाजारात मोठी मागणी आहे. ग्राहक डझनच्या दराने आंबे खरेदी करत आहेत. बऱ्याच महिला डोक्यावर टोपल्या घेऊन घरोघरी फिरून आंब्याची विक्री करत असल्याचे चित्र अनेक ठिकाणी दिसत आहे. या आंबा विक्रीमधून मान्सूनपूर्व काळात ग्रामीण भागातील महिलांना रोजगार मिळतो. सध्या चविष्ट आंबे दाखल होत असल्याने रोजच्या जेवणात या आंब्यावर सर्वच जण ताव मारत आहेत. पाऊस पडण्यापूर्वी आंबे विकले जावे, यासाठी बागायतदारांची धडपड आहे.

विक्रमगडमधील कसदार मातीत हापूस, केसर, लंगडा, पायरी आंबा उत्तम होत आहे. या वर्षी निसर्गाच्या अवकृपेने आंबा मोहर करपला होता आणि अवकाळी पावसाने प्रचंड नुकसान झाले आहे. सरकारने दखल घेऊन पंचनामेही केले आहेत, मात्र अद्यापही शेतकऱ्यांपर्यंत मदत पोहचली नाही. जिल्ह्यातील आंबा उत्पादक शेतकरी सरकारकडून मिळणाऱ्या नुकसान भरपाईच्या प्रतीक्षेत आहेत. मात्र यंदा १० मेनंतर आंब्याची आवक झाली असूनही भाव मात्र कायम आहे.

मे महिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्यात आंब्याचा भाव घसरण्याची वाट पाहत असतो. मात्र यंदा आंबा महाग आहे. घरातील लहान मुलांना केसर आंबा आवडत असल्याने खरेदी करत आहे.
- विजय पाटील, ग्राहक

यंदा वादळी, अवकाळी पावसाने आंबा बागायतदारांचे प्रचंड नुकसान झाले आहे. आवश्‍यक प्रमाणात आंबे बाजारात आले नाहीत, त्यामुळे मागणी अधिक आहे. यंदा उशिरा आंबा बाजारात दाखल झाला असून आंब्याचे भाव प्रचंड वाढले आहेत.
- विजय सांबरे, बागायतदार

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com