
वैद्यकीय शिबिराला मच्छीमारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
विरार (बातमीदार) : कोळी युवाशक्ती संघटनेतर्फे पाचूबंदर येथे आयोजित केलेल्या मोफत वैद्यकीय तपासणी आणि औषध वितरण शिबिराचा दीडशेहून जास्त मच्छीमार महिला आणि पुरुषांनी लाभ घेतला. या शिबिरादरम्यान मुंबईतील अस्थिशल्यविशारद डॉ. आशित बावडेकर यांनी तपासणी करून रुग्णांना आवश्यक औषधे दिली. ईस्टरनंतर दरवर्षी कोळी युवाशक्ती संघटनेतर्फे डॉ. आशित बावडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली मच्छीमार समाजातील गरजूंसाठी आरोग्य तपासणी शिबिर आयोजित केले जाते. पाचूबंदर येथील संत पीटर प्राथमिक शाळेत हे शिबिर शनिवारी (ता. १३) पार पडले. या शिबिराला मुंबईतील जयाबेन अॅण्ड जयंतीलाल मोदी फाऊंडेशनचे विशेष सहकार्य लाभले. कोळी युवाशक्ती संघटनेचे अध्यक्ष मिल्टन सौदिया, उपाध्यक्ष प्रेम जान्या, अर्नेस्ट मस्तान, विशाल पाटील, संजू मानकर, ब्लेस जान्या यांनी मदत केली. या शिबिरासाठी वसई मच्छीमार संस्थेचे माजी चेअरमन संजय कोळी, वंदना मस्तान, प्रेसिला माठक, तेजल माठक, सुजाता बाठ्या, मॉनिका माठक आदींनी मेहनत घेतली.