
लाखोंच्या दागिन्यांचा दोन तासांत शोध
नवी मुंबई, ता.१५ (वार्ताहर): लातूर येथून नेरुळच्या एलपी ब्रिज येथे उतरलेल्या सुरेखा फुलसे (५०) यांचे तब्बल साडे पाच लाखांच्या १० तोळे वजनाचे दागिन्यांची बॅग जुईनगर येथे रिक्षातून जाताना गहाळ झाली होती. मात्र, अवघ्या दोन तासात नेरुळ पोलिसांनी फुलसे यांना त्यांची दागिन्यांच्या बॅग शोधून पुन्हा परत केली आहे.
जुईनगर सेक्टर-२५ मध्ये राहणाऱ्या सुरेखा फुलसे (५०) या आपल्या मूळ गाव लातूर येथून रविवारी सकाळी एलपी ब्रीज येथे उतरल्या होत्या. त्यानंतर रिक्षाने जुईनगर येथे घरी परतल्यानंतर सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम असलेली बॅग गहाळ झाल्याचे त्यांच्या लक्षात आले होते. दागिन्यांची ती बॅग रस्त्यामध्ये अथवा रिक्षामध्ये विसरल्याचे त्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी तत्काळ नेरुळ पोलिस ठाणे गाठून घडलेल्या प्रकाराची माहिती पोलिसांना दिली. यावेळी नेरुळ पोलिस ठाण्यातील ड्युटी ऑफिसर सहाय्यक पोलिस निरीक्षक नितीन खाडे, पोलिस शिपाई गणेश आव्हाड, पुरुषोत्तम भोये व बीट मार्शल लहानगे यांनी घडलेल्या प्रकाराचे गांभीर्य लक्षात घेऊन तत्काळ घटनास्थळाला भेट दिली होती. यावेळी पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने फुलसे ज्या रिक्षातून घरी गेल्या होत्या, त्या रिक्षा चालकाचा शोध घेऊन त्याच्याकडे दागिन्यांबाबत चौकशी केली. मात्र, त्याच्याकडून माहिती मिळाली नसल्याने पोलिसांसमोर आव्हान होते.
-----------------------------------------------
सीसीटीव्हीची पोलिसांना मदत
फुलसे ज्या मार्गाने रिक्षातून घरी गेल्या, त्या मार्गातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची पोलिसांनी तपासणी केली. यावेळी एका सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये फुलसे यांची एक बॅग रिक्षातून रस्त्यावर पडताना दिसून आली. तसेच ती बॅग एका व्यक्तीने उचलल्याचे निदर्शनास आले होते. त्यामुळे पोलिसांनी सानपाडा परिसरात त्या व्यक्तीचा शोध घेऊन त्याच्याकडे चौकशी केली असता रस्त्यात भेटलेली बॅग पोलिसांच्या स्वाधीन केल्याची माहिती समोर आली होती.
----------------------------------------------