सफाई कामगारांच्या गणवेश बदलाला संघटनांचा विरोध | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सफाई कामगारांच्या गणवेश बदलाला संघटनांचा विरोध
सफाई कामगारांच्या गणवेश बदलाला संघटनांचा विरोध

सफाई कामगारांच्या गणवेश बदलाला संघटनांचा विरोध

sakal_logo
By

सफाई कामगारांच्या गणवेश बदलाला संघटनांचा विरोध
आवश्‍यक सुविधांकडे लक्ष देण्याची मागणी
मुलुंड, ता. १५ (बातमीदार) ः मुंबई महापालिकेतील सफाई कर्मचाऱ्यांचा खाकी गणवेश बदलून आता नवीन रंगीबेरंगी गणवेश देण्यास सुरुवात केली आहे. मात्र या नवीन गणवेशाला कामगारांच्या संघटनांनी विरोध केला आहे. त्यामुळे पालिकेची ही नवीन गणवेश देण्याची योजना बारगळणार असल्याचे बोलले जात आहे.
म्युनिसिपल कामगार कर्मचारी सेनेने पालिकेच्या घनकचरा विभागाच्या उपायुक्तांना पत्र लिहून कामगारांचा गणवेश बदल ही बाब महत्त्‍वाची नसून कामगारांच्या अनेक दैंनदिन गरजा आहेत, तिकडे लक्ष दिले पाहिजे, असे म्हटले आहे. तर म्युनिसिपल मजदुर युनियनचे अध्यक्ष अशोक जाधव यांनीही या नव्या गणवेशाला विरोध केला आहे. कर्मचाऱ्यांना तो शोभत नाही असे देखील संघटनेने सांगितले आहे.

काय आहे पत्रात
म्युनिसिपल कामगार कर्मचारी सेनेने उपायुक्तांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, २१ सप्टेंबर २०२२ ला अत्यंत तातडीने आपल्या दालनात गणवेश बदलाबाबत बैठक झाली होती. या बैठकीस युनियनचे प्रतिनिधी उपस्थित होते. गणवेश बदलाचे आपण ठोस कारण सांगितले नाही तसेच सदर बैठकीस आम्ही तसेच अन्य युनियननी विरोध केला होता. घनकचरा व्यवस्थापन खात्यात कामगार समाज काम करीत आहे. आपण घनकचरा व्यवस्थापन खात्यातील कामगारांचा गणवेश बदल केल्याने पालिका कामगार वर्गात सफाई खात्यातील कामगार वर्गाकडे पाहण्याचा दृष्टीकोनात बदल होऊ शकतो. परिणामी सामाजिक विषमता निर्माण होत आहे. याबाबत आपणास पत्र दिले आहे. तरी आम्ही या पत्राद्वारे गणवेश बदल करून नये अशी विनंती करतो, असे या पत्रात म्‍हटले आहे.

सुविधांकडे लक्ष देण्याची मागणी
घनकचरा व्यवस्थापन खात्यातील कामगार अनेक सुविधापासून वंचित आहेत. कामगारांना चौक्या नाहीत. शौचालय नाहीत, महिलांना कपडे बदलण्यास वेगळी खोली, लाईट, पाणी, अशा अनेक सोयीसुविधां नाहीत याबाबत आपण तात्काळ लक्ष घालून सुधारणा करावी. कारण कामगारांमध्ये याबाबतीत असंतोष निर्माण झाला आहे. गणवेश बदल ही बाब महत्वाची नसुन कामगारांच्या दैनंदिन गरजांकडे आपण लक्ष द्यावे, अशी विनंती आणि मागणी म्युनिसिपल कर्मचारी कामगार कामगार सेनेचे अध्यक्ष बाबा कदम आणि चिटणीस रामचंद्र लिंबारे यांनी केली आहे.

गणवेश बदलामुळे कामगारांच्या समस्या काही सुटणार नाहीत. घनकचरा व्यवस्थापन खात्यातील कामगार अनेक सुविधांपासून वंचित आहेत. या समस्येवर तोडगा काढावा; गणवेश बदल ही बाब महत्त्वा‍ची नसून कामगारांच्या दैनंदिन गरजांकडे लक्ष देणे गरजेचे आहे.
- बाबा कदम, अध्यक्ष, म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेना

नव्या गणवेशाला आमचा विरोध आहे. कर्मचाऱ्यांना तो शोभत नाही. कामगारांचे प्रश्न महत्त्‍वाचे आहेत; त्याला प्राधान्य दिले पाहिजे.
- अशोक जाधव, अध्यक्ष, म्युनिसिपल मजदुर युनियन