पर्यवेक्षीय महाविद्यालयाची रखडपट्टी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पर्यवेक्षीय महाविद्यालयाची रखडपट्टी
पर्यवेक्षीय महाविद्यालयाची रखडपट्टी

पर्यवेक्षीय महाविद्यालयाची रखडपट्टी

sakal_logo
By

खर्डी, ता. १५ (बातमीदार) : मध्य रेल्वेच्या कल्याण - कसारा लोहमार्ग तसेच मुंबई-नाशिक राष्ट्रीय महामार्ग यांच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेले खर्डी ठाणे जिल्ह्याच्या नकाशावर केंद्रस्थानी आले आहे. परंतु या विविध प्रकल्पांप्रमाणे खर्डीत ३०० एकर शासकीय जमीन उपलब्ध आहे. पण भारतीय रिझर्व्ह बँकेच्या पर्यवेक्षीय महाविद्यालयासाठी ५० एकर जमीन मिळत नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. तसेच जी जागा उपलब्ध आहे, तेथे अतिक्रमण झाल्याने महाविद्यालयाची रखडपट्टी सुरू असल्याचे चित्र आहे.
भारतीय रिझर्व्ह बँकेला मुंबई शहराबाहेर परंतु परिघातील ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील खर्डी येथे नियामक आणि पर्यवेक्षीय कर्मचाऱ्यांमध्ये कौशल्ये वाढविण्यासाठी आणि ती मजबूत करण्यासाठी बँकेने स्थापन केलेले पर्यवेक्षीय महाविद्यालय बांधण्यासाठी सुमारे ५० एकर जमीनीची आवश्यकता असल्याचे बँकेच्या क्षेत्रीय संचालकांनी राज्याच्या मुख्यसचिवांना पत्राद्वारे कळविले होते. त्यानुसार सप्टेंबर २०२२ मध्ये रिझर्व्ह बँकेचे प्रादेशिक संचालक अजय मिक्यारी यांनी राज्याच्या सचिव यांच्याकडे लेखी पत्राद्वारे ५० एकर जमीन रिझर्व्ह बँकेच्या प्रकल्पाकरिता उपलब्ध करुन द्यावी यासाठी पत्रव्यवहार केला होता. त्याच अनुषंगाने कोकण उपायुक्त मकरंद देशमुख (महसूल विभाग) यांनी मार्च २०२३ रोजी ठाणे जिल्हाधिकारी यांना पत्र देऊन जमीन उपलब्ध असल्यास माहिती अहवाल देण्यास सांगितला होता. त्यानुसार मागील वर्षापासून खर्डी गावात जमीनीचा शोध सुरू होता. मात्र या प्रकल्पाला शासकीय जमीन मिळेनाशी झाली आहे.
खर्डी गावात अनेक शासकीय प्रकल्पांना जमीनीच्या वाटपानंतर आता अवघे २३ हेक्टर ३६ गुंठ्यांचेच क्षेत्र शिल्लक उरले असून त्यावरही काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात अतिक्रमण करण्यात आले आहे. त्यातील काही निवासी घरे शासनाने नियामकुल केले आहे. त्यामुळे रिझर्व्ह बँकेला हवी असलेली खर्डीतील एकर जमीन गावठाणात मिळेनाशी झाली असल्याचे शासकीय अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
खर्डीत सरकारी पडीतसह गुरुचरज जमिन मिळून ३०० एकरच्या आसपास जमीन सद्यस्थितीत उपलब्ध आहे. परंतु गुरुचरणमध्ये सलग जागा उपलब्ध असून येथे रिझर्व्ह बँकेचा प्रकल्प राबविण्यात येऊ शकतो. परंतु याबाबत स्थानिक लोकप्रतिनिधी अनभिज्ञ आहेत.हा प्रकल्प इतर ठिकाणी जाऊ नये यासाठी लोकप्रतिनिधीनी पाठपुरावा करणे गरजेचे आहे.
.....
स्थानिकांमध्ये नाराजी
शहापूर तालुक्यातील खर्डी या गावात जमीन उपलब्ध आहे. स्थानिक बेरोजगार तरुणांना या महाविद्यालयामुळे रोजगार उपलब्ध होण्याची शक्यता असूनही शासकीय अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे हा प्रकल्प बाहेर जाण्याची शक्यता असल्याने स्थानिक नागरिक संताप व्यक्त करीत आहेत.
----
गुरचरण जागेचा पर्याय
खर्डी मध्ये गुरचरण स. नं -१८३ मध्ये ४८ हेक्टर ६० गुंठे म्हणजेच १२० एकर इतकी जागा उपलब्ध आहे. याठिकाणी फक्त तीन एकरवर अतिक्रमण आहेत. त्यामुळे येथे ५० एकर जमीन उपलब्ध होण्यास अडचण येणार नाही व भारतीय रिझर्व बँक हा केंद्रशासनाचा एक भाग असल्याने गुरचरण ची जागा ही केंद्र शासनाच्या प्रकल्पाला दिल्यास खर्डी सारख्या ग्रामीण भागातील बेरोजगारांना रिझर्व्ह बँकेच्या प्रकल्पात रोजगार उपलब्ध होईल, असे ग्रामस्थांनी सांगितले.
-----------
भारतीय रिझर्व्ह बँकेला खर्डी येथे पर्यवेक्षीय महाविद्यालय बांधण्यासाठी ५० एकर जमीन आवश्यक आहे. परंतु येथील बऱ्याचशा शासकीय जमीनीचे या आधीच शासकीय प्रकल्पांना वाटप झाले आहे. तर उर्वरित जमीनीवर अतिक्रमण झाले आहे. याबाबत ठाण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना कळविले आहे.
- राजेंद्र लोंढे, तालुका अधिक्षक, भुमिअभिलेख कार्यालय, शहापूर
-----
पर्यवेक्षीय महाविद्यालय खर्डीत उभे राहिले तर परिसरातील असंख्य बेरोजगाराना यामुळे रोजगार उपलब्ध होईल यासाठी खर्डीतील इतर उपलब्ध शासकीय जमीन देण्यात यावी.
- शाम परदेशी, अध्यक्ष, व्यापारी असोसिएशन, खर्डी