नागरी सुविधांचा तळोज्यात दुष्काळ

नागरी सुविधांचा तळोज्यात दुष्काळ

खारघर, ता. १५ (बातमीदार) : तळोजा वसाहत आणि परिसरातील गावांची लोकसंख्या लाखांच्या घरात आहे. असे असताना तळोजा शहरात सरकारी शाळा, आरोग्य केंद्र, टपाल कार्यालय, अग्निशमन केंद्र तसेच पोलिस ठाणे नसल्यामुळे नागरिकांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे पालिका प्रशासनाने तळोजा वसाहतीला प्राधान्य देऊन नागरी सुविधांचा असलेला दुष्काळ संपवावा, अशी मागणी तळोजावासीयांकडून केली जात आहे.
खारघरनंतर तळोजा वसाहत निर्माण करताना सिडकोने बेलापूर ते पेंधर मेट्रो रेल्वे, साडेबारा टक्के भूखंडावर टोलेजंग इमारती उभ्या केलेल्या आहेत; पण सर्व सोयीसुविधांनी परिपूर्ण असलेल्या खारघर शहराचा परिपूर्ण असा विकास झाला आहे. अशातच सिडकोने सर्वसामान्यांसाठी तळोजा वसाहतीत मोठ्या प्रमाणात गृहनिर्माण प्रकल्प उभारले असून तळोजा ते खारघर खाडीमार्गे पूल उभारणीचे काम हाती घेतले आहे. त्यामुळे तळोजा वसाहतीत मोठ्या प्रमाणात नागरीकरण झाले आहे; तर या वसाहतीलगत असलेल्या पेठाली, भोईरपाडा, तळोजे मजकूर आदी गावांचा विकास झाल्यामुळे भाडेकरूंची संख्यादेखील अधिक आहे; पण वाढणाऱ्या लोकसंख्येच्या तुलनेत तळोजा शहरात पालिकेची शाळा, आरोग्य, अग्निशमन केंद्र आणि टपाल कार्यालय नसल्यामुळे रहिवाशांना विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे पालिकेने नागरी सुविधांच्या उभारणीकडे लक्ष द्यावे, अशी मागणी जनमानसातून होत आहे.
-----------------------------------------
तळोजा शहरात खासगी रुग्णालयात गाठावे लागत आहे. पोलिस ठाणे आणि टपाल कार्यालयाच्या कामासाठी पाच किलोमीटर अंतर पार करून तळोजा औद्योगिक वसाहतीत जावे लागते. याविषयी तळोजा पोलिस ठाण्यात संपर्क केला असता तळोजा फेज एकमध्ये पोलिस चौकी कार्यरत असल्याने कायदेशीर प्रकरणे प्रलंबित राहत आहेत. विशेष म्हणजे, सिडकोने तळोजा फेज एकमध्ये पोलिस ठाण्यासाठी राखीव भूखंड राखीव ठेवला आहे. त्यामुळे शहरात भूखंड असून सुविधा नसल्याने गैरसोय होत आहे.
-------------------------------------------------
आगीच्या घटनांचा सर्वाधिक धोका
तळोजा वसाहत निर्माण करताना प्रामुख्याने अग्निशमन केंद्र उभारणे आवश्यक आहे. तळोजा वसाहतीत अनेक वेळा आगीच्या घटना घडून नागरिकांचे नुकसान झाले आहे. तसेच आगीच्या घटना घडल्यास खारघर अथवा कळंबोली येथील अग्निशमन केंद्राची मदत घ्यावी लागते. त्यामुळे सिडको प्रशासनाने याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.
-----------------------------------------------
पेट्रोल-डिझेलसाठी पायपीट
पेट्रोल-डिझेलसाठी तळोजा गाव अथवा खारघर-तळोजा फेज एक आणि दोनमध्ये एकही पेट्रोल पंप नाही. पेट्रोल आणि डिझेलसाठी तळोजा गाव अथवा खारघर येथील पेट्रोल पंप गाठावे लागते. पेट्रोल नसल्यामुळे आजही काही नागरिक तळोजागाव अथवा खारघर मध्ये दुचाकी ढकलत पेट्रोल पंपावर जाण्याची वेळ येते.
----------------------------------------------
तळोजा मजकूर येथील सर्वे क्रमांक १०९/१ मध्ये पालिकेकडून नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र सुरु करण्यात आहे. त्याचे पत्र पालिकेने दोन वर्षांपूर्वी दिले होते. मात्र, अद्यापही आरोग्य केंद्राची वीट उभारलेली नाही.
- अंकुश गायकवाड, काँग्रेस कार्यकर्ता, तळोजा
----------------------------------------
तळोजा औद्योगिक वसाहतीमधील पोलिस ठाणे अंतर्गत असलेल्या तळोजा वसाहतीत कामकाज केले जात आहे. तळोजा वसाहतीमध्ये नव्याने उभारण्यात येणाऱ्या पोलिस ठाणे बांधकामाच्या प्रस्तावाविषयी माहिती घेऊन पुढील उपाय योजना केली जाईल.
- संजय पाटील, उपायुक्त, पोलिस आयुक्तालय, नवी मुंबई
------------------------------------
तळोजा वसाहतीत पालिकेकडून आरोग्य केंद्र नाही; मात्र पालिकेकडून लवकरच सुसज्ज असे आरोग्य केंद्र उभारण्याचा संकल्प आहे.
- डॉ. अनिल पाटील, आरोग्य अधिकारी, प्रभाग कार्यालय, खारघर विभाग

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com