
मुख्यमंत्री मातृत्व सुरक्षा योजनेतून आशांचे सक्षमीकरण
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १५ : राज्यात राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत काम करणाऱ्या आशा स्वयंसेवकांना त्यांच्या कामाच्या तुलनेत देण्यात येणारे मानधन अत्यल्प आहे. या मानधनात वाढ होण्याबरोबरच अनेकदा महिनोंमहिने राखाडणारे मानधन यांमुळे अशा स्वयंसेवक मेटाकुटीला आले आहे. अशातच दुसरीकडे ठाणे महापलिकेच्या माध्यामतून राबविण्यात येणाऱ्या मुख्यमंत्री मातृत्व सुरक्षा योजनेंतर्गत गरोदर मातांचा शोध घेणे, हिमोग्लोबिन कमी असलेल्या मातांचा शोध घेणे यांसह विविध माहिती संकलित करण्यासाठी देण्यात येणाऱ्या योगदानासाठी प्रत्येक गरोदर मातेच्या मागे मानधन देण्यात येणार आहे. त्यामुळे या योजनेतून आशा स्वयंसेवकांचे सक्षमीकरण होणार असल्याचे दिसून येत आहे.
राष्ट्रीय आरोग्य अभियानातंर्गत आशा स्वयंसेविका कार्यरत आहेत. आशा स्वयंसेवकांची ठाणे महापलिका हद्दीतील गरोदर मातांची १२ आठवड्याच्या आत नोंदणी करण्यासाठी देखील मदत घेतली जाणार आहे. त्यानुसार यासाठी प्रत्येकी २५ रुपये दिले जाणार आहेत. यात नोंद झाली नसेल तर नोंदणीसाठी देखील या आशा वर्कर मदत करणार आहेत. तसेच प्रसुतीवेळी अनेक मांतामध्ये या काळात हिमोग्लोबीनचे प्रमाण कमी झाल्याचे दिसत असून त्यातही अति हिमोग्लोबीन कमी होण्याचे प्रमाण हे ५० ते ६० टक्यांपर्यंत असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे अशा मातांचा शोध घेऊन त्यांच्या प्रकृतीची तपासणी, त्यांना वेळेत औषधे घेण्यासाठी प्रात्सोहीत करण्यासाठी प्रती १०० रुपये दिले जाणार आहेत.
दरम्यान, ठाणे पालिका हद्दीतील मातामृत्यू व बालमृत्यू रोखण्यासाठी जोखमीच्या मातांवर लक्ष केंद्रित करण्यात येत आहे. या जोखमीच्या मातांपैकी काहींना जुळे मुले होणार असतात, काहींना प्रसुती दरम्यान होणारे वेगवेगळे त्रास होत असतात. त्यानंतर प्रसुतीचे निदान झाल्यानंतर आई आणि बाळाची तब्बेत चांगली आहे किंवा काही त्रास आहे का? याची तपासणी करणे गरजेचे असते. ते काम आशा वर्करच्या माध्यमातून झाल्यास त्यापोटी प्रती ५०० रुपये दिले जाणार आहेत.