
गटबाजीमुळे मनसे कार्यकारिणी बरखास्त
उल्हासनगर, ता. १५ (वार्ताहर) : पदाधिकाऱ्यात गटबाजी आणि आपापसात मतभेद असल्याच्या तक्रारी आल्यावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्वेसर्वा राज ठाकरे यांनी उल्हासनगरची कार्यकारिणी बरखास्त करून दिली आहे. त्यामुळे पदाधिकारी, कार्यकर्त्यांत एकच खळबळ उडाली असून १० दिवसानंतर पक्षात मोठे बदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. येत्या ५ जूनपासून पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी कार्यशाळेचे आयोजन करण्यात येणार आहे. यात अनेक पदाधिकाऱ्यांना त्यांच्या पदाचे काम काय याबाबत माहिती नाही. त्याबद्दल त्यांना मार्गदर्शन करून त्याचा वेळोवेळी आढावा घेतला जाईल, असेही राज ठाकरे यांनी सांगितले. पक्षातील गटबाजीवर बोलताना त्यांनी पदाधिकाऱ्यांना खडे बोल सुनावले. कुणाच्या महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी पक्ष काढलेला नाही. अहंपणा असलेला व्यक्ती यापुढे पदावर राहणार नाही, असेही ठाकरे यांनी यावेळी स्पष्ट केले. तसेच १० दिवसांत नविन कार्यकारिणी तयार करण्याचे आदेश त्यांनी मनसे नेते आमदार राजू पाटील आणि जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांना दिले आहेत.