
निवडणुका आल्यावरच सभा
निवडणुका आल्यावरच सभा
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा आशीष शेलार यांच्यावर टीका
सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. १५ : ज्यावेळी निवडणुका होतात, त्याचवेळी नाक्यावर जाऊन सभा घेणारी लोक आहेत, असा सणसणीत टोला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजप आमदार आशीष शेलार यांना लगावला आहे. कल्याणमध्ये ते पत्रकारांशी बोलत होते. पुढे त्यांनी ज्यांचे अस्तित्व मोदींवर आहे, त्यांना खाली कोणी ओळखत नाही. अशा लोकांना मी फार महत्त्वही देत नाही, अशी कानपिचकीही राज यांनी लगावली.
कर्नाटकमध्ये भाजपला पराभव स्वीकारावा लागला, यावर राज ठाकरे यांनी अंबरनाथ येथे बोलताना भाजपवर टीका केली. राज म्हणाले, पराभव झाला आहे तो स्वभावाचा आणि वागणुकीचा झाला आहे, असा आरोप केला. यावर भाजप आमदार आशीष शेलार यांनी ''स्वप्नातल्या प्रतिक्रिया माणूस देऊ शकतो. मैं अभी जिंदा हू'' अशी प्रतिक्रिया दिली आहे. मात्र, त्यांच्या प्रतिक्रियेला आम्ही महत्त्व देत नाही, असा प्रतिटोलाही राज ठाकरे यांनी शेलार यांना लगावला. शेलार यांच्या प्रतिक्रियेवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उत्तर दिले आहे. अस्तित्व टिकवण्यासाठी हे सगळे सुरू आहे. अशी टीकाही अशी शेलार यांनी केली होती. यावर उत्तर देताना राज म्हणाले, त्यांचे अस्तित्व मोदींवर आहे, त्यांना खाली कोण ओळखत नाही. अशा लोकांना मी फार महत्त्व देत नाही.
भारत जोडो यात्राचा परिणाम
ज्यावेळी निवडणुका होतात. त्यावेळी नाक्यावर जाऊन सभा घेणारी लोक आहेत. काही गोष्टी विरोधकांच्या जरी असल्या, तरी त्या मान्य करायला हव्यात. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे करू शकतात. तर त्यांच्या पक्षातील लोकांना हे का मान्य नाही. ''भारत जोडो यात्रा'' कितीही झाकायचा प्रयत्न केला, तरी त्याचा परिणाम झाला. तो कर्नाटक निवडणूकमध्ये दिसला. पराभवातून काही बोध घ्यायचाच नसेल तर असेच वागा असे ते म्हणाले.
भारत जोडो यात्रेमुळेच कर्नाटकात भाजपचा पराभव
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा घणाघात
अंबरनाथ, ता. १५ (बातमीदार) : राहुल गांधी यांच्या ''भारत जोडो'' यात्रेमुळेच कर्नाटकमध्ये काँग्रेसला विजय मिळाला असावा आणि भाजपला पराभवाला सामोरे जावे लागले. नागरिकांना कधीही गृहीत धरू नये, असा बोध या निवडणुकीच्या निकालावरून राजकीय पक्षांनी घ्यावा, अशा शब्दांत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजपवर घणाघाती टीका केली. मनसेत यापुढे गटबाजी खपवून घेतली जाणार नाही, असा इशारा त्यांनी मनसे पदाधिकाऱ्यांना दिला.
मनसेच्या कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांशी संवाद साधण्यासाठी रविवारी ठाकरे यांनी रविवारी (ता. १४) अंबरनाथला भेट दिली. त्यावेळी पदाधिकारी, कार्यकर्त्यांशी चर्चा केली. पदाधिकाऱ्यांशी चर्चा झाल्यानंतर कर्नाटक निवडणूक निकाल आणि मनसेतील अंतर्गत गटबाजी याविषयी ठाकरे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. विरोधी पक्ष कधी जिंकत नाहीत; मात्र सत्ताधारी पराभूत होतात, हेही कर्नाटक निवडणुकीच्या निकालावरून स्पष्ट झाले.
कोणा व्यक्तीच्या महत्त्वाकांक्षेसाठी पक्ष काढला नाही. अहमपणा असेल तो मनसेच्या पदावर राहणार नाही, असे खडेबोल ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना सुनावले. यापुढे मनसेत गटबाजी खपवून घेणार नाही. संघटनात्मक बांधणीसाठी पूर्ण ठाणे जिल्ह्याचा दौरा करणार असल्याचे ठाकरे यावेळी म्हणाले.
या वेळी मनसे आमदार राजू (प्रमोद) पाटील, ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव, अभिजित पानसे, ठाणे जिल्हा उपाध्यक्ष शैलेश शिर्के, जिल्हा संघटक संदीप लकडे, स्वप्नील बागुल, धनंजय गुरव, शहराध्यक्ष कुणाल भोईर, सरचिटणीस अविनाश सुरसे, माजी नगरसेविका अपर्णा भोईर, सुप्रिया देसाई, युसूफ शेख उपस्थित होते.