
अंबरनाथमध्ये करियर मार्गदर्शन शिबिर
अंबरनाथ, ता. १५ (बातमीदार) : येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या विद्यार्थ्यांना करियरच्या संधी याबाबत मार्गदर्शन शिबीर आयोजित करण्यात आले होते. कार्यशाळा क्र. १ येथे औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभाग यांच्यावतीने दहावी-बारावी नंतर विद्यार्थ्यांना ‘करिअरच्या संधी’ या विषयावर तज्ज्ञ व्यक्तींकडून मार्गदर्शन करण्यात आले. या शिबिरास आमदार डॉ.बालाजी किणीकर यांनी उपस्थित राहत शिबिराकरिता आलेल्या विद्यार्थी व पालकांशी संवाद साधला. विद्यार्थ्यांसाठी उभारण्यात आलेल्या ‘संगणक कक्षाचे’ उद्घाटन आमदार डॉ. किणीकर यांच्या हस्ते पार पडले. यावेळी शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे, उमेश तायडे, श्रम व रोजगार विभागाचे आशुतोष माळी, जिल्हा कौशल्य विकास विभागाचे विमलेश शिरकर, करियर टेक्निकल ट्रेनिंगचे गणेश भोपी, ओमकार कुलकर्णी, अंबरनाथ प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य महेश जाधव आदी उपस्थित होते.