करसंकलनासाठी फोनाफोनी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

करसंकलनासाठी फोनाफोनी
करसंकलनासाठी फोनाफोनी

करसंकलनासाठी फोनाफोनी

sakal_logo
By

भाईंदर, ता. १५ (बातमीदार) : मालमत्ता कराचा विशिष्ट मुदतीत भरणा करणाऱ्यांना महापालिकेकडून करात सवलत देण्यात येणार आहे. या सवलतीची माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत जावी आणि योजनेचा नागरिकांनी लाभ घ्यावा, यासाठी प्रशासनाकडून विविध उपाययोजना आखण्यात आल्या आहेत. त्यात कॉल सेंटरचाही समावेश करण्यात आला आहे. महापालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून मालमत्ताधारकांना फोन करत कर सवलतीची माहिती देण्यात येणार आहे.

मालमत्ता कराची देयके मिळाल्यानंतर लगेच कराचा भरणा करणाऱ्या प्रामाणिक करदात्यांना गेल्या वर्षीपासून महापालिकेने सवलत देण्यास सुरुवात केली आहे. यावर्षी देखील ही सवलत जाहीर करण्यात आली आहे. ३० जूनपर्यंत कर भरणाऱ्यांना मूळ करात पाच टक्के आणि ३१ जुलैपर्यंत कर भरणाऱ्यांना मूळ करात तीन टक्के सवलत दिली जाणार आहे. या सवलतीनंतर कराच्या रकमेवर महिना दोन टक्के व्याज लावले जाणार आहे. त्यामुळे सवलतीचा अधिकाधिक लोकांनी लाभ घेत कराचा लवकरात लवकर भरणा करावा, यासाठी ही योजना लोकांपर्यंत पोहोचविणे आवश्यक आहे. यासाठी महापालिकेने सोशल मीडिया, होर्डिंग, केबल आदींवर करसवलतीची प्रसिद्धी सुरू केली आहे. त्याचबरोबर आता करदात्यांना महापालिकेकडून फोनदेखील केला जाणार आहे.

देयक वाटपासाठी खासगी संस्था
महापालिकेच्या मालमत्ता कराची देयके लोकांना वेळेत मिळाली तर लोक कर भरतील व सवलतीचा फायदा घेतील; परंतु महापालिकेकडे पुरेसे कर्मचारी नसल्याने कराची देयके वाटण्याचे काम महापालिकेने खासगी संस्थेला दिले आहे. त्यासाठी प्रत्येक देयकामागे सात रुपये या संस्थेला देण्यात येणार आहेत. संस्थेचे कर्मचारी देयके वाटप केल्यानंतर संबंधित करदात्याची देयके मिळाल्याबद्दल स्वाक्षरी घेणार आहेत. त्याचबरोबर त्याचा मोबाईल क्रमांकही लिहून घेणार आहे. हे मोबाईल क्रमांक महापालिकेच्या कर्मचाऱ्यांकडे दररोज दिले जाणार आहेत. त्यानंतर महापालिका कर्मचारी संबंधित करदात्याला फोन करून कर भरणा करत सवलत घेण्याचे आवाहन करणार आहे.

आठ दिवसांत तीन कोटींचा कर जमा
महापालिकेचा कर्मचारी करदात्यांना फोन करून करसवलतीची माहिती देणार आहे व सवलतीचा लाभ घेण्यासाठी लवकरात लवकर कर भरण्याचे आवाहन करणार आहे. यासाठी करदात्या नागरिकांचे मोबाईल क्रमांकही गोळा केले जात आहेत. करसवलतीमुळे गेल्या आठ दिवसांत महापालिकेच्या तिजोरीत सुमारे तीन कोटी रुपयांचा मालमत्ता कर जमादेखील झाला आहे.

फोनवर महापालिकेचा कर्मचारी बोलत असल्याने नागरिक त्याचे म्हणणे ऐकून घेतील आणि कर भरण्यास उद्युक्त होतील, अशी यामागची कल्पना आहे. या फोनसोबतच करदात्यांना एसएमएसद्वारेही कर भरण्याचे आवाहन केले जाणार आहे. एसएमएससोबत कराचा ऑनलाईन भरणा करण्याची लिंकही पाठवली जाणार आहे.
- संजय शिंदे,
उपायुक्त, मिरा-भाईंदर महापालिका