कृषी पर्यटनाला बहर

कृषी पर्यटनाला बहर

कृषी पर्यटनाला बहर
राज्‍यात रायगड जिल्‍हा अव्वल

सकाळ वृत्तसेवा
अलिबाग, ता. १५ : पारंपरिक शेती व्यवसाय परवडत नाही, अशी ओरड होत असताना कृषी पर्यटनाने जिल्ह्यातील शेतकऱ्यांना तारले आहे. जिल्ह्यात कृषी पर्यटन क्षेत्रात वर्षाला १५ टक्के वाढ होत असून कोरोनानंतर अनेकांनी शेतीला पूरक व्यवसाय असलेल्या कृषी पर्यटनात स्वतःला झोकून दिले. यामुळे मोठ्या शहरातील वाढती वर्दळ, प्रदूषण आणि मानसिक ताण कमी करण्यासाठी अनेकांची पावले गावातील निसर्ग आणि शेतीतील शांत ठिकाणाकडे वळत आहेत. यातूनच रायगड जिल्‍ह्यात कृषी पर्यटन विकसित झाले असून एकूण पर्यटन उद्योगात कृषी पर्यटनाचा वाटा ४० टक्क्यापर्यंत गेला आहे. उन्हाळ्यात यात आणखी पंधरा टक्क्यापर्यंत वाढ होते. धार्मिक आणि ऐतिहासिक पर्यटनासाठी येणाऱ्यांची संख्या उन्हाळ्यात कमी असते, ती भरून काढण्याची जबाबदारी कृषी पर्यटन क्षेत्र समर्थपणे सांभाळत आहे. शहरातील राहणाऱ्यांना कृषी पर्यटनाबद्दल जास्त आकर्षण आहे.
जिल्ह्यात विविध प्रकारचे पिके घेणारे शेतकरी असल्‍याने कृषी पर्यटनातही वैविध्य दिसून येते. इतर उद्योगांच्या तुलनेत कृषी पर्यटन हा एकमेव व्यवसाय पर्यावरणपूरक, शेतीशी निगडित आहे. शेतीच्या पायाभूत सुविधांचा वापर करून हा व्यवसाय अधिक फायदेशीर करता येतो, असे आंबराई पर्यटन केंद्राचे सागर पाटील सांगतात.

कृषी पर्यटनाने गावे श्रीमंत
कर्जत तालुका फार्म हाऊससाठी प्रसिद्ध आहे. कृषी पर्यटनातून येथील नागरिकांना मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध झाला आहे. याशिवाय दिवेआगर, रेवदंडा यासारख्या गावांमध्ये नारळी-पोफळींच्या वाड्यांच्या सानिध्यात पर्यटन बहरत गेले. या वाड्यांमधील शांतता शहरी लोकांना आकर्षित करते. नांदगाव, वरसोली, सासवणे, मुरूड येथील पर्यटन वाढीस कृषी पर्यटनाचा हातभार जास्त आहे.

निसर्गाच्या प्रेमात पर्यटक
शेतामधील साधे, शांत घर, आजूबाजूला नारळ-सुपारी, आंबा-काजूची झाडे, दारात वेगवेगळ्या फुलांची झाडे, त्या झाडांवर चिवचिवाट करणारे पक्षी आणि चुलीवर तयार होणारे गरमागरम जेवणाची पर्यटकांना भुरळ पडते. त्यामुळे उन्हाळ्यात शहरातील मंडळी कोकणात कृषी पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी हमखास येतात. इथे आल्यावर नदीत डुंबणे, बैलगाडीतून रपेट आणि माळरानावरील करवंद, भोकरं आजणं, जांभळं यासारख्या रानमेव्याची ताजी चव कोकणच्या प्रेमात पाडते.

बाराही महिने कृषी पर्यटन
रायगड जिल्ह्यात पावसाच्या पाण्यावर बहुतांश शेती केली जाते, परंतु येथील कृषी पर्यटनाचा आनंद बाराही महिने लुटता येतो. काही हौशी पर्यटक खास सहलींचे आयोजन करतात. सगुणा बाग, मामाचे गाव, आपले घर ही काही नावाजलेली कृषी पर्यटन केंद्र प्रसिद्ध आहेत. भाताची लावणी करण्याची मजा,दरम्यान पावसात भिजत शेतातल्या चिखलात खेळण्याची मजा काही वेगळीच असते. याशिवाय तोंडली मांडवाखाली रंगणाऱ्या पोपटी पार्टी तर विशेष लोकप्रिय असून त्‍यासाठी देशभरातील पर्यटक अलिबाग, मुरूड, रोहा तालुक्यात येतात.


कृषी पर्यटनाचे उद्देश
* शेतीलापूरक व्यवसाय म्हणून प्रोत्साहन देणे
* शेती उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध करणे
* ग्रामीण भागातील लोककलेचे जतन करणे
* स्‍थानिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करणे
* शहरी लोकांना शेती आणि संबंधित व्यवसायाची माहिती देणे
* प्रदूषणमुक्त, शांत व निसर्गाच्या सानिध्यात निवांत वेळ घालवणे.
* ग्रामीण भागातील पडीक, गायरान क्षारपड जमिनी उपयोगात आणणे
* पर्यटकांना प्रत्यक्ष शेत कामाचा अनुभव देणे.

कृषी पर्यटन हे कोकणसाठी संजिवनी ठरत आहे. यातून चांगल्या दर्जाचा आणि हमखास रोजगार गावातच उपलब्ध होत आहे. त्याचबरोबर मोठ्या शहरातील लोकांना चांगल्या प्रकारचा पर्यटन अनुभव देण्याचाही प्रयत्न कृषी पर्यटन क्षेत्राशी निगडीत
व्यावसायिकांचा आहे. पर्यावरण, नैसर्गिक ठेवा, ऐतिहासिक महत्त्व अबाधित ठेवून जिल्ह्यात कृषी पर्यटनाला चालना दिली जात आहे.
- निमिष परब, पर्यटन व्यावसायिक, आवास

ग्रामीण भागाचा आर्थिक विकास व्हावा, यासाठी कृषी पर्यटन धोरण राबवणारे महाराष्‍ट्र हे देशातील पहिले राज्‍य असून त्‍यात रायगड जिल्‍हा अव्वल आहे. महाराष्ट्राचे कृषी पर्यटन धोरण हे देशाला दिशा दर्शविणारे असावे. कृषी पर्यटनातून दुग्ध व्यवसाय, शेळी-मेंढी, कुक्कुटपालन आदी विविध पूरक व्यवसायासाठी प्रोत्साहन देण्यात येते. शहरांमध्ये वाढणाऱ्या आजच्या पिढीची नाळ ग्रामीण भागाशी पुन्हा जोडता यावी आणि ग्रामीण भागातील आणि शेतीमधील विविधतेची त्यांना माहिती व्हावी यादृष्टीने कृषी पर्यटन धोरणाचा मोठा लाभ होणार असून शालेय विद्यार्थ्यांना कृषी पर्यटन घडवून आणावे, अशी विनंती शालेय शिक्षण विभागाकडे करण्यात येणार आहे.
अदिती तटकरे, माजी पर्यटन राज्‍यमंत्री

कृषी पर्यटनासाठी मिळणारे प्रोत्साहन
- पांढरा कांदा- अलिबाग तालुक्यात पांढरा कांदा पिकवला जातो. आयुर्वेदिक गुणवैशिष्ट्ये असल्‍याने त्‍याला जास्त मागणी आहे. अलीकडेच पांढऱ्या कांद्याला जीआय मानांकन मिळाले आहे.
- हापूस आंबा - फलोत्पादन मोहिमेतून रायगड जिल्ह्यात हापूस आंबा लागवडीस प्रोत्साहन देण्यात आले होते. सध्या रायगड जिल्ह्यात हापूसचे विक्रमी उत्पादन होत असून कृषी पर्यटन वाढीस हापूस आंब्याचाही हातभार लागत आहे.
- स्टॉबेरीची लागवड - जिल्ह्यात पोलादपूर, माणगाव तालुक्यातील शेतकऱ्यांनी स्टॉबेरीची यशस्वी लागवड केली आहे. येथील पारंपरिक पिकांबरोबरच स्टॉबेरीसारख्या नावीन्यपूर्ण पिकांना कृषी विभागाकडून प्रोत्साहन दिले जात आहे. कलिंगड, तोंडली, कारले या सारख्या पिकांबरोबरच स्टॉबेरीचे उत्पादन घेण्याचा प्रयत्न शेतकऱ्यांचा आहे.
- बांबू लागवड - दरडी रोखण्यासाठी बांबूची लागवड फायद्याची ठरत आहे, त्याचबरोबर बांबूपासून शोभिवंत वस्तू, घरगुती वापराच्या वस्तू, टिकावू फर्निचर बनविता येतात. बांबूपासून तयार केलेल्या वस्तुंचे स्टॉल्स महामार्गालगत हमखास दिसून येतात. सध्या बांबूपासून तयार केलेल्या पर्यावरणपूरक वस्‍तूंना पर्यटकांकडून मागणी आहे.
- मत्स्यशेती- कृषी पर्यटनास आलेल्यांना मासे अधिक पसंत पडतात. कृषी विभागाने रायगड जिल्ह्यात मागेल त्याला शेततळी ही मोहिम राबवली होती, या मोहिमेतून खोदलेल्या शेततळे पर्यटकांचे आकर्षण ठरत आहे.
- सुक्या मासळीचा बाजार - कोकणात येणारे पर्यटक जाताना येथे मिळणारी सुकी मासळी घेऊन जातात. मुंबई-गोवा महामार्गावर सुक्या मासळी विक्रेत्यांचे स्टॉल्स दिसत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com