School Admission : आरटीईच्या घोळामुळे शाळाप्रवेशासाठी ‘परीक्षा’, या शाळांना पालकांचे प्राधान्य | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

school admission
शाळा प्रवेशासाठी पालकांची ‘परीक्षा’

School Admission : आरटीईच्या घोळामुळे शाळाप्रवेशासाठी ‘परीक्षा’, या शाळांना पालकांचे प्राधान्य

नवीन पनवेल : परीक्षा संपली असली, तरी प्रथमच शाळा प्रवेश घेणाऱ्या पाल्यांच्या पालकांची खरी परीक्षा सुरू झाली आहे. कारण इंग्रजी माध्यमाच्या तसेच सीबीएसईच्या शाळांना पालकांकडून अधिक प्राधान्य दिले जात असल्याने पालकांची धावपळ सुरू आहे.
उन्हाळी सुट्टीनंतर जूनमध्ये पनवेलमधील शाळा सुरू होणार आहेत.

त्यापूर्वी विविध वर्गातील प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. आरटीईअंतर्गत २५ टक्के प्रवेशाचा घोळ सुरूच असल्यामुळे यादीतील पालक हवालदिल आहेत. त्यात ज्यांना प्रवेश मिळाला नाही, ते प्रतीक्षेत असल्याने लाखोंचे डोनेशन भरून पसंतीच्या शाळांसाठी पालकांची धावपळ सुरू आहे.

अशातच शहरातील बहुतांश खासगी सीबीएसई तसेच इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये प्रवेश अर्जाची विक्री बंद झाली आहे; तर राज्य मंडळाच्या खासगी इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये प्रवेशप्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. त्यामुळे पसंतीच्या शाळांमध्ये पाल्याला प्रवेश मिळवण्यासाठी पालकांकडून प्रयत्न सुरू आहेत.

अशात सीबीएसई व काही प्रमुख राज्य मंडळाच्या खासगी शाळांमध्ये फेब्रुवारीतच प्रवेश प्रक्रिया आटोपली आहे; तर राज्य मंडळाच्या शाळांमध्ये एप्रिल व मे महिन्यात प्रवेशाची प्रक्रिया असली, तरी अनेक शाळांनी शाळेबाहेर प्रवेश बंदच्या पाट्या मार्चमध्येच लागल्या आहेत. त्यामुळे मुलाच्या उज्ज्वल भविष्यासाठी चांगल्या शाळेतील प्रवेशासाठीची पालकांची परीक्षा सुरू झाली आहे.

वाढत्या स्पर्धेने सीबीएसईला पसंती
व्यावसायिक अभ्यासक्रम व उच्च शिक्षणासाठीचा विचार करून आत्तापासूनच पाल्यांना स्पर्धात्मक शिक्षणासाठी तयार करण्याच्या दृष्टीने पालक सीबीएसईच्या शाळांना पसंती देत आहेत. राज्य मंडळाच्या शाळेतच त्यांच्या पाल्यांना प्रवेश हवा असतो. परिणामी, शहरातील सीबीएसई शाळांमध्ये प्रवेशासाठी गर्दी होताना दिसत आहे.

डोनेशनमुळे अनेकांचा हिरमोड
सीबीएसई व काही राज्य मंडळाच्या शाळांनी प्रवेशासाठी लाखोंचे डोनेशन घेणे सुरू केले असल्याची माहिती आहे. त्यामुळे डोनेशन देऊन प्रवेश घेण्याची क्षमता नसलेल्या पालकांना पसंतीच्या शाळांमध्ये प्रवेश घेता आलेला नाही. तर अनेकांची डोनेशन देण्याची तयारी असूनही पसंतीच्या शाळांमध्ये प्रवेश आधीच पूर्ण झाल्याने हिरमोड झाला आहे.

जिल्ह्यात सर्वाधिक शाळा पनवेलमध्ये
पनवेल तालुक्यात पहिली ते बारावी वर्गाचे शिक्षण देणाऱ्या ५६७ शाळा असून पनवेल पालिकेच्या १० शाळा, जिल्हा परिषदेच्या २४६ शाळा, स्वयंअर्थसहाय्य शिक्षण देणाऱ्या २०० तसेच अनुदानित ५७ शाळा आहेत. या शाळांमध्ये दोन लाख १२ हजार विद्यार्थी शिक्षण घेतात. अनुदानित तत्त्वावर ५७ शाळांमध्ये ४३ हजार ५१६ विद्यार्थी शिकतात.

आरटीईअंतर्गत प्रवेश प्रक्रियेत प्रतीक्षा यादीत नंबर लागला आहे. प्रत्यक्षात ज्यांचे नंबर लागले आहेत. त्यांचे प्रवेश झाले नाहीत. आरटीईच्या आशेवर बसलो तर प्रवेशाचा खोळंबा होण्याची चिन्हे आहेत.
- रूपेश पिसाळ, पालक

घरापासून जवळ असलेल्या चांगल्या शाळेत मुलाला घालण्यासाठी प्रयत्न केला; परंतु डोनेशन, अवास्तव फी पाहून मुलाला सरकारी शाळेत घालण्याचा निर्णय घेतला आहे.
- रूपेश यादव, पालक