जीर्ण इमारतीचा स्लॅब कोसळून तिघे जखमी

जीर्ण इमारतीचा स्लॅब कोसळून तिघे जखमी

ठाणे, ता. १४ (वार्ताहर) : भास्कर कॉलनी परिसरातील ‘अमर टॉवर’ या सात माळ्यांच्या इमारतीचा पहिल्या मजल्याचा स्लॅब कोसळून पाच लोक अडकल्याची घटना सोमवारी (ता. १५) सकाळी ११च्या सुमारास घडली. पाचपैकी तीन जण जखमी झाले असून तिघांना खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे; तर ढिगाऱ्याखाली अडकलेल्या दोघांची सुखरूप सुटका करण्यात आली.

‘अमर टॉवर’ या सात माळ्यांच्या इमारतीत ३३ सदनिका आहेत. इमारतीच्या पहिल्या माळ्यावर राहणारे सूर्यवंशी यांच्या सदनिकेचा स्लॅब सोमवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास कोसळला. या दुर्घटनेने परिसरात खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी नौपाडा पोलिस कर्मचारी, पालिका परिमंडळ २ चे उपायुक्त व नौपाडा प्रभाग समितीचे सहायक आयुक्त व कर्मचारी, अग्निशमन दलाचे जवान, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी, मुख्य अग्निशमन अधिकारी व आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी, ठाणे आपत्ती प्रतिसाद दलाचे (टीडीआरएफ) जवान मदतकार्यासाठी उपस्थित होते. इमारत जुनी असल्याने धोकादायक झालेली होती. या दुर्घटनेनंतर पालिका प्रशासनाने इमारत खाली करण्यात आल्याची माहिती पालिका प्रशासनाने दिली.
जखमींमध्ये प्रथमेश सूर्यवंशी (वय २८), विजया सूर्यवंशी (वय ५४) आणि अथर्व सूर्यवंशी (वय १४) यांचा समावेश आहे. त्यांना सुखरूप बाहेर काढून उपचारासाठी पराडकर रुग्णालयात दाखल करण्यात आले असल्याची माहिती पालिका आपत्ती व्यवस्थापनाने दिली. तसेच प्रियांका सूर्यवंशी (वय २४) आणि शिशिर पित्रे (वय ६०) यांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. त्यांना सुदैवाने कोणतीही इजा झाली नाही.

----------------
खबरदारीसाठी इमारत केली रिकामी
‘अमर टॉवर’ ही सात माळ्यांची इमारत पूर्णपणे जर्जर झालेली आहे. इमारतींच्या भिंतींना तडे गेले आहेत. त्यामुळे या इमारतीत राहणाऱ्या ३३ कुटुंबांचा जीव टांगणीला लागलेला होता. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून पालिका प्रशासनाने इमारत रिकामी केली आहे. इमारत पुन्हा पडून दुर्घटना होऊ म्हणून पुढील कार्यवाही प्रभाग समितीद्वारे करण्यात येणार असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.

-----------------
दरवाजा तोडून चार जणांना वाचवले
‘अमर टॉवर’चा स्लॅब पडल्याची घटना घडल्यानंतर घटनास्थळी मदतकार्य पोहचेपर्यंत कुणाचीही वाट न पाहता बाजूच्या इमारतीतील आकाश शर्मा नावाच्या तरुणाने घराचा दरवाजा तोडून स्लॅबखाली सापडलेल्या चार जणांची सुटका केली. त्यापैकी एक सुरक्षित राहिला तर तीन जण जखमी झाले. त्यानंतर त्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. या घरात पाच लोक राहतात. मात्र एक लहान मुलगी किशन ही क्लासेसला गेल्याने ती वाचली.

-----------------------
धोकादायक इमारतींत समावेश नाही
१९९८ मध्ये उभारण्यात आलेली ‘अमर टॉवर’ ही इमारत जर्जर झालेली आहे. तरीही पालिका प्रशासनाच्या यादीत या इमारतीचा धोकादायक इमारतीत समावेश नव्हता हे समोर आले. दरम्यान, परिसरातील जुन्या इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट करून घ्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे. पालिका प्रशासनाने ठाण्यातील सगळ्या धोकादायक इमारतींना नोटीस बजावण्यात आल्याची माहिती प्रशासनाने दिली.

--------------
पालिकेने वेळीच जागे व्हावे!
भास्कर कॉलनीमधील २५ वर्षे जुन्या इमारतीचा स्लॅब कोसळून तीन रहिवासी जखमी झाले आहेत. अनधिकृत इमारतीने पालिकेला शिकवलेला हा धडा असून प्रशासनाने वेळीच जागे व्हावे, अन्यथा येत्या पावसाळ्यात आणखी जीवितहानी होण्याची शक्यता आमदार संजय केळकर यांनी व्यक्त केली. शहरात सध्या अनधिकृत इमारतींची बांधकामे मोठ्या प्रमाणात सुरू असून याची माहिती सहायक आयुक्त आणि वॉर्ड अधिकाऱ्यांनाही आहे. मात्र प्रतिचौरस फुटाने पैसे घेऊन अशा बांधकामांना पाठीशी घातले जात असल्याचा आरोप आमदार केळकर यांनी केला. गेल्या दोन वर्षांत किती इमारती झाल्या आणि सध्या सुरू असलेल्या अनधिकृत इमारतींचा पावसाळ्याआधीच सर्वेक्षण करून संभाव्य दुर्घटना टाळाव्यात, असा सल्ला त्यांनी दिला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com