
उष्माघाताचा लहान मुलांना फटका
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १६ : अलीकडे, तापमान आणि हवेतील आर्द्रता पातळीमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. परिणामी दर आठवड्याला मुलांच्या अंगावर घामोळे तसेच पुरळ येण्याच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. यामुळे अंगावर खाज येऊन लाल चट्टेदेखील येत आहेत. मुंबईसह राज्यातील अनेक भागात उष्मा वाढल्याने अशा परिस्थितीमध्ये लहान मुलांची काळजी घेण्याचे आवाहन बालरोगतज्ज्ञांनी केले आहे.
राज्यभरात उष्माघाताचा इशारा देण्यात आला आहे. अलीकडे उष्मा आणि आर्द्रता वाढल्याने लोक हैराण झाले आहेत. लहान मुलांवर याचा अधिक परिणाम होत असल्याचे दिसून येत आहे. उष्मा वाढल्याने लहान मुलांच्या अंगावर पुरळ येण्याचे प्रमाण वाढले आहे. बालरोगतज्ज्ञ याला ‘काटेरी हीट’देखील म्हणतात. याबाबत अधिक माहिती देतांना बालरोगतज्ज्ञ डॉ. समीर दलवाई यांनी सांगितले की, अंगावर घामोळे किंवा पुरळ येणे या समस्या वाढल्या आहेत. गेल्या दोन आठवड्यांपासून यात आणखी भर पडली आहे. मात्र त्वचेच्या आजारांच्या या सामान्य स्थिती आहेत. ज्या घामाच्या नलिका अवरोधित झाल्यामुळे उद्भवतात. यामुळे त्वचेवर लहान, लाल अडथळे किंवा फोड येतात. यामुळे खाज सुटू शकते आणि मुले अस्वस्थ होऊ शकतात; पण ही उन्हाळ्यातील सर्वसाधारण स्थिती असून त्यात घाबरून जाण्यासारखे काहीही नाही. डॉक्टरांचा सल्ला घेऊन मुलांची योग्य ती काळजी घेणे गरजेचे असल्याचे त्यांनी पुढे सांगितले.
काय काळजी घ्यावी?
बालरोग त्वचाविकानतज्ज्ञ डॉ. प्रवीण बानोदकर यांनी सांगितले की, मुलांमध्ये उष्णतेमुळे पुरळ उठू नयेत म्हणून पालकांनी त्यांच्या मुलांना थंड आणि कोरडे ठेवावे. त्यांना घट्ट बसणारे कपडे घालणे टाळावेत. मुलांना शक्यतो सावलीत किंवा वातानुकूलित वातावरणात ठेवावे. त्यांना वारंवार विश्रांती मिळेल, अशी व्यवस्था करावी. एखाद्या मुलास उष्मा पुरळ उठल्यास, पालकांनी घर आणि प्रभावित क्षेत्र थंड, स्वच्छ आणि कोरडे ठेवावे.
डॉक्टरांचा सल्ला महत्त्वाचा
मुलांना उन्हाळ्यात क्रीम किंवा तेल वापरणे टाळावे; ज्यामुळे घामाच्या नलिका बंद होऊ शकतात. यामुळे मुलांचा त्रास वाढून चिडचिड आणखी वाढू शकते. याव्यतिरिक्त, पालक मुलांच्या त्वचेला होणारी जळजळ शांत करण्यासाठी आणि खाज कमी करण्यासाठी कॅलामाइन लोशन किंवा अँटीहिस्टामाइन क्रीम लावू शकतात. उष्मा, पुरळ कायम राहिल्यास किंवा पसरत असल्यास, पालकांनी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, असे डॉ. प्रवीण बानोदकर यांनी सांगितले.
काय करावे
१ अँटिऑक्सिडंट पदार्थांचे सेवन
उन्हाळ्यात जांभळे मिळतात. जांभळात अँटिऑक्सिडंट असतात. त्यामुळे उतींचे नुकसान टाळता येते. तसेच वयानुसार होणाऱ्या रोगांचा धोका कमी होतो. ब्ल्यूबेरी आणि ब्लॅकबेरीमध्येही भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट असतात. याशिवाय प्रत्येक जेवणात फक्त ताज्या गोष्टींचा समावेश करा.
२ हायड्रेटेट राहा
उन्हाळ्यात अनेक लोकांना भरपूर पाणी प्यावे वाटते. काही जण दोन ते तीन लिटर पाणी पितात. उन्हाळ्यात घाम येतो. तसेच व्यायाम केल्यानेही पाण्याची गरज आणि प्रमाण वाढते. त्यामुळे जास्तीत जास्त पाणी प्या.
३ ऐरोबिक्सवर भर द्या
हृदय फिट आणि हेल्दी राहण्यासाठी ऐरोबिक्स व्यायाम फायद्याचा आहे. भरपूर चालणे, सायकलिंग, पोहणे, टेनिससारखे मैदानी खेळ खेळण्यासाठी उन्हाळा हा योग्य हंगाम आहे. यामुळे तुमचे शरीर आणि मन शांत राहण्यास मदत होईल.
४ चांगली झोप घ्या
उन्हाळ्यात दुपारी झोपू नका. त्यापेक्षा झोपेची आणि सकाळी उठण्याची एक वेळ ठरवा. चांगले स्लीप रूटीन लागण्याची सवय लावा.
हे करू नये
- दुपारी १२ ते ३ या वेळेत थेट सूर्यप्रकाशात जाणे टाळावे.
- शारीरिक श्रमाची कामे करू नयेत.
- चपला/बुटाशिवाय घराबाहेर जाऊ नये.
- स्वयंपाक करीत असताना हवा पुरेशी खेळती राहील, याची काळजी घ्यावी.
- चहा, कॉफी, मद्य यांचे सेवन करू नये. साखरेचे अधिक प्रमाण असलेली पेये घेऊ नयेत.
- हाय प्रोटीन आहार व शिळे अन्न खाऊ नये.
- लहान मुले व पाळीव जनावरे यांना पार्किंग केलेल्या वाहनांमध्ये ठेऊ नये.