
अनधिकृत बांधकामावर तोडक कारवाई
उरण, ता. १५ : विंधणे ग्रामपंचायत हद्दीतील कंठवली येथे राठोड या विकसकाने अनधिकृत बांधकामे उभारली आहेत. इमारत बांधताना नियमांचा भंग केल्याचा आरोप करत सिडको नैना विभागाच्या अतिक्रमण विभागाने तोडक कारवाई करत सोमवारी (ता. १५) इमारत जमीनदोस्त केली आहे. त्यामुळे नैना क्षेत्रात नियमबाह्य बांधकाम केलेल्यांचे धाबे दणाणले आहेत.
कंठवली येथील इमारत बांधताना सिडकोची कोणतीही परवानगी घेतली नव्हती. विकसकाने येथे इमारत बांधताना अनेक नियमांचा भंग केला होता. हे बांधकाम खाडी पात्राच्या जवळच असल्याने येथे सीआरझेड कायद्याचे उल्लंघन केले गेले होते. अनेक खारफुटीची झाडे तोडून या ठिकाणी भराव करण्यात आला होता. यापूर्वीही याच भागातील इमारत नैना विभागाच्या अतिक्रमण विभागाने उद्धवस्त केली होती. तरीही विकसक राठोड याने कोणतीही परवानगी न घेता बांधकाम केले होते तेही सोमवारी जमीनदोस्त करण्यात आले.
-----------------
नैना अतिक्रमण विभागाच्या अधिकाऱ्यांना विचारले असता त्यांनी हे बांधकाम अनधिकृत असून येथे सीआरझेड कायद्याचे उल्लंघन झाले असल्याचे सांगितले. यापूर्वीही येथील इमारत आमच्या विभागाकडून तोडण्यात आली आहे. तरीही यांनी पुन्हा ही इमारत उभी केली होती. आम्ही नोटिसाही दिल्या होत्या. त्यामुळे हे बांधकाम आम्ही पाडले आहे. आम्हाला तालुक्याचे महसूल विभाग आणि वन विभागाने सहकार्य केले पाहिजे. येथील सर्व अनधिकृत बांधकामे पाडली जातील.